Home » केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!

केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!

by Correspondent
1 comment
Share

अंती काय हाती लागलं रे तुझ्या?”

काळ्याकभिन्न अंधारातून अचानक एखादी लवलवणारी केशरी ज्योत नजरेस पडावी तशी केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर आली त्याच्या. चेहरा तसाच पूर्वीसारखा रेखीव, आकर्षक पण शांतचित्त. तारुण्यातील नवथर वेलीचं जणू धीरोदात्त वृक्षात रूपांतर व्हावं, तशी वाटली ती त्याला. “किती काळ वाहून गेलाय आपल्यात …सुवासिनी…”

तिचं नाव उच्चारताना तो जरा अडखळला. आज इतक्या काळानंतर तिचं नाव ओठांवर आलं… कितपत योग्य? तिला काय वाटेल? तो विचारांत पडला. तिनं विचारलेला प्रश्न त्याच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. त्यानं विचारलेला प्रश्न तरी तिच्यापर्यंत कुठे पोहोचला होता?  एकटक त्याच्याकडे पाहात ती पुन्हा बोलू लागली, “एककेन्द्री शासनव्यवस्थेचा पुरस्कर्ता म्हणून कीर्तिमान झालास, पण अंती एकटाच राहिलास ना? ” तिचा शांत आवाज त्या अंधाराला कापत गेला नि आता विचलित झाला तो. विसरून गेला स्वतःच्या देहावरील शुभ्र वस्त्रांना, ज्या वस्त्रांनी राजस, स्वर्णिम वस्त्रांतील त्या सम्राट चंद्रगुप्ताला एक सामान्य जैन श्रमण बनवलं होतं. त्याच्या नजरेसमोर उभा राहिला भूतकाळाचा अवाढव्य पट. ज्याचं एक टोक उजव्या हातात धरून उभी होती ‘ती’. हो तीच… सुवासिनी आणि दुसरं टोक हातात घेऊन हसत उभे होते, आर्य चाणक्य.

सुवासिनीच्या डाव्या हातात होते पारदर्शी, निळ्या-हिरव्या अशा अतिशय मनोहारी रंगांचे काचमणी. तिचे आवडते. अल्लड वयात त्या काचमण्यांशी खेळता खेळता अशीच अचानक ती दृष्टीस पडली होती त्याच्या नि आवडली होती त्याला. मगधसम्राट धनानंद यांच्या एका मंत्र्यांची ती कन्या असल्याचं नंतर कळलं.  “चंद्रगुप्ता, आर्य चाणक्यांच्या राजकीय हेतूंना यशस्वी करण्याकरता मला एकटं टाकलंस आणि तू तक्षशिला नगरीस निघून गेलास. सम्राट सिकंदरचा मंत्री सेल्यूकस ह्याची मुलगी, हेलेना, तिच्याशी केवळ एक राजकीय खेळी म्हणून तू विवाह केलास.

इकडे पाटलीपुत्रमध्ये मात्र सम्राट धनानंद यांच्या वासनांध नजरेची मी शिकार झाले. नाइलाजाने त्यांच्याशी मला विवाह करावा लागला. आपल्या उमलत्या प्रेमाचा त्याग करावा लागला.नंतर माझ्या पित्यासही स्वतःच्या बाजूला तू वळवून घेतलंस आणि मगध राज्याची राजधानी असलेल्या पाटलीपुत्रवर चढाई केलीस. माझे पती सम्राट धनानंद यांना कपटानं मारलंस. धनानंद हे सम्राट म्हणून आणि एक माणूस म्हणूनही नीच होतेच, पण तू तरी माणुसकीला जागलास का रे? सांग ना.”बोलता बोलता सुवासिनी थांबली. वाऱ्याच्या हलक्या झुळकेवर केशरज्योत थरथरावी तसा तिचा देह थरथरत होता.

चंद्रगुप्त अनिमिष नजरेनं तिच्याकडे पाहत होता. खरंच, हे निर्व्याज प्रेम अव्हेरलं आपण… छे…

लाथाडलं आपल्या सत्तेच्या मोहापायी. मगध साम्राज्य हस्तगत करून, सर्व गणराज्यं एक करून, एककेन्द्री शासनव्यवस्था आणि अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं चाणक्य विष्णुगुप्तांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणताना बळी मात्र गेला ‘ती ‘चा, कोवळ्या सुवासिनीचा. “तुला आठवतं?” तिच्या प्रश्नानं तो भानावर आला.  “हे काचमणी माझ्या ओंजळीत घेऊन एकदा मी तुझ्यासमोर अशीच उभी होते, तेव्हा तू काय म्हणाला होतास?” तिनं विचारलं.”होय सुवासिनी, स्मरतंय मला, मी म्हणालो होतो, या पारदर्शी काचमण्यांसारखी आपली प्रीतही निरंतर पारदर्शी राहील. सुंदर राहील. परंतु या स्वार्थी राजकारणाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या मदांधतेमध्ये मी नाही जपू शकलो ती पारदर्शकता, सुंदरता आपल्या प्रेमामध्ये. जीवनाच्या अंती खरंच एकटा झालो. म्हणूनच तर तीर्थकरांना शरण गेलोय आता. मला क्षमा करशील का सुवासिनी?” “हं..क्षमा? चंद्रगुप्ता, मी कोण रे तुला क्षमा करणारी?… मी तर केव्हाच निवडलाय माझाही मार्ग, ‘तथागतां’कडे  जाण्याचा. अंतिम सत्याकडे जाण्याचा.

सम्राज्ञीपदाचा त्याग केलाय मी. माझ्या मस्तकावरील माझा काळाभोर केशसंभार उतरवून, राजवस्त्राचा, अलंकारांचा त्याग करून या केशरी वस्त्रांमध्ये स्वतःला झाकून घेतलंय मी. एक एक कण मोकळे केलेत आता या मोहमयी जीवनाचे. हं…हे पाच-सहा रंगीत काचमणी मात्र… जपून ठेवले होते… उगीच… ही एकच, अडकलेली कडी उरली होती या जीवनसाखळीची. आज तू आलास, शेवटचं भेटायला, आता जाऊ देत ओघळून या मण्यांनाही … स्वैरपणे. उचलेल त्यांना अशीच कुणी एखादी निरागस ‘सुवासिनी’ नि कदाचित भेटेल तिलाही कुणी खराखुरा तिचा असलेला ‘चंद्रगुप्त’….. माहीत नाही, इतिहासाच्या नि भविष्याच्या पोटात काय दडलंय.

आत्ताचा क्षण महत्त्वाचा. संपत आलाय तोही.”सुवासिनीनं फक्त एकदाच त्याच्याकडे पाहिलं. सौम्य स्मित. शांत चेहरा. त्या रंगीत काचमण्यांना तिनं अलगद जमिनीच्या उतारावरून खाली सोडलं आणि ती केशरी ज्योत अंधारात विरघळत गेली. दूरवर ध्वनी घुमू लागले…

बुद्धं शरणं गच्छामि … धम्मं शरणं गच्छामि ।

चंद्रगुप्तानं एक दीर्घ सुस्कारा सोडला, पाठ फिरवली अन् श्वेत वस्त्रांतील जैन श्रमणांच्या तांड्यासह  तोही चालू लागला अलिप्तपणे … निरागस भावभावनांचे असे अनेक काचमणी घरंगळत राहिले असतील इतिहासाच्या पटलांवरून… राजकीय स्वार्थाच्या पटांवरून… अबोलपणे.

– डाॅ. निर्मोही फडके


Share

Related Articles

1 comment

राजू देसले July 8, 2020 - 6:37 am

कमी शब्दात आशय मांडण्याचे सामर्थ्य म्हणजे काय ? याचा उत्तम नमुना ही कथा आहे,जनसामान्य व राजकीय, सामाजिक परिस्थिती यांची सुरेख गुंफण आशयातून व्यक्त होते
आधुनिक व नव्या जाणिवांचे हे कथन आहे.

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.