माता पार्वतीनं जिथे तप केले त्या पार्वती कुंडाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी स्थानिक रान समाजातील कुटुंबांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधांनानी जो पोशाख घातला होता, त्याला रंगव्यथलो म्हणतात. माता पार्वतीची पूजा करताना आणि ध्यान करताना स्थानिक या पोशाखाला परिधान करतात. मुळात रान समाज हा या भागातील रक्षक समजला जातो. चीनच्या सिमेपासून अत्यंत जवळ असलेल्या या भागात भारतीय सेनेचा खडा पहारा असतो. पण पार्वती कुंड आणि तिथून दिसणा-या महादेवाच्या कैलास पर्वताची रखवाली करण्याचे काम पौराणिक काळापासून या रान समाजातील कुटुंब करीत आहेत. आता या भागात अवघी 30 रान कुटुंब आहेत. याच गावाचा आणि परिसराचा आता विकास होणार आहे. येथील पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न होणार असून त्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. पंतप्रधानांनी पार्वती कुंडाला भेट दिल्यावर या पार्वती कुंड आणि भगवान गणेशाची कथा याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Mount Kailash)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील जोलिंगकाँग येथील पार्वती कुंडा जवळील शिव मंदिरात पूजा केली. त्यांनी भोटिया जमातीचे कपडे परिधान केले आणि पार्वती कुंडात ध्यानधारणाही केले. पंतप्रधान मोदी यांनी पार्वती कुंडात रंगव्यथलो घालून ध्यान धारणा केली यामागे स्थानिक नागरिकांचा विश्वास आणि श्रद्धा आहे.
जोलिंगकाँग येथील पार्वती कुंडजवळ पंतप्रधान मोदींनी ध्यान केले तेथून आदि कैलास पर्वताचे (Mount Kailash) दर्शन शिवभक्तांना आता घेता येणार आहे. आतापर्यंत भारतीयांना भगवान शंकराचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी व्हिसा घेऊन तिबेटला जावे लागत होते. चिनचा या भागावर ताबा असल्यानं अनेक अटींना सामोरे जावे लागत होते. आता पिथौरागढमध्ये कैलास पर्वत पाहण्यासाठी व्ह्यू पॉइंट उपलब्ध करण्यात आला आहे. हा व्ह्यू पॉईंट जिथे आहे, ते गुंजी गाव अत्यंत लहान आहे.
मात्र त्याचे महत्त्व पौराणिक काळापासून आहे. याच गावात माता पार्वतीचे कुंड आहे. येथून चीनची सीमा 20 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून 14000 फूट उंचीवर असलेल्या गुंजी गावात फक्त 30 कुटुंबे राहतात. आता या गावाला शिवधाम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून यात्रेकरूंच्या निवासासाठी हॉटेल्स आणि प्रवासी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. धार्मिक सहली आणि साहसी पर्यटकांसाठीही हा परिसर अत्यंत रमणीय आहे. पिथौरागढ हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. हिमालय पर्वत आणि हिरव्यागार वन्यजीवांसाठी हा भाग प्रसिद्ध असला तरी, माता पार्वती कुंड हे या परिसराचे प्रमुख आकर्षण आहे. ज्या ठिकाणी हे पार्वती कुंड आहे तिथून 20 किलोमीटर अंतर गेल्यावर चीनची सीमा सुरू होते. त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. (Mount Kailash)
सैन्याच्या देखरेखीखाली येथे भाविक दर्शनासाठी येतात. यासाठी ऑनलाइन परवानगी घ्यावी लागते. आदि कैलास यात्रेला जाणारा प्रत्येक भाविक प्रथम पार्वती कुंडाला भेट देतो आणि मातेचा पुढील प्रवासासाठी आशीर्वाद घेतो. माता पार्वतीला प्रसन्न केल्याने भोले बाबांचा आशीर्वाद मिळतो अशी धारणा आहे. येथेच माता पार्वतीला समर्पित मंदिर आहे. पिथौरागढचे पार्वती कुंड हे प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी तपश्चर्या केली होती. या तलाव परिसरात प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासह स्वर्गातील देवतांचाही वास असतो. या कुंडात पौर्णिमा वा अन्य पावन दिवशी स्नान करण्यासाठी देवही पृथ्वीवर येतात, अशी स्थानिकांत धारणा आहे. या तलावात स्नान केल्याने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, असेही स्थानिक सांगतात. पार्वती कुंडाला सनातन धर्मात महत्त्व आहे. शिवपुराणातील कथांनुसार पार्वती कुंडाला गौरी कुंड असेही म्हणतात. या तलावात स्नान करण्यापूर्वी माता पार्वतीने गणेशाची निर्मिती करून त्याला जीवन दिले. मातेनं येथेच गणेशाला संरक्षक बनवून उभे केले होते. जेव्हा भगवान शंकर तलावाजवळ आले तेव्हा गणेशाने त्यांना अडविले. क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी गणेशाचे मस्तक कापले. माता पार्वतीला हे कळल्यावर तिनं विलाप केला. त्यामुळे भगवान शंकरांनी गणेशाला हत्तीचे मस्तक लावून जिवदान दिले. ही संपूर्ण घटना पार्वती कुंडातच घडल्याचे सांगितले जाते. (Mount Kailash)
आता हे पार्वती कुंड जिथे आहे, त्या गुंजी गावात शिवधाम विकास योजना राबवण्यात येणार आहे. कैलास व्ह्यू पॉइंट, ओम पर्वत आणि आदि कैलास दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी धारचुला नंतरचा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पॉंईंट ठरणार आहे. गुंजी गाव व्यास खोऱ्याच्या सुरक्षित भूमीवर आहे. या भागात भूस्खलन किंवा पुराचा धोका नाही. त्यामुळे येथे पर्यटनाचा विकास चांगल्या पद्धतीनं होण्याची अपेक्षा आहे.
============
हे देखील वाचा : दिवसभरात तीन रुपात दर्शन देणारी ‘ही’ माता !
============
या भागात राहणारे रान जमातीचे नागरिक भारताचे अघोषित संरक्षक आहेत. रान समुदाय अनेक दशकांपासून चीन सीमेवर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. रान समाजाचे लोक दरमा, व्यास आणि चौडांच्या खोऱ्यात राहतात. 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान, रण समाजाने दुर्गम भागात सैन्याला पुरवठा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये मन की बात कार्यक्रमात या समाजाचे कौतुक केले आहे.
सई बने