सध्या समाजात गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोलिसांना यावर अनेक वेगवेगळे उपाय शोधावे लागतात. मात्र या सर्वात एक प्रश्न प्रत्येकाला पडतो, तो म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा करताना काहीच वाटत नसेल का?
असो, पण गुन्हेगाराला गुन्हा करताना जेवढी भीती वाटत नाही तेवढी भीती त्याला अटक झाल्यानंतर पोलिसांच्या थर्ड डिग्रीची वाटते. थर्ड डिग्रीमुळे भलेभले आरोपी बोलते होतात. आणि जर थर्ड डिग्रीने (Police Third Degree) बोलते नाहीच झाले तर त्यांना अनेक परिणामांना सामोरे जावे लागते.
आजच्या लेखात याच थर्ड डिग्रीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात आरोपीवर थर्ड डिग्री कशी लावली जाते, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत आणि थर्ड डिग्रीत पोलीस नक्की कोणकोणत्या हत्यारांचा वापर करतात ते!
सर्वात पहिल्यांदा आपण थर्ड डिग्री हा शब्द नक्की कुठून आला हे पाहुयात. जुन्या काळात अमेरिकेत थॉमस बायर्न्स आणि रिचर्ड सिल्व्हेस्टर हे दोन पोलीस अधिकारी खूप कडक मानले जात होते. रिचर्ड सिल्व्हेस्टर यांनी टॉर्चर या प्रकाराला तीन डिग्रीमध्ये विभागले होते.
त्यामध्ये पहिली डिग्री म्हणजे अटक करणे. नंतर दुसरी डिग्री म्हणजे जेलमध्ये आणणे. आणि शेवटची तिसरी डिग्री म्हणजे चौकशी करणे. अशा तीन डिग्ऱ्या रिचर्ड सिल्व्हेस्टरने बनवल्या होत्या.
पण यामध्ये थर्ड डिग्रीत कोणतेही मार्गदर्शक तत्वे किंवा तांत्रिक संज्ञा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत थर्ड डिग्री म्हणजे केवळ अमानुषपणे आरोपीचा शारीरिक व मानसिक छळ करून गुन्हा कबूल करून घेणे असा प्रत्येकाचा समज होत आलेला आहे.
या थर्ड डिग्रीचे अनेक प्रकार आहेत ते आपण पुढे पाहुयात.
थर्ड डिग्रीचे प्रकार
१) कलकत्ता घोडी:-
कलकत्ता घोडी या प्रकारात शिकारीनंतर पकडलेल्या जनावराचे पाय काठीला बांधून नेतात, तसे आरोपीला बांधले जाते. व त्याला या अवस्थेत चार-पाच तास बांधून ठेवतात. त्यानंतर त्याला सोडून चौकशी केली जाते. पण या चौकशीत तो जर खरे बोलत नसेल तर त्याला चांगलाच चोप देऊन पुन्हा पूर्ववत बांधून ठेवले जाते.
२) वन एटी:-
या प्रकारात आरोपीला जमिनीवर बसवून त्याचे पाय हळूहळू १८०° अंशात फाकवले जातात. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायावर ताण आल्याने आरोपी आपला गुन्हा कबूल करेल असे पोलिसांना वाटते. पण जर तरीही आरोपीने गुन्हा कबूल केला नाही, तर पाय फाकवलेल्या अवस्थेत आरोपीच्या दोन्ही मांड्यांवर लाकडी फळी ठेवून त्यावर दोन जणांना उभे करतात.
३) नालबंदी:-
आरोपीला पोटावर पालथे झोपवून त्याच्या दोन्ही पायांच्या टाचांवर ‘सत्यशोधक’ पट्ट्याचे किंवा काठीचे जोरदार फटके मारले जातात. तळपायांवर फटके मारण्याच्या या प्रकाराला नालबंदी असे म्हणतात.
४) सूर्यफुलाचे तेल:-
या प्रकारात सूर्यफुलाच्या तेलाचे दोन थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन प्रायव्हेट जागी लावतात. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच प्रायव्हेट जागी आग होऊ लागते. परिणामी असे केल्याने आरोपी गुन्हा कबूल करण्यास तयारही होऊ शकतो.
५) शॉक देणे:-
तुम्हाला खोटे वाटेल पण थर्ड डिग्रीत आरोपीला शॉक सुद्धा दिला जातो. या प्रकारात कानांच्या पाळीला विजेचे झटके दिले जात. पुढे कानाच्या पाळीपासून सुरु केलेला हा शॉक हळूहळू शरीराच्या खालच्या भागापर्यंत दिला जातो.
६) अन्य प्रकार:-
या प्रकारात आरोपींना दिवसभर गोड पदार्थ खाऊ घालतात आणि झोप आल्यावर झोपू दिले जात नाही.
तसेच त्यांचे वारंवार केस उपटले जातात.
आणि तासंतास हात वर करून उभेही रहायला सांगतात.
तर असे होते सगळे थर्ड डिग्रीचे प्रकार. पण या थर्ड डिग्री दरम्यान पोलीस ज्या हत्यारांचा वापर करतात, त्या हत्यारांची नावे तुम्ही कधी विचारही केला नसेल इतकी हटके असतात.
समाजसुधारक, ज्ञानवर्धक पट्टा, आन मिलो सजना, रात की रानी, राजा, फिर कब मिलोगे अशी विचित्र नावे या हत्यारांना पोलीस खात्याने दिलेली असतात. त्यामुळे या हत्यारांची नावे ऐकून आपल्याला जरी हसू येत असेल, तरी आरोपी मात्र याच हत्यारामुळे रडतो हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहीजे.
– निवास उद्धव गायकवाड