Home » ‘क्रेन’ बेदी!

‘क्रेन’ बेदी!

by Correspondent
0 comment
Kiran Bedi | K Facts
Share

देशाच्या पहिल्या IPS ऑफिसर किरण बेदी यांना ‘क्रेन’ बेदी हे टोपणनाव का देण्यात आले होते?

१९८२ साली घडलेला हा प्रसंग. आशियाई क्रीडास्पर्धांचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. राजधानीसोबतच संपूर्ण देशासाठीही अत्यंत प्रतिष्ठेची आणि गौरवाची अशी ही गोष्ट होती. संपूर्ण जगभरात या शानदार सोहळ्याचं टेलिव्हिजन आणि इतर प्रसारमाध्यमांमधून प्रक्षेपण करण्यात येणार होतं. वर्षभरापासूनच राजधानी यासाठी जय्यत तयारीला लागली होती. ऑक्टोबर १९८१ मध्ये किरण बेदी (Kiran Bedi) यांची दिल्ली येथे डी. सी. पी. (वाहतूक) म्हणून नियुक्ती झाली होती. पहाणीअंती त्यांच्या लक्षात आले की, दिल्लीची वाहतूक म्हणजे एक भयानक ‘अस्वल’ आहे आणि त्याच्याशी आपल्याला सामना करावा लागणार आहे. वाहतुकीच्या आधीच असलेल्या गोंधळात शहरभर स्पर्धेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या एकोणीस स्टेडिअम्सची आणि फ्लाय ओव्हर्सची भर पडली होती. त्यांची बांधकामे चालू असल्यामुळे रस्ते बंद झाले होते आणि पर्यायी मार्ग तात्पुरते सुरू करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीची वाहतूक व्यवस्था नियंत्रणाबाहेर जाऊन पूर्णपणे कोलमडली होती. अशा परिस्थितीत नेमकी कोणत्या कामगिरीची आवश्यकता आहे हे किरण बेदींनी लक्षात घेतले.

दररोज रात्री आठच्या सुमाराला आपल्या पांढऱ्या ॲम्बॅसिडर गाडीमधून त्या दिल्लीच्या रस्त्यांवरून फेरफटका मारत असत, त्यांच्या गाडीला ध्वनिक्षेपक बसवलेला होता. सिग्नलच्या वेळा तपासून तिथल्या तिथेच चुकीची नोंद घेऊन चूक दुरुस्त करायला लावण्याचा त्यांनी सपाटा लावला होता. कुठलेही वाहन – जे रस्त्यावर असायला पाहिजे, ते जर रस्त्याच्या कडेला उभे असेल, तर चौकशी करून त्वरित ते वाहन हलवायला लावत. किरण बेदी मॅडम रोज दिल्लीच्या रस्त्यांवर येत आहेत, वाहतुकीच्या नियमांचा कुणी भंग केला तर ती गोष्ट निदर्शनास आणत आहेत, हे दृष्य त्या काळात दिल्लीमधल्या वाहनचालकांना नेहमी दिसायचे. ध्वनिक्षेपकामधून येणारा त्यांचा आवाज ऐकून सर्वांवर विशेष प्रभाव पडायचा!

Happy Birthday Kiran Bedi
Happy Birthday Kiran Bedi

रात्री साडेबारा वाजता शहराचा फेरफटका आटोपून ऑफिसमध्ये आल्यावरदेखील बेदी फायली काढून पुन्हा काम करायच्या. किंवा विविध खात्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग करीत असत. त्या दिवसांमध्ये दिल्ली महानगर पालिका (एम. सी. डी.) रस्ते आणि फ्लायओव्हर्स बांधण्याच्या कामात व्यग्र होती. दिल्ली इलेक्ट्रिक सप्लाय अंडरटेकिंग दिव्यांसाठी नवे खांब उभारण्यात आणि तारा टाकण्यात मग्न होते. रस्तेबांधणी आणि इतर प्रकल्पांसाठी लागणारी जागा मंजूर करून देण्याची जबाबदारी दिल्ली डेव्हलपमेंट ॲथॉरिटीकडे होती. या सर्व मंडळांच्यावर नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन, प्लॅनिंग अँड रिसर्च सेंटरचे व्यावसायिक सल्लागार डी. सन्याल होते. वाहतुकीसंबंधीच्या सर्व बाबी ते हाताळायचे. किरण यांना वाटत होते की, केवळ ड्रॉईंगरूममध्ये मीटिंग घेऊन सगळ्या गोष्टींची परिणामकारक कार्यवाही करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी सुचवले की, वाहन चालकांच्या प्रत्यक्ष वाहन चालवण्याचे नमुने बघावेत आणि रस्त्यांवरच त्यांच्या अचूकपणाची खात्री करून घ्यावी. सगळ्यांना ते पटले.

अधिकाऱ्यांचा एक गट भाड्याने ठरवलेल्या बसमध्ये चढायचा आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा. सगळे तिथल्या तिथेच निर्णय घ्यायचे आणि सुधारणा करायचे. अशा प्रकारे हे ‘चाकावरचे सरकार’ सरकारला जणू समांतर व्यवस्था म्हणून काम करत होते. त्यामुळे किरण यांच्या खात्यामध्ये आणि इतर विविध खात्यांमध्ये परस्पर संपर्कही साधला जात होता. निरनिराळ्या विभागांचे प्रमुख सतत एकत्रितपणे शहरात फिरत होते. १९८२च्या आशियाई क्रीडास्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी किरण बेदींनी घेतलेले परिश्रम आणि वाहतुकीसाठी आखलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी वाखाणण्याजोगे होते. चुकीच्या ठिकाणी पार्किंग हे दिल्ली शहराच्या वाहतुकीच्या त्रासाचे मूळ कारण आहे. यामुळेच वाहतुकीचा प्रश्न उग्र रूप धारण करत असे. (आजही तो तसाच आहे.)

kiran bedi
kiran bedi

किरण बेदींनी नेमक्या याच मर्मस्थानावर प्रहार केला. चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांना सरळ उचलून जवळच्या पोलीस स्टेशनवर पाठवण्यासाठी ठिकठिकाणी अनेक क्रेन्स कार्यरत केल्या. आणि याच गोष्टीचा परिणाम म्हणजे थोड्याच दिवसांनी त्यांना ‘क्रेन बेदी’ हे टोपणनाव मिळाले !

नियमभंग करणाऱ्या वाहनांवर यापुढे निव्वळ ‘चलान’ करायचे नाही तर त्यांना जागेवरच दंड करायचा यावर त्यांनी मुख्य भर दिला. दिल्लीच्या सरकार दरबारी प्रभाव असणाऱ्या वर्गाने याआधी अशा ‘चलान’ला कधीच दाद दिली नव्हती. अनेकदा तर पोलीस अधिकाऱ्याच्या समोरच ते ‘चलान’चे फाडून तुकडे करायचे आणि ‘तुम्हाला काय करायचे ते करा’ अशा वृत्तीने चालू लागायचे. पण जागेवरच जेव्हा दंड सुरू झाला, तेव्हा लोकांच्या लक्षात आले की हा काहीतरी वेगळाच खेळ आहे. व्यक्ती कितीही उच्च पदावरची असो, दबाव, मित्र कशाचाच काही उपयोग होत नसे. तिथे सगळे सारखेच. या गोष्टीचा व्हायचा तो परिणाम झालाच… लवकरच बेदींच्या विरोधात एक गट तयार झाला. मात्र तरीही किरण बेदी यांनी कोणतीही तडजोड केली नाही आणि कोणालाही सवलत दिली नाही.

१९८२ च्या ऑगस्टमध्ये खुद्द पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या गाडीवरसुद्धा (DHI 1817) ‘चलान’ केले गेले.

क्रीडास्पर्धा सुरू व्हायच्या एक दोन महिने आधी त्यांना निरनिराळ्या प्रलोभनांची ‘गाजरे’ दाखवण्यात आली. आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर जपानमध्ये जाऊन वाहतूक नियमनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ करण्यात आली. मात्र त्या काळात दिल्ली सोडून जायचा त्यांचा मुळीच विचार नव्हता त्यामुळे त्या नम्रपणे नकार देत असत.

Kiran Bedi
Kiran Bedi

“सगळ्या व्यवस्थेचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून तर तुम्हाला बाहेर पाठवायचे नव्हते?” असे एका मुलाखतीत विचारले असता, किरण म्हणतात, “क्रीडा स्पर्धांच्या दरम्यान वाहतूक व्यवस्थेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला असता तर? त्या वेळी मी असे उत्तर दिले असते का, की माफ करा मी आत्ताच जपान किंवा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून परतले आहे? माझ्या दृष्टीने त्यावेळी विदेश दौऱ्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यावेळी माझ्यासमोर एकच ध्येय होते आणि ते म्हणजे वाहतूक व्यवस्था इतकी सुरळीत ठेवायची की, कुणालाही त्यामुळे काही त्रास झाला अशी तक्रार करायला जागा उरू नये.”

अथक परिश्रम आणि काटेकोर नियोजनामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. वाहतूकव्यवस्थेची दखल सर्व माध्यमांतून घेतली गेली. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ४ डिसेंबर १९८२च्या अंकात लिहिले होते, “एशियन गेम्स – एक भव्य यश”.

परमेश डंगवाल यांच्या ‘आय डेअर’ या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.

शब्दांकन: धनश्री गंधे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.