Home » कॉम्रेड डांगे ह्यांनी काय डावपेच खेळले आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली…?

कॉम्रेड डांगे ह्यांनी काय डावपेच खेळले आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली…?

by Correspondent
0 comment
Shripad Amrit Dange | K Facts
Share

भारतातील श्रमिक चळवळीचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा आज स्मृतिदिन. कॉम्रेड डांगे यांचा जन्म तसेच शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाले. लोकमान्य टिळकांना ते आपले राजकीय गुरू मानत. टिळकांच्या जहाल विचारांचा, व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. भारताच्या अगदी सुरुवातीच्या कम्युनिस्ट नेत्यांमध्ये श्रीपादजींचे खूप महत्वाचे स्थान आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘द सोशलिस्ट’ या वर्तमानपत्राचे प्रकाशन केले. डांगे हे लोकसभेचे सदस्य देखील होते.

माधव गडकरी (Madhav Gadkari) यांनी ‘संयुक्त महाराष्ट्राचे महारथी’ या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे, १९५७च्या निवडणुकीत मुंबईतील लोकसभेची जागा कॉ. डांगे यांना मिळाली होती. निवडणूक प्रचार मोहीम तसेच अनेक सभा कॉ. डांगे (Shripad Amrit Dange) यांनी आपल्या मिश्किल भाषणांनी गाजवल्या. मुंबईवर पकड ठेवण्याचा प्रयत्न भांडवलशहा करीत होते व त्यांच्या विरोधात कॉ. डांगे यांनी मुंबईच्या कामगाराला उभे केले होेते. कॉ. डांगे हे मुरब्बी राजकारणी. शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत कॉ. डांगे यांनी स्वतंत्र मुंबई राज्याला पाठींबा दर्शवला.

Shripad Amrit Dange
Shripad Amrit Dange

त्यामुळे कॉंग्रेस जन हादरून गेले. काकासाहेब गाडगीळ यांनी ताबडतोब डांगे यांना फोन केला. डांगे त्यांना म्हणाले, ‘काका मामला सरळ आहे. मुंबईचे ग्रीसमधील सिटी स्टेटप्रमाणे स्वतंत्र राज्य झाले तर या मुंबईवर डाव्या पक्षांचा लाल बावटा फडकलाच म्हणून समजा.’ हे ऐकल्यावर गाडगीळ तडक नेहरूंकडे गेले आणि डांगेंचे म्हणणे त्यांनी नेहरूंच्या कानावर घातले. कॉ. डांगे यांचे डावपेच अशा तऱ्हेने यशस्वी ठरले आणि दोनच दिवसात मुंबई (Mumbai) स्वतंत्र करण्याची भाषा बंद झाली. 

कॉ. डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक (Hutatma Chowk) निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ. डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा १ मे हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ. डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.

 Hutatma Chowk
Hutatma Chowk

‘संप करा, याबरोबरच संप करू नका, असा आदेश कामगारांना देऊ शकणारे दुर्मीळ नेते’ किंवा ‘संप सुरू व बंद करण्याची अचूक वेळ साधणारे कामगार नेते’ या शब्दांत कॉ. डांगे यांचे वर्णन केले जाते. १९७४ साली सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च असे ‘लेनिन पदक’ देऊन कॉ. डांगे यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या काव्यातून कॉम्रेड डांगे यांची महानता स्पष्ट होते.

घनतमात जळता तुम्ही ठेविला दीप। तो अमर जाहला इथे क्रांतीचा स्तूप।।
शिल्पकार तुम्ही नव्या युगाचे ‘श्रीपाद’। कंठात घुमतो अखंड तव जयनाद।।

शब्दांकन- धनश्री गंधे   


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.