श्रीकांत ना. कुलकर्णी
गेले दोन महिने साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अखेर ममतादीदींनी (Mamata Banerjee) बाजी मारली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष यावेळी निवडणूक हरणार आणि भाजप २०० जागा जिंकून प. बंगालमध्ये सत्तेवर येणार अशी जोरदार हवा भाजपतर्फे निर्माण करण्यात आली होती. त्यासाठी भाजपने आपल्या आक्रमक शैलीत ‘साम-दाम-दंड-भेद’ अशी आपली नेहमीची खास पद्धत अवलंबिली होती.
निवडणूक आयोगाने देखील ममतांच्या विरोधीच भूमिका घेतली होती. परंतु नेमके उलटे झाले आणि तृणमूल काँग्रेसनेच दोनशेहुन अधिक जागांचा टप्पा पार करीत (२१३) गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळविल्या आणि सत्तेची हॅटट्रिक पूर्ण केली.
भाजपला (BJP) ७७ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अवघे तीन उमेदवार निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाला मिळालेल्या ७७ जागा हे भाजपचे मोठे यश आहे हे मान्य करायलाच हवे. कारण प. बंगालसारख्या आधी डाव्या पक्षांच्या आणि नंतर तृणमूल काँग्रेसचा (TMC) बालेकिल्ला असलेल्या प. बंगालमध्ये मुसंडी मारणे निव्वळ अशक्य होते परंतु भाजपने ते यावेळी साध्य केले आहे. त्यामुळे एकदम सत्ता जरी मिळाली नसली तरी भाजपाला मिळालेल्या जागा लक्षात घेता हे त्या पक्षाने प. बंगालमध्ये केवळ चंचुप्रवेश नाही तर एक प्रमुख पर्यायी पक्ष म्हणून स्थान प्राप्त केल्याचे निदर्शक आहे.

या निवडणुकीचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असले तरी स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मात्र ‘नंदीग्राम’ मधून पराभूत झाल्या त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी तृणमूल काँग्रेसची अवस्था झाली आहे.
=====
हे देखील वाचा: ”साम-दाम-दंड-भेद’ ने गाजली ‘नंदीग्राम’ची निवडणूक”
=====
एकीकडे संपूर्ण राज्यात ममतांचे वारे असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत असताना नंदिग्राममधून ममता बॅनर्जी पराभूत होतात हा खरे तर चमत्कारच म्हटला पाहिजे. त्यामुळे संशयही निर्माण झाला आहे. त्यामुळे या निकालाविरुद्ध तृणमूल आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. त्याचा काहीही निकाल लागो ममता बॅनर्जींच प. बंगालच्या पुन्हा मुख्यमंत्री होतील यात शंका नाही.
२०१४ साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात सत्ता हस्तगत केल्यापासून भाजपला निवडणुका जिंकण्याची चटकच लागली. एकेका विरोधी पक्षाला नेस्तनाबूद करीत भाजपने आपली विजयी वाटचाल चालू ठेवली होती. केंद्राबरोबरच देशातील अनेक राज्यात भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केली मात्र उत्तर भारतातील प. बंगाल सारख्या प्रमुख राज्यात तृणमूल काँग्रेसचा गड अभेद्य होता.
शिवाय प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध असहकाराचे धोरण स्वीकारले होते. ”नरेंद्र मोदी यांना मी पंतप्रधान मानतच नाही” असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ममतादीदींचा हा गड उद्धवस्त करण्याचा भाजपने चंगच बांधला होता. त्यासाठी भाजपने साम -दाम -दंड -भेद या नीतीचा सर्रास अवलंब केला. निवडणुकीच्या काळात त्याचे अनेकवेळा प्रत्यंतरही आले.

तृणमूल काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपने निवडणुकीच्या आधीच त्या पक्षाला खिंडार पाडण्यास प्रारंभ केला होता. मुकुल रॉय, शुवेंदू अधिकारी, दिनेश त्रिवेदी यांच्यासारख्या ममतादीदींच्या अगदी जवळच्या नेत्यांना भाजपमध्ये पावन करून घेण्यात आले. निवडणुकीत देखील तृणमूल मधून भाजपमध्ये आलेल्यांना प्राधान्याने तिकिटे दिली. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तृणमूल काँग्रेस विरुध्द भाजपमध्ये नव्याने आलेले तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असाच सामना झाला. यामुळे भाजपमध्ये सुरुवातीपासून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी भाजपला भोवली. आणि मतदारांनाही हा प्रकार आवडला नसल्याचे निकालात दिसून आले. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच या विचाराने पछाडलेल्या भाजपने बाबूल सुप्रियोसारख्या केंद्रीय मंत्र्यांसकट चार विद्यमान खासदारांना पक्षातर्फे उमेदवारी दिली मात्र त्या सर्वांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला.
याशिवाय पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदाचा सन्मान न राखता नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना ”दीदी, अरे वो दीदी …..” अशा प्रकारची ममतादीदींची अवहेलना करणारी भाषा वापरली. तसेच भाजपनेत्यांनी प्रचार सभेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाला नाही. उलट तृणमूलने ‘जय श्रीराम’ घोषणेला ‘जय बांगला’ असे प्रत्युत्तर दिले त्यामुळे बंगालच्या अस्मितेचा मुद्दा पुढे आला आणि मतदारांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला मुस्लिमांबरोबरच हिंदू मतदारांचीही मोठ्या प्रमाणावर मते मिळाली.

या विधानसभा निवडणुकीत हिंसाचारही मोठ्या प्रमाणावर झाला. भाजप आणि तृणमूलने एकमेकांना बदनाम करण्यासाठी त्याचा फायदा करून घेतला. निवडणुकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका प्रचार सभेला जाताना त्यांचा एक पाय जायबंदी झाला मात्र नंतर पायाला प्लॅस्टर घातलेल्या अवस्थतेच त्यांनी व्हील चेअरवरून सर्वत्र प्रचार करून मतदारांची मने जिंकली. एखादी जखमी वाघीण प्रतिपक्षावर कशी चवताळून उठते त्या अविर्भावाने ममतादीदींनी भाजपच्या दांडगाईला उत्तर दिले. आणि आपली ‘अँग्री वुमन’ ही प्रतिमा त्यांनी पुन्हा साकार केली त्यामुळे तृणमूल काँग्रेसला विजय सुकर झाला.
विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष पार भुईसपाट झाले. दोन्ही पक्षांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. एकेकाळी ज्या प. बंगालमध्ये डाव्या पक्षांमुळे (माकप आणि भाकप) भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला पाय ठेवणे देखील मुश्किल झाले होते तेथे आज डाव्या पक्षांचे पूर्ण पानिपत झाले तर एक पर्यायी पक्ष म्हणून भाजपने आपले पाय भक्कमपणे रोवले. एकूणच प. बंगालची निवडणूक सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे केवळ तृणमूल काँग्रेसने बलाढ्य भाजपला टक्कर देत आपला गड कायम राखला या एकाच निष्कर्षाने तिच्याकडे पाहिले जाऊ नये. तृणमूलच्या प्रचंड विजयामुळे भाजपविरोधी पक्षांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे हे मात्र निश्चित.
—– श्रीकांत ना. कुलकर्णी (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)