Home » नवसपूर्तीसाठी ‘या’ देवीला अर्पण करतात घोडे…

नवसपूर्तीसाठी ‘या’ देवीला अर्पण करतात घोडे…

by Team Gajawaja
0 comment
Devi Temple
Share

हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला जिल्हा आहेच.  शिवाय येथे अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत. याच कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचे महाभारत युद्ध लढले गेले.  भगवान श्रीकृष्णाने ज्योतिसार नावाच्या ठिकाणी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. कुरुक्षेत्राला ब्रह्मदेवाची यज्ञवेदी म्हटले जात असे. याच कुरुक्षेत्रामध्ये देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. या देवीला कुरुक्षेत्रातील माँ भद्रकाली म्हटले जाते. या मंदिरातच पांडवांनी युद्ध जिंकण्यासाठी देवीची आराधना केली होती. युद्धात विजय प्राप्त झाल्यास देवीला घोडे अर्पण करण्याचा नवस पांडवांनी केला.(Devi Temple)

महाभारतातील विजयानंतर पांडवांनी आपले घोडे देवीला अर्पण केले होते. तेव्हापासून या माँ भद्रकाली देवीला नवसपूर्तीसाठी घोडे अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली आहे. आता देवीला ख-या घोड्यांऐवजी घोड्यांच्या छोट्या मुर्ती अर्पण केल्या जातात.  यात अगदी सोन्यापासून ते मातीपर्यंतच्या घोड्याच्या मुर्ती असतात.  51 शक्तीपीठांमध्ये समावेश असलेले कुरुक्षेत्रातील माँ भद्रकाली देवीचे स्थान अत्यंत जागृत असून सध्या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या मंदिराची सजावट करण्यात येत आहे. त्यासाठी काही टन फुलांचा वापर करण्यात येत आहे. (Devi Temple)

कुरुक्षेत्रामधील मॉं भद्रकाली शक्तीपीठाबाबत पौराणिक कथा सांगण्यात येते. माता सतीचा तिच्याच वडीलांच्या घरी,  प्रजापती दक्ष यांच्या घरी अपमान होतो. आपल्यामुळे भगवान महादेवांचाही अपमान झाला, या भावनेनं माता सती स्वतःला अग्निला अर्पण करतात.  यामुळे क्रोधीत झालेले  भगवान शंकर माता सतीचे मृत शरीर घेऊन विलाप करत होते. यावेळी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे  भाग केले.  जिथे जिथे सतीचे अवयव पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली.  कुरुक्षेत्रातील श्रीदेवी विहीर येथे देवी सतीच्या उजव्या गुडघ्याखालील भाग पडला आणि येथे शक्तीपीठाची स्थापना झाली.  मंदिरात बांधलेल्या विहिरीत सतीचा उजवा घोटा पडला होता, त्यामुळे या मंदिराला श्री देवीकुप मंदिर असेही म्हणतात.  कुरुक्षेत्रातील माँ भद्रकाली हे स्थान अत्यंत जागृत असून ही देवी विरतेचे प्रतिक मानली जाते. (Devi Temple) 

महाभारताच्या युद्धापूर्वी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानं यात माता भद्रकालीची पूजा केली होती.  युद्धात विजयी झाल्यावर मी शक्तीपीठाच्या सेवेसाठी माझे सर्वोत्तम घोडे अर्पण करेन असा नवस अर्जूनानं केला होता.  युद्धानंतर अर्जुनानं आपल्याकडील पांढरे घोडे देवीला अर्पण केल्याची कथा येथे सांगितली जाते. तेव्हापासून देवीच्या मंदिरात घोडे अर्पण करण्याची पद्धत रुढ झाली आहे. आपला नवस पूर्ण झाल्यावर भाविक देवीला सोने, चांदी, तांबे, पितळी, कापडी आणि मातीचे घोडेही अर्पण करतात. 

मंदिरात माता भद्रकाली मातेची अत्यंत रेखीव मुर्ती आहे. शस्त्र सज्ज असलेली देवी शौर्याचे प्रतिक मानण्यात येते. देवीच्याच समोर भव्य असे कमळपुष्प आहे. मंदिराच्या बाहेर देवी तलाव आहे. या तलावाच्या एका बाजुला तक्षेश्वर महादेवाचे मंदिर आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम यांचा मुंडण सोहळा याच मंदिरामध्ये झाला असे पुराणात सांगितले आहे. नवरात्रामध्ये जसा देवी भद्रकालीचा उत्सव साजरा केला जातो, त्याचप्रमाणे माँ भद्रकाली मंदिरात रक्षाबंधन सोहळ्यालाही भाविक गर्दी करतात. या मंदिरात रक्षाबंधनाच्या दिवशी देवीचे भक्त देवीला राखी बांधतात. यामुळे आपले रक्षण करण्याची जबाबदारी देवी घेते, अशी भावना आहे. (Devi Temple)

===========

हे देखील वाचा : पांडवांनी बांधलेल्या ‘या’ मंदिराची गिनीज बुकमध्ये आहे नोंद

==========

देवी भद्रकालीची काली मातेच्या रुपातही पूजा केली जाते. भद्रकाली शक्तीपीठ हे सावित्री पीठ या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिरात असलेल्या कमळाच्या आकृतीमध्ये  माता सतीच्या उजव्या पायाच्या घोट्याची स्थापना केली आहे. पांढऱ्या संगमरवरामध्ये कोरण्यात आलेला हा देवीचा पाय बघण्यासाठी आणि त्याला वंदन करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. नवरात्रीच्या काळात या मंदिराला विशेष महत्त्व आहे. देश विदेशातील देवीचे भक्त या मंदिरात गर्दी करतात. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिराची रोज साजवट करण्यात येते. नवरात्रीमध्ये तब्बल चार टन देशी-विदेशी फुले आणि आठ क्विंटल फळांनी मंदिर सजवण्यात येते.  याशिवाय मंदिरावर आकर्षक रोषणाईही करण्यात येते.  नवरात्रौत्सव काळात या मंदिरात नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते. तसेच नऊ दिवस या भागात मोठी यात्राही भरते.  

सई बने  


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.