भारताला खूप मोठ्या इतिहासाची, संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. तसेच भारतामध्ये अनेक जाती-धर्म, रूढी परंपरा अस्तित्वात आहेत. या सर्वांबरोबर आपल्या देशात महापुरुषांचीही कमतरता नाही.
या सर्व महापुरुषांचा इतिहास पण मोठा रंजक आणि प्रेरणेने भरलेला आहे. आज आपण अशाच एका प्रेरणादायी ठरलेल्या महापुरुषाचा जीवन प्रवास पाहणार आहोत.
ही गोष्ट आहे संपूर्ण जगाला आधुनिक वेदांत आणि हिंदू तत्वज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या आणि आयुष्यभर संन्यासी जीवन जगलेल्या स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दि. १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्र नाथ असे होते. त्यांना जगातील अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते. ते जन्मभर एक संन्यासी म्हणून जीवन जगले.
ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांच्या आध्यात्मिक आस्थेस योग्य दिशा दिली. या काळात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि जीवनाची योग्य दिशा मिळवण्यास सुरुवात केली आणि ती उद्दीष्टे साध्य केली.
पुढे स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्येही विवेकानंदांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या अफाट ज्ञानामुळे त्यांना वेदांचे अद्वैता देखील म्हणले गेले.
न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात एक महिला स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आणि त्यांच्या तेजावर प्रभावित झाली होती. त्यावेळी त्या महिलेने स्वामीजींना लग्नाची मागणी घातली होती.
पण ज्यावेळी त्या महिलेला स्वामींनी विचारले,” तुम्हाला माझ्याशी का लग्न करायचे आहे?” तेव्हा ती महिला म्हणाली की, “मला तुमच्यासारखा हुशार व तेजस्वी मुलगा हवा आहे, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.”
तेव्हा स्वामीजींनी या महिलेला “मी एक भिक्षुक आहे, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. यातून माझ्यासारखा मुलगा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.” असे अगदी नम्रपणे स्वामीजींनी उत्तर दिले. या प्रसंगानंतर स्वामीजी महिलांचा किती आदर करायचे आणि आलेल्या परिस्थितीला कसे समर्पकपणे तोंड द्यायचे हे सिद्ध होते.
एकदा विवेकानंद जयपूरला पोचले तेव्हा तेथील राजाने त्यांना पाहूणचार करण्याची विनंती केली. विवेकानंद राजाच्या विनंतीला मान देऊन काही दिवस तेथे राहिले. अखेर काही दिवस घालविल्यानंतर जेव्हा विवेकानंद परतणार होते, तेव्हा या राजाने त्यांच्यासाठी एक स्वागत समारंभ आयोजित केला. त्या समारंभासाठी त्याने बनारसच्या एका प्रसिद्ध वेश्येला बोलावले होते.
आपल्या कार्यक्रमात वेश्या आली आहे हे समजताच स्वामीजी गोंधळून गेले. त्यांनी त्या वेश्याच्या समोर जायचे नाही असे ठरवले. त्यामुळे ते कार्यक्रमाला न जाता खोलीतच बसून राहिले.
आपण ज्यांच्या कार्यक्रमाला आलो तेच अतिथी आपल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, हे त्या वेश्या महिलेला समजताच ती स्वामीजींच्या खोलीकडे गेली आणि त्यांना दार उघडण्याची विनंती केली. पण स्वामीजींनी दार उघडले नाही.
नंतर काही वेळानंतर राजाच्या आणि त्या वेश्या महिलेच्या विनंती नंतर स्वामींनी दरवाजा उघडला. त्यांनी त्यादिवशी पहिल्यांदा वेश्या महिलेला बघितले होते. पण त्या महिलेला बघून स्वामीजींच्या मनात कुठल्याही प्रकारचे आकर्षण निर्माण झाले नाही. त्यादिवशी त्यांना पहिल्यांदा आपण पूर्णपणे संन्यासी झाले आहेत याची अनुभूती आली होती.
सदरचा हा किस्सा स्वामी विवेकानंद यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवला होता. विवेकानंदांनी राज योग, कर्मयोग, भक्ती योग, ज्ञान योग, माय मास्टर, कोलंबो ते अल्मोडा अशी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
अशा या स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी बंगालच्या बेलूर मठात निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त टीम क फॅक्टस तर्फे विनम्र अभिवादन…!
– निवास उद्धव गायकवाड
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.