आंध्र प्रदेशातील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर (Venkateswara Temple) जगविख्यात आहे. तिरुमला पर्वतावरील हे मंदिर, भगवान विष्णूचे अवतार श्री व्यंकटेश्वर स्वामी यांना समर्पित आहे. श्री व्यंकटेश्वरच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. भगवान विष्णुंचा हा अवतार मानवजातीला कलियुगातील संकटांपासून वाचवण्यासाठी असल्याचे मानले जाते. तिरुपती मंदिराला कलियुग वैकुंठ, तिरुपती बालाजी मंदिर अशा अनेक नावांनी ओळखले जाते. याच तिरुपती मंदिर देवस्थानतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. आता यापुढे पाऊल ठेवत तिरुपती बालाजी मंदिरामध्ये बिगर हिंदूंना हिंदू धर्म स्विकारता येणार आहे. यासाठी बालाजी मंदिरात लवकरच स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये बिगर हिंदूंना हिंदू धर्म स्विकारण्यासाठी सर्व मदत करण्यात येईल, शिवाय त्यांना मंदिरात पुजा आणि इतर धार्मिक कार्ये करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अशाप्रकारे काम करणारे तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील पहिले मंदिर ठरणार आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानला भेट देणा-या भक्तांची संख्या लाखाच्या घरात आहे. दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती वाढत आहे. यासोबत मंदिराबाबत अन्य धर्मियांमध्येही श्रद्धा वाढत आहे. मंदिर देवस्थानच्या कार्यामुळे सनातन धर्माबाबत आस्था निर्माण झालेल्या अनेकांना सनातन धर्मात प्रवेश करण्याबाबत चौकशी केली आहे. अशा घटना वाढू लागल्यामुळे तिरुपती देवस्थानतर्फे आता सनातन धर्म आणि भगवान बालाजी यांच्यावर श्रद्धा असलेल्या गैर-हिंदूंना हिंदू धर्मात प्रवेश दिला जाणार आहे. यासोबत त्यांना उपासनेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (Venkateswara Temple)
यासंदर्भात तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भूमाना करुणुकर रेड्डी यांनी देवस्थानची भूमिका स्पष्ट केली आहे. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात गैर हिंदूंना हिंदू धर्मात प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं व्यासपीठ नाही. ही जागा आता तिरुपती देवस्थान भरुन काढणार आहे. हे मंदिर भारतातील अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ असेल, जेथे गैर-हिंदूंना हिंदू धर्माची माहिती दिली जाईल. यासोबतच हिंदू धर्माच्या मूल्यांचा प्रसार करण्यात येईल. याशिवाय धर्मांतरालाही आळा बसण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अन्य धर्मियांतील लोकांना हिंदू धर्मात प्रवेश देण्याचे कामही देवस्थानतर्फे कऱण्यात येणार असल्याचे रेड्डी यांनी जाहीर केले आहे. ज्या अन्य धर्मियांचा सनातन धर्म, देव-देवतांवर श्रद्धा आहे, त्यांना हिंदू धर्मात समावेश करुन घेण्यात येईल. त्यासाठी देवस्थान लवकरच एक हिंदू धर्म सनातन व्यासपीठ सुरु करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे देशातील पहिले व्यासपीठ असेल, जिथून हिंदू धर्मात प्रवेश दिला जाणार आहे. (Venkateswara Temple)
तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी आस्थेचे प्रमुख स्थान आहे. या मंदिराच्या उभारणीत चोल, होयसाळ आणि विजयनगरच्या राजांचे मोठे योगदान आहे. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत.
असे मानले जाते की, स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर भगवान विष्णूंनी काही काळ वास्तव्य केले होते. हे सरोवर तिरुमलाजवळ आहे. या तिरुपतीच्या सभोवतालच्या टेकड्यांना ‘सप्तगिरी‘ म्हणतात. या सात टेकड्या शेषनागाच्या सात फण्यांवर असल्याचे मानण्यात येते. श्री व्यंकटेश्वरैयाचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर वसलेले असल्याचे सांगितले जाते. अन्य एका कथेनुसार रामानुजांनी 11व्या शतकात तिरुपतीच्या या सातव्या टेकडीवर चढाई केली. यावेळी भगवान व्यंकटेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना दिर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर भगवान व्यंकटेश्वराची कीर्ती सर्वदूर पसरवली. या मंदिराला तत्कालिन राजांनी वैभवशाली रुप दिले. (Venkateswara Temple)
=============
हे देखील वाचा : ता-याच्या आकारातील चेन्नाकेशव मंदिर
=============
9 व्या शतकात कांचीपुरमच्या राजघराण्यातील पल्लवांनी मंदिर असलेल्या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 15 व्या शतकात विजयनगर राजघराण्याचे या भागात वर्चस्व होते. 1843 ते 1933 पर्यंत ब्रिटिश राजवटीत या मंदिराचे व्यवस्थापन हत्तीरामजी मठाचे महंत सांभाळत होते. 1933 मध्ये मद्रास सरकारने या मंदिराचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले. त्याचवेळी ‘तिरुमला-तिरुपती‘ या स्वतंत्र व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. मंदिरात दररोज 1 लाखाहून अधिक भाविक भगवान व्यकंटेशाच्या दर्शनासाठी येतात. भगवान व्यंकटेशाच्या मुख्य मंदिराखेरीज अन्य देवतांचीही मंदिरे या मंदिर परिसरात आहेत. या सर्व मंदिरांचे दरवाजे, मंडप अतिशय भव्य असे आहेत. त्यामुळे हा सर्व मंदिर संकुल कायम भक्तांनी भरलेला असतो. (Venkateswara Temple)
या भक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीचा विनियोग मंदिर देवस्थानतर्फे अनेक उपक्रम राबवून करण्यात येतो. आता याच मंदिर देवस्थानतर्फे हिंदू धर्मात बगैर हिंदूना प्रवेश देण्यात येणार आहे.
सई बने