अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था नासा आणि एलियन अर्थात परग्रही, यासंदर्भात अनेकवेळा बातम्या आल्या आहेत. आताही अमेरिकेत याच परग्रहींबाबत चर्चा होत आहे. नासाच्या प्रयोगशाळेत अनेक परग्रहींचे मृतदेह ठेवलेले असून नासाचे संशोधक त्यावर संशोधन करत असल्याचा दावा प्रसिद्ध जादूगार युरी गेलर यांनी केला आहे. युरी गेलर हे प्रसिद्ध जादूगर आहेत. (NASA Laboratory)
77 वर्षीय या जादुगाराचे अमेरिकेत मोठ्या संख्येनं चाहते आहेत. याच युरी यांनी नासाच्या प्रयोगशाळेत गेल्याचा दावा केला आणि एकच खळबळ उडाली आहे. नासाच्या प्रयोगशाळेत फ्रिजमध्ये आठ परग्रहींचे मृतदेह पाहिल्याच त्यांनी दावा केला आहे. या त्यांच्या दाव्यानंतर त्यांच्या पाठिराख्यांमध्ये खळबळ उडाली आहे. युरी यांनी या परग्रहींचे वर्णनही केले असून या त्यांच्या दाव्यावर नासानं अद्याप कुठलाही खुलासा केला नसल्यामुळे युरी यांचा दावा खरा आहे, असेही म्हटले जात आहे. (NASA Laboratory)
नासाच्या प्रयोगशाळेत एलियनचे मृतदेह आहेत असे प्रसिद्ध जादूगार युरी गेलर यांनी एका जाहीर मुलाखतीमध्ये सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे. युरी गेलर यांनी अमेरिकन सरकारने परग्रही आणि यूएफओ संशोधनात त्यांची मदत घेतल्याचा दावा केला होता. काही वर्षापूर्वी याच युरींनी आपल्याबरोबर परग्रही संपर्क साधत असल्याचेही सांगितले होते. त्यामुळेच नासानं परग्रहींसोबत काम करण्यासाठी मध्यस्थ म्हणून आपला वापर केल्याचे युरींनी सांगितले होते. युरी यांच्या याच अनेक दाव्यांवर एक जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये युरी यांनी नासाच्या प्रयोगशाळेतील आठ परग्रहींच्या मृतदेहाचे वर्णन केले.
युरींच्या म्हणण्यानुसार, नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या तळघरात एलियनचे मृतदेह डीप फ्रीजरमध्ये ठेवले आहेत. चंद्रावर चालणारे सहावे अंतराळवीर, जर्मन रॉकेट अभियंता वर्नर ब्रॉन आणि एडगर मिशेल हे दोघंही यावेळी उपस्थित होते. त्या दोघांनीच युरीला स्पेस फ्लाइट सेंटरच्या तळघरात नेलं. तिथे काचेच्या भल्यामोठ्या कंटेनरमध्ये आठ मृतदेह ठेवण्यात आले होते. यातील काही मृतदेहांचे विच्छेदनही करण्यात आल्याचा दावा युरी यांनी केला. नासाची ही प्रयोगशाळा मेरीलँडमध्ये असून वॉशिंग्टन डीसीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. प्रयोगशाळा काही मजले जमिनीमध्ये आहे. अत्यंत गोपनिय असे हे स्थान आहे. ही जागा अत्यंत थंड आहे. तिथे जाण्यापूर्वी युरी यांना नासाचा लोगो असलेला कोटही घालण्यात आला. ती संपूर्ण खोली हॉस्पिटलसारखी वाटत होती. जेव्हा हे कंटेनर उघडून त्यातील मृतदेह युरी यांना दाखवण्यात आले, तेव्हा सुरुवातील त्यांना ते मानवी मृतदेह वाटले. (NASA Laboratory)
अपघातात जखमी झालेल्या माणसासारखे ते मृतदेह असल्याचे युरी यांनी सांगितले. पण नंतर निरखून पाहिल्यावर त्यातील सर्व मृतदेहांचे डोके मोठे होते, तसेच त्यांचे शरीर बारीक होते आणि त्यांचे डोळे शरीराच्या मानानं खूपच मोठे होते. त्यांच्या शरीरावरही अनेक जखमा असल्याचा दावा युरी यांनी केला आहे. या मृतदेहांवर नासाचे संशोधक अधिक अभ्यास करीत असल्याचेही युरी यांनी सांगितले. परग्रहींच्या मृतदेहाबाबत एवढाच दावा करुन युरी शांत राहिले नाहीत तर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनाही या परग्रहींबाबत माहीत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
============
हे देखील वाचा : उत्तर प्रदेशचे नाव आर्यवर्त कधी होणार ?
===========
उरी यांनी यापूर्वीही परग्रहींबाबत अनेक वादग्रस्त दावे केले आहेत. 2021 मध्ये त्यांनी परग्रहींसोबत संपर्क साधण्यासाठी ते अमेरिकेसोबत काम करत असल्याचे जाहीर केले होते. तसेच नासानं गेल्यावर्षी परग्रहीं आणि युएफओ संदर्भात अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र युनिट तयार केल्याचे जाहीररित्या कबूल केले होते. तेव्हाही युरी यांना आपला दावा खरा असल्याचे पुन्हा सांगितले होते. आता हेच जादुगार युरी पुन्हा चर्चेत आले आहेत, ते परग्रहींचा मृतदेह पाहिल्याचा दावा केल्यामुळे. त्याची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर पेंटागनने परग्रहींच्या मृतदेहांबाबत जनतेला सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. (NASA Laboratory)
युरी गेलर हे जन्मानं इस्रायलचे आहेत. काही वर्ष ते इस्रायली सैन्यामध्ये मोठ्या पदावर कामही केले होते. युद्धात जखमी झाल्यावर त्यांनी मॉडेल आणि नाईट क्लब एंटरटेनर म्हणूनही काम केले. तिथूनच जादूचे प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. नजरेसमोरील चमटा वाकवणे, घड्याळाचे काटे थांबवणे या त्यांच्या जादुंनी त्यांना प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेत गेल्यावर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. हेच युरी गेली काही वर्ष परग्रही आपल्या बरोबर संवाद साधत असल्याचा दावा करत आहेत. आता त्यांच्या या दाव्यात परग्रहींचा मृतदेह बघितल्याच्या दाव्याची भर पडली आहे.
सई बने