Home » दुसरा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

दुसरा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

by Correspondent
0 comment
Chintamani Vinayaka Temple Theur | K Facts
Share

असे म्हटले जाते की अष्टविनायक यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.

दुसरा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी (Chintamani Ganpati Theur)

थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.

श्री क्षेत्र चिंतामणीची आख्यायिका

आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती (Ganapati) चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा म्हणतात.

Chintamani Ganpati Theur - Ashtavinayak Yatra
Chintamani Ganpati Theur – Ashtavinayak Yatra

श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर

चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रामाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो.

पूजा आणि उत्सव

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १०

इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते, तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

कसे पोहोचणार

थेऊर (Theur) हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गावर २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

शब्दांकन – शामल भंडारे.

=====

हे देखील वाचा: पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वर

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.