140 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेनंतर हा पृथ्वीचा पाचवा सर्वात मोठा खंड म्हणजे अंटार्क्टिका. या अंटार्क्टिकेचा ९८ टक्के भाग बर्फाखाली आहे. या अशा बर्फाच्या खाली अनेक खनिजे आहेत, त्यासाठी जगभरातील संशोधक येथे संशोधन करीत आहेत. यामध्ये भारतीय संशोधकांचाही समावेश आहे. आता भारतानं या संशोधकांसाठी आणि तेथील विरळ मानवी वसाहतीसाठी एक अनोखी भेट दिली आहे. ती भेट म्हणजे अंटार्क्टिका येथील पोस्ट ऑफीस. अर्थातच सध्या सोशल मिडीयाच्या जगात पोस्ट ऑफीसला महत्त्व आहे का, हा प्रश्न मनात येतो. मात्र अंटार्क्टिका सारख्या भागात पत्राचे महत्त्व काय याचा प्रत्यय येतो. ते जाणूनच भारतानं तिथे पोस्ट ऑफीस (post office) सुरु केले आहे. त्याचा पिनकोड MH-१७१८, असा असून त्याचे नेमके महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.
भारताच्या पोस्ट ऑफिसने (post office) पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाजवळ आपली शाखा उघडली आहे. या घटनेला मोठे मह्त्त्व प्राप्त झाले आहे. कारण अंटार्क्टिका म्हणजे, जिथे मानवी वस्ती अगदी विरळ आहे. माणसापेक्षा इथे पेग्विनची संख्या जास्त आहे. अशावेळी पत्र नेमकं वाचणार कोण आणि त्या पोस्ट ऑफीसमध्ये काम तरी कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. अंटार्क्टिकामध्ये बर्फाची चादर सर्वदूर पसरलेली आहे. अशात भारताचे पोस्ट ऑफिस सुरू झाले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, भारताची अंटार्क्टिकामध्ये संशोधन मोहिम सुरु आहे. अंटार्क्टिकाची पहिली भारतीय मोहीम जानेवारी १९८२ मध्ये झाली. तेव्हापासून भारताचे संशोधक अंटार्क्टिका येथे जात आहेत. आत्ताही भारतातील ५० ते १०० शास्त्रज्ञ या निर्जन आणि एकाकी अंटार्क्टिकामध्ये काम करत आहेत.
हा भाग अत्यंत विरळ वस्तीचा आहे. शिवाय या भागात गेलेले हे शास्त्रज्ञ ठराविक काळासाठी तिथेच रहातात. अशा या निर्जन स्थळी राहिल्यावर पहिली आठवण येते ते आपल्या कुटुंबाची. अंटार्क्टिका मध्ये या संशोधकांना पहिला सामना करावा लागतो, तो इथल्या वातावरणाबरोबर. येथे फार कमी इंटरनेट सुविधा आहे. कारण येथे सातत्यानं वादळं होत असतात. अशात ही मंडळी नेटानं आपल्या संशोधनाच्या कामात व्यस्त असतात. पण यातून वेळे मिळाल्यावर आपल्या कुटुंबाबरोबर संवाद साधायचा म्हटला तर ते शक्य होत नाही. अशावेळी त्यांच्या मदतीसाठी पत्र येणार आहेत. अंटार्क्टिकाशी संबंधित पत्रांची भारतातील नागरिकांमध्ये अजूनही क्रेझ आहे. अंटार्क्टिकाचे पोस्टल स्टॅम्प अनेक जण आपल्या संग्रहात ठेवतात, असे आढळून आले आहे. त्यामुळेच प्रत्यक्षात अंटार्क्टिकामध्ये पोस्ट ऑफीस (post office) सुरु करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भारताचे अंटार्क्टिकामधील हे तिसरे पोस्ट ऑफीस (post office) आहे. अंटार्क्टिकामधील भारताचे तिसरे पोस्ट ऑफिस भारती स्टेशनवर उघडले आहे. आणखी एक विशेष म्हणजे, आपल्या महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल के. च्या. शर्मा यांनी या पोस्ट ऑफीसचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा समारंभ पार पडला. भारताचे पहिले पोस्ट ऑफीस अंटार्क्टिकामधील दक्षिण गंगोत्री स्थानकात आहे. दुसरे पोस्ट ऑफिस १९९० मध्ये मैत्री स्टेशनमध्ये उघडण्यात आले. आता तिसरे पोस्ट ऑफिस उघडण्यात आले आहे.
या सर्व समारंभासाठी ५ एप्रिल ही तारीख नक्की करण्यात आली. कारण, ५ एप्रिल हा राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राचा (NCPOR) २४ वा स्थापना दिवस आहे. त्यामुळे पोस्ट ऑफीस (post office) सुरू करण्याचा दिवसही ५ एप्रिल हा निश्चित करण्यात आला. अंटार्क्टिकामध्ये उघडलेल्या नवीन पोस्ट ऑफिसला प्रायोगिक पिनकोड MH-१७१८ देण्यात आला आहे.
=========
हे देखील पहा : अमेरिकन इतिहासाचे प्रतीक इतिहासजमा
=========
पोस्ट ऑफीस (post office) उघडण्यात आल्यानं अंटार्क्टिका मधील भारतीय संशोधक खुश झाले आहेत. अंटार्क्टिक ऑपरेशन्सचे ग्रुप डायरेक्टर शैलेंद्र सैनी यांनी मैलाचा दगड म्हणून या घटनेचे कौतुक केले आहे. ज्या काळात पत्रे लिहिणे बंद झाले, त्या काळात भारतीयांना अंटार्क्टिकाचे शिक्के असलेली पत्रे मिळत आहेत, ही खूपच अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. अंटार्क्टिकामध्ये रहातांना माणसाचे महत्त्व काय, याची कल्पना येते. त्यांच्यासाठी ही पत्रातील अक्षरे माणसासारखीच असतात. त्यामुळे अंटार्क्टिकामधील संशोधक त्यांना आलेली पत्रे जपून ठेवतात.
सई बने