भारतीय संस्कृतीचा विस्तार हा किती झाला होता, याचे पुरावे वेगवेगळ्या रुपात समोर येत आहेत. अतिशय संपन्न अशा या संस्कृतीमधील मंदिरे ही अध्यात्मासोबत ज्ञानाची मोठी केंद्र होती. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. मात्र या पाकिस्तानमध्ये अनेक पौराणिक मंदिरे आहेत. या मंदिरांचा इतिहास महाभारत काळापेक्षाही पुरातन आहे. यातील एका मंदिरात प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता सती यांचे वास्तव्य असल्याची कथा सांगितली जाते. (Hindu Temple)
पाकिस्तानमधील हे हिंदू मंदिर 5000 वर्षे जुने आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिरात पांडवही वनवासादरम्यान आले होते. या मंदिराचे नाव कटाक्ष राज मंदिर असून पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यापासून 40 किमी अंतरावर हे पुरातन मंदिर आजही हिंदू पुराणातील कथांची साक्ष देत उभे आहे. भगवान शंकराच्या या मंदिर संकुलात अन्यही देवांची मंदिरे आहेत. भगवान शंकर आणि माता सती यांच्या प्रेमाची साक्ष म्हणूनही हे मंदिर बघितले आहे. याच मंदिरात माता सतीच्या आठवणीने भोलेनाथांचे अश्रू पडले आहेत. त्यामुळे हे मंदिर आणि तेथील तलाव हा हिंदू धर्मियांसाठी मोठा श्रद्धेचा भाग आहे.
पाकिस्तानमध्ये अनेक हिंदू मंदिरे आहेत. माता हिंगुळजा देवीचे पाकिस्तानमधील मंदिर हे तमाम हिंदूंसाठी वंदनीय आहे. त्याचप्रमाणे कटाक्षराज मंदिर जगभरातील शिवभक्तांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. ज्या तलावाभोवती हे कटाक्ष मंदिर बांधले गेले आहे, तो तलाव भगवान शंकराच्या अश्रूंनी तयार झाला असल्याची कथा सांगितली जाते. त्यामुळे या मंदिरात जाण्यासाठी आणि तलावात स्नान करण्यासाठी हिंदू धर्मियांची मनोमन इच्छा असते. मात्र हे मंदिर पाकिस्तानात असल्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक परवाने काढावे लागतात. (Hindu Temple)
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल येथे असलेल्या कटाक्ष राज मंदिरात जाण्यासाठी शिवभक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यामागे कारणही तसेच आहे. हे कटाक्ष मंदिर म्हणजे एक मंदिरांचा समुहच आहे. या मंदिर संकुलात सात मंदिरे आहेत. या मंदिरांना सतगृह असेही म्हटले जाते. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या या मंदिरात आता अगदी हातावर मोजण्यासारखे हिंदू जाऊन भगवान शंकराची पूजा करतात.
कटाक्ष राज मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की हे मंदिर ज्या तलावाभोवती बांधले आहे तो तलाव भगवान शंकराच्या अश्रूंनी तयार झाला आहे. याच परिसरात भगवान शंकर आपली पत्नी, माता सतीसह राहत होते. माता सतीचा मृत्यू झाल्यावर भगवान शंकर प्रचंड विलाप करु लागले. त्यांच्या डोळ्यातून एवढे अश्रू आले की त्याच्यापासून एक तलाव तयार झाला. भगवान शंकराच्या अश्रूंपासून तयार झालेल्या या तलावाला कटाक्ष तलाव म्हणून ओळखले जाते. याच तलावाभोवती मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराला कटाक्ष मंदिर असे म्हटले गेले. (Hindu Temple)
या मंदिराचे आणि पांडवांचेही नाते असल्याचे सांगण्यात येते. कटाक्ष राज मंदिर जेथे आहे, त्या परिसरात पांडव त्यांच्या 12 वर्षांच्या वनवासात काही काळ राहिले होते. येथील घनदाट जंगलात फिरत असताना पांडवांना तहान लागली. तेव्हा त्यांच्यापैकी एकजण पाणी घेण्यासाठी कटाक्ष कुंडावर आला. त्यावेळी हा तलाव यक्षाच्या ताब्यात होता. यक्षाने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच तलावातून पाणी घेण्याची अट पांडवांसमोर ठेवली. पांडव यक्षाच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे युधिष्ठिर वगळता सगळे तलावाच्या काठी बेशुद्ध होऊन पडले. फक्त युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्नाची उत्तरे बरोबर देऊ शकला. त्यांनी आपल्या भावांना यक्षाच्या ताब्यातून मुक्त केले आणि यक्षालाही मुक्त केले. याच तलावाकाठी पाच पांडवांनी नंतर काही काळ वास्तव्य केल्याची कथा सांगितली जाते. (Hindu Temple)
या कटाक्ष सुमारे 900 वर्षांपूर्वी बांधलेले बौद्ध स्तूपही आहेत. शिवाय भगवान शंकरासह श्री राम, हनुमान यांची मंदिरेही आहेत. याच भागात एका प्राचीन गुरुद्वाराचे अवशेषही सापडले आहेत. गुरू नानक यांनी जगभर फिरताना या मंदिरात वास्तव्य केल्याची माहिती आहे. या मंदिरात पाकिस्तानमधील हिंदू बांधव महाशिवरात्रीला जातात. तेव्हा येथे छोटी जत्राही भरते. या मंदिराची वास्तू काश्मिरमधील मंदिरांसारखीच आहे. या मंदिराचे छत शिखरावर टोकदार आहे. हे मंदिर चौकोनी आकारात बांधलेले आहे. शिवाय भिंतीवरील चित्रेही पुराणकालीन आहेत. (Hindu Temple)
============
हे देखील वाचा : Datta Jayanti 2023 : दत्त जयंती साजरी करण्याचे महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त
============
हे मंदिर खटाना गुर्जर घराण्याने बांधल्याचीही माहिती आहे. गुर्जर राजांची भगवान शंकरावर मोठी श्रद्धा होती. भगवान शंकराची रोज आराधना करण्यासाठी या मंदिराची निर्मिती करण्यात आली. गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिरभोज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेखही आहे. आता या मंदिराची अवस्था बिकट झाली आहे. मात्र पाकिस्तान सरकारनं या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे जाहीर केल्यामुळे पाकिस्तानमधील हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे.
सई बने…