Home » पंढरीची वारी, वारकरी आणि श्रीविठ्ठल

पंढरीची वारी, वारकरी आणि श्रीविठ्ठल

by Correspondent
0 comment
Warkari | K Facts
Share

 श्रीकांत नारायण

दरवर्षी साधारणपणे जून महिन्यात केली जाणारी ‘पंढरीची वारी’ (Ashadhi wari) हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील एक अद्वितीय भक्ती सोहळा आहे. दरवर्षी लाखो वारकरी देहभान हरपून या पायी वारीत सामील होतात आणि विठ्ठलाच्या नामात रंगून जातात. ‘आळंदी ते पंढरपूर’ जाणाऱ्या या वारीतील ‘ते’ पंधरा दिवस म्हणजे विठूनामाच्या गजराचा भक्तीभाव सोहळाच असतो. शेकडो वर्षे ही परंपरा चालू आहे.

बदलत्या काळानुसार या वारीत काही बदल झालेही असतील परंतु वारकऱ्यांच्या मनातील पंढरीच्या विठोबाच्या (Vithoba) भेटीची आस ही अजूनही कायम आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या ‘वारी’वर ‘कोरोना’चे  सावट आले आहे. गेल्यावर्षी ‘कोरोना’ महामारीच्या संकटामुळे ‘वारी’ नाममात्र निघाली. तर यावर्षीही ‘कोरोना’ चा फैलाव पुन्हा होऊ नये म्हणून वारीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Ashadhi wari cancel due to corona lockdown
Ashadhi wari cancel due to corona lockdown

यावर्षी ‘बसमधून’ वारी करण्यास प्रमुख दिंड्यांना राज्यसरकारने परवानगी दिली आहे. अर्थात फार ‘गर्दी’ होऊ नये म्हणून त्यावरही बरेच  निर्बंध घालण्यात आले आहेत. काही ठराविक मानाच्या दिंडयांनांच बसमधून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संत तुकाराम यांच्या पालखीने गुरूवारी प्रस्थानही केले आहे तर पैठणहून संत एकनाथ महाराज यांची पालखीही मार्गस्थ झाली आहे.

राज्यात ‘कोरोना’ (Corona) च्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्यामुळे राज्यसरकारने यंदाही वारीवर निर्बंध घातले आहेत हे उघड आहे. मात्र राज्यसरकारच्या या निर्णयाला काही जणांनी विरोध केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे एक नेते बंडातात्या कराडकर आणि भाजपच्या धार्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचा समावेश आहे. या ना त्या निमित्ताने राज्यसरकारला सतत विरोध करणारेच त्यांचे बोलविते धनी आहेत हे सुज्ञ लोकांना सांगण्याची गरज नाही.

राज्यसरकारच्या या निर्णयाचा निषेध करताना बंडातात्या कराडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत यावर्षी आम्ही पायी वारी काढणारच अशी घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी ते कशी करतात हेच आता पहावयाचे आहे. मात्र पायी वारी काढण्याच्या त्यांच्या या निर्णयाला सुज्ञ वारकरी फारसा प्रतिसाद देतील असे वाटत नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता केवळ ‘विरोधासाठी विरोध’ अशी भूमिका घेणे हे शहाणपणाचे नाही हे सामान्य वारकऱ्यांनाही आता कळले आहे.

शेवटी भक्ती ही भक्तीच असते ती कोणत्या रूपातून व्यक्त करायची याबाबत संतांनीच निरनिराळ्या अभंगातून सांगून ठेवले आहे. देवावर अपार भक्ती असलेल्या भक्ताला देवळात जाण्याची गरजच काय? तो कोठेही नामस्मरण करून आपली भक्ती प्रकट करू शकतो. पण आडमुठी भूमिका घेणाऱ्या काही जणांना ते मान्य नसते हे मात्र खरे.

तिकडे सांगलीचे ‘शिवप्रतिष्ठान’चे भिडे गुरुजी यांनीही या वादात आता उडी घेतली आहे. ”पंढरीची वारी पायी निघाली नाही म्हणूनच ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव झाला” असा अजब निष्कर्ष काढणारे त्यांनी विधान केले आहे. यापूर्वीही ”आंबा खाल्ल्याने मुलगा होतो” असे विधान करून ते काही काळ चर्चेत राहिले होते.  वास्तविक भिडे गुरुजी आणि ‘वारी’ चा तसा प्रत्यक्ष काहीही संबध नाही.

मात्र हिंदू जागृती करणाऱ्या भिडे गुरुजी यांना, पायी वारी निघाली नाही तर हिंदू धर्म संकटात येईल अशी भीती वाटली असावी म्हणून त्यांनी तसे विधान केले असावे. काही वर्षांपूर्वी पुण्यात याच भिडे गुरुजींना वारीत सामील होण्यास काही दिंडी प्रमुखांनी विरोध का केला होता त्याचे आत्मपरीक्षण भिडे गुरूजी यांनी अजून तरी केलेले दिसत नाही असे दिसते. तसाच विचार केला तर भिडे गुरूजी यांनी आता नव्वदी पार केली आहे त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे दुर्लक्षच केलेले बरे.

Pandharpur Vithoba temple
Pandharpur Vithoba temple

गेल्यावर्षी राज्यसरकारने ‘वारी’ वर निर्बंध घालून देखील ‘वारी’ संपल्यानंतर पंढरपूर शहरात आणि परिसरात ‘कोरोना’ ने थैमान घातले होते हे तेथील नागरिक अजून तरी विसरलेले नसतील. शेवटी कोणत्याही तीर्थक्षेत्री होणाऱ्या सोहळ्याबाबत तेथील स्थानिक जनतेचा विचार करण्याची गरज असते, नाही तर ”वारीचा सोहळा, नको रे बाप्पा” अशी तेथील सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया ऐकू येऊ शकते.

‘कोरोना’ चे संकट हे जागतिक संकट आहे आणि गर्दी टाळणे हाच ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव चांगला उपाय आहे. त्यामुळेच राज्यसरकारने विचार करूनच पायी वारीला बंदी घातली असून बसने दिंड्या नेण्यास परवानगी दिली आहे. म्हणूनच समस्त वारकरी संप्रदायाने परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे आपली ‘पाऊले’ टाकण्याची गरज आहे.

शेवटी पंढरीचा युगानयुगे विटेवर उभा असलेला विठ्ठल हा भक्तीचा भुकेला आहे हे जरी खरे असले तरी भक्तीचा मार्ग कसा असावा हेही त्याने वेळोवेळी त्याच्या भक्तांना दाखवून दिले आहे. श्री विठ्ठलाची अपार भक्ती करणाऱ्या समस्त नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत त्याचाच साकल्याने विचार करण्याची गरज आहे.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.