अ. भा. विद्यार्थी परिषदेचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री… गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणातील थक्क करणारा प्रवास
—- श्रीकांत ना. कुलकर्णी
महाराष्ट्रातील भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना स्वर्गवासी होऊन पाहता पाहता सात वर्षे झाली. तीन जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या एका मोटार अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. एका वादग्रस्त आणि झुंजार लोकनेत्याची अशा पद्धतीने अखेर झाल्यामुळे साहजिकच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता आणि त्याचे प्रत्यंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आलेच. शोकसंतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यातूनच मुंडे यांच्या लोकनेतेपदाची प्रचिती येते.
अ. भा. विद्यार्थी परिषदेचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी केलेला राजकारणाचा प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. मराठवाड्यातील परळीजवळच्या नाथ्रा या छोट्या खेडेगावात बालपण घालविलेला, शाळेची इमारत नाही म्हणून झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेला गोपी नावाचा मुलगा पुढे चालून महाराष्ट्राचा एक लोकनेता होईल असे त्यावेळी कोणी सांगितले असते तर त्याला लोकांनी निश्चितच वेड्यात काढले असते. मात्र जिद्द, संघर्ष आणि झुंजार वृतीने केलेले राजकारण यांच्या आधारे गोपीनाथ मुंडे यांनी ‘लोकनेतेपद’ मिळवून दाखविले. आजही बहुजन समाजाचा एक आदरणीय नेता म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते.
परळीतील शालेय शिक्षणानंतर गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी म्हणून अंबेजोगाईत आले आणि तेथे प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा परिचय झाला. महाजन यांची भेट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली असेच म्हणावे लागेल. महाजन यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. त्यातूनच मुंडे यांचे नेतृत्व घडत गेले. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणलेली आणीबाणी महाजन आणि मुंडे यांच्या दृष्टीने जणू काही इष्टापत्तीच ठरली. तुरुंगवासात असताना दोघांनीही आपली वैचारिक बैठक पक्की केली. महाजन यांच्याशी असलेली त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली पुढे या मैत्रीचे नात्यातच रूपांतर झाले.
महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी मुंडे यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे मुंडे यांच्या कार्यकर्तृत्वाला आणखी वाव मिळाला. विद्यार्थी परिषदेनंतर जनसंघ युवा आघाडी, नंतर जनसंघ आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास महाजन यांच्याबरोबरच झाला. प्रमोद महाजन यांचे वैचारिक नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा दांडगा लोकसंपर्क असलेला बहुजन समाजाचा नेता यामुळे महाराष्ट्रात हळूहळू भाजपची पाळेमुळे रुजू लागली. एक काळ असा होता की महाजन-मुंडे यांच्याशिवाय महाराष्ट्रात भाजपचे पान हालत नसे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात सत्ता मिळविणे खूप अवघड काम आहे हे ओळखून शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षाच्या सहकार्याने आपण सत्ता मिळवू शकतो हे महाजन-मुंडे यांनी वेळीच ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेशी युती करण्याबाबत पुढाकार घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उभयतांशी असलेली खास मैत्री हा तर राजकारणातील चर्चेचा एक खास विषय होता. सेनेच्या मदतीने गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यात ‘संघर्ष-यात्रा’ काढून काँग्रेस सरकारविरुद्ध रान पेटवून दिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय १९९० साली महाराष्ट्रात प्रथमच भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेवर आले. आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. महाजन-मुंडे यांचे एक स्वप्न साकार झाले होते.
परंतु अनेकदा राजकारणात विरोधकांबरोबरच नियतीही उलटे फासे टाकत असते. प्रमोद महाजन यांची दुर्दैवी हत्या झाल्यामुळे आणि मारेकरी घरचाच निघाल्यामुळे मुंडे यांना लोकनिंदेला सामोरे जावे लागले. महाजन यांच्यासारखा आधारवडच अचानक गेल्यामुळे ते खूप खचले. त्यातच पक्षांतर्गत विरोधकांनी डोके वर काढायला सुरुवात केल्यामुळे काही काळ ते एकाकी पडले. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आपले महत्व त्यांनी कमी होऊ दिले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपतर्फे उभे असलेले मुंडे प्रचंड मतांनी निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र केंद्रीय मंत्री होण्यासाठी आणि महत्वाचे खाते मिळण्यासाठी मुंडे यांना तेथेही संघर्ष करावाच लागला.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन आठ-दहा दिवसही झाले नसतील तोच मुंबईला येण्यासाठी निघालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने अचानक घाला घातला आणि मोटार अपघातात त्यांचे दुर्देवी निधन झाले. एका संघर्षशील लोकनेत्याची अशी शोकांतिका झाली. त्यांच्या स्मृतीनिमित्त नुकतेच ३ जून रोजी परळी येथील गोपीनाथ गडावर झालेल्या एका खास कार्यक्रमात केंद्र सरकारतर्फे टपाल-पाकिटाचे अनावरण करून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली हेही नसे थोडके.
आधी प्रमोद महाजन, नंतर विलासराव देशमुख आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने केवळ मराठवाड्याची नाही तर महाराष्ट्राची हानी झाली हे कोणीही मान्यच करेल.
—- श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)