Home » वैष्णो देवीजवळील शिवखोरी गुहेचे रहस्य

वैष्णो देवीजवळील शिवखोरी गुहेचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
cavern mystery
Share

जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवीच्या मंदिराची देशातच नव्हे तर विदेशातही ख्याती आहे.  वैष्णोदेवीचे हे पवित्रस्थळ भक्तांनी कायम गजबजलेले असते.  मात्र या माता वैष्णो देवीच्या मंदिराजवळच आणखी एक पवित्रस्थळ आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराचे निवासस्थान असल्याचे मानले जाते.  वैष्णो देवीजवळच असलेल्या या रहस्यमयी गुहेचा नाव शिवखोरी गुहा असे आहे.  या गुहेमध्ये भगवान शंकर आपल्या संपूर्ण कुटंबासह राहत असल्याचा भक्तांचा विश्वास आहे.  याशिवाय ही गुहा डमरुच्या आकाराची असून, त्यामध्ये ठराविक अंतरापर्यंत भक्तांना जाता येते. मात्र गुहेच्या अंतिम टोकापर्यंत कोणालाही जाता येत नाही.  या गुहेचे एक टोक अमरनाथ गुहेसोबत जोडले गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच या रहस्यमयी गुहेबाबत शिवभक्तांमध्ये मोठी उत्सुकता आहे.  (cavern mystery)

जम्मू आणि काश्मिरमधील अमरनाथची गुहा ही भगवान शंकराचे मुख्य स्थान असल्याची भक्तांची धारणा आहे. मात्र यासोबत याच जम्मू आणि काश्मिरमध्ये भगवान शंकराचे असे स्थान आहे, ज्यामध्ये संपूर्ण शिवकुटुंब वास्तव्यास असल्याचे मानले जाते. ही सुद्धा एक मोठी गुहाच असून ही गुहा अमरनाथ गुहेसोबत जोडली गेल्याचीही माहिती आहे. मात्र या गुहेचे दुसरे टोक हे कुठे जाते, हे एवढ्या वर्षानंतरही शोधता आलेले नाही. कारण या गुहेमध्ये ठराविक अंतरावर गेल्यावर ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच गुहेच्या अंतर्गत भागात गेल्यावर दोन वाटा तयार होतात.  अत्यंत चिंचोळ्या अशा या वाटांमधीलच एक वाट अमरनाथ गुहेसोबत जोडली असल्याची माहिती आहे. असे असेल तर दुसरी वाट स्वर्गाचे द्वार म्हणून ओळखली जाते. (cavern mystery)  

जम्मू आणि काश्मीर मधील रियासी जिल्ह्यातील श्री शिव खोरी तीर्थ हे अत्यंत पवित्रस्थळ मानण्यात येते. भगवान शंकराचा वास या गुहेमध्ये असून भगवान शंकरांचे भक्त या गुहेमधील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरचा प्रवास करतात. ही शिवखोरी गुहा जम्मू शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या देणगीनं परिपूर्ण असाच आहे.  हा संपूर्ण डोंगराळ प्रदेश असून त्यामध्ये वनसंपदा भरपूर आहे. अत्यंत शांत आणि रम्य अशा या परिसरात भगवान शंकराचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे, ही भावनाच भक्तांसाठी मोठा आध्यात्मिक अनुभव देणारी आहे.  (cavern mystery) 

शिवखोडी गुहेची रचना नैसर्गिक आहे. या गुहेचे दुसरे टोक अमरनाथ गुहेबरोबर जोडले गेल्याची माहिती आहे.  शिवखोडी गुहेच्या आत भगवान शंकराच्या पूजेसाठी एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाला शिवखोडी शिवलिंग म्हणून ओळखले जाते. येथे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असून या शिवलिंगावर सतत अभिषेक होत असतो.  याच पवित्र स्थानावर प्रत्यक्ष भगवान शंकरानं हजारो वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि गणांसह या गुहेत वास्तव्यात आहेत, असे या शिवलिंगाची आराधना करणारे सांगतात. (cavern mystery)

या गुहेत जाण्यासाठीची वाट अत्यंत अरुंद आहे मात्र आत गुहा एवढी विस्तृत आणि मोठी आहे की, भाविक आश्चर्यचकीत होतात. या गुहेच्या आतल्या भागात दोन वाटा असून एक मार्ग अमरनाथ गुहेसोबत जोडला असून दुसरी वाट थेटस्वर्गात जाण्याचा मार्ग असल्याचेही सांगितले जाते.  एवढी रहस्यमयी गुहा कोणी आणि का तयार केली असा प्रश्न अनेकांना पडतो. तर ही रहस्यमयी गुहा भगवान शंकरानं भस्मासूर नावाच्या राक्षसापासून बचाव करण्यासाठी केली होती, याबाबत एक कथा सांगितली जाते. (cavern mystery)

भस्मासूर या राक्षसानं तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करुन घेतले. तसेच देवाकडे वरदान मागितले की, मी ज्याच्यावर हात ठेवेन तो जळून शंकराबरोबरच युद्ध करु लागला. रणसू येथे भगवान शंकर आणि भस्मासुर यांच्यात भयंकर युद्ध झाले. या युद्धामुळे या भागाला रानसू असे नाव पडले. युद्धादरम्यान भगवान शंकर भस्मासूराला त्यांनीच दिलेल्या वरदानामुळे मारु शकले नाही. मग भस्मासुरपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकरांनी पर्वतांमध्ये एक गुहा बनवली आणि त्यात ध्यानधारणा करु लागले. भगवान शंकरांनी  बांधलेल्या गुहेला शिव खोडी गुहा असे नाव पडले. पुढे भगवान विष्णुंनी मोहिनीचे रूप धारण करून भस्मासूराचा वध केला. भस्मासुर जाळून राख झाल्यानंतर भगवान शंकर या गुहेतून बाहेर आले. (cavern mystery)

=============

हे देखील वाचा :  ‘या’ मंदिरात रचले गेले महाकाली स्तोत्र

=============

खोरी म्हणजे स्थानिक भाषेत गुहा असा होतो.  या शिवखोरी गुहेत भाविकांना 130 मीटरपर्यंत जाण्याची परवानगी आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही पुढे जाऊ शकत नाही. ज्यांनी हे धाडस केले, ते कधीच परत आले नसल्याचे सांगितले जाते. गुहेचे प्रवेशद्वार सुमारे 20 फूट रुंद आणि 22 फूट उंच आहे. गुहेत प्रवेश करताना शेषनाग सारख्या विशाल सापाचे नैसर्गिक चित्र पाहायला मिळते. गुहेतील शिवलिंगही चार फूट उंचीचे आहे.  या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे, शिवलिंगाच्या अगदी वर, एक गायीसारखी आकृती आहे.  जी कामधेनू असल्याचे सांगितले जाते. या गुहेत माता पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदीच्या मूर्ती दिसतात. यासोबतच सात ऋषी, पांडव आणि राम-सीता, हनुमान यांच्या मूर्तीही आहेत. ही संपूर्ण शिवखोडी गुहा अनेक नैसर्गिक प्रतिमांनी भरलेली आहे.  या 33 कोटी देवतांच्या आणि त्यांच्या वाहनांच्या प्रतिमा असल्याची माहिती आहे.  गुहेच्या छताच्या मुख्य भागावर एक गोल चिन्ह आहे.  हे चिन्ह म्हणजे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राची आकृती असल्याची माहिती आहे.  या गुहेच्या दुस-या भागात महाकाली आणि महासरस्वती देवींचे स्थान आहे. या शिवखोरी गुहेचे रहस्य जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.  मात्र शिवशंकराची ही गुहा आजही अनेक रहस्यांनी भरलेली अशी आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.