सध्या अधिक महिना चालू झाला आहे. त्यापाठोपाठ श्रावण महिना सुरु होत आहे. या दोन्हीही महिन्यात भगवान शंकराची पूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात येते. काही ठिकाणी भगवान शंकराला रुद्राभिषेक करण्यात येतो, तर काही ठिकाणी बेलांच्या पानांचा अभिषेक शिवलिंगावर करण्यात येतो. पण यासोबत आणखी एक फूल वाहून शंकराची पूजा केली जाते, हे फूल अतिशय दुर्मिळ असून त्याचा आकार शिवलिंगासारखाच आहे. या फूलाला नागकेसराचे फूल असे म्हटले जाते. नागकेसराच्या या फुलाला अनेक नावानं ओळखलं जातं. या फुलाचा आकार शिवलिंगासारखा आहे. त्याच्या पाकळ्या या फणा असलेल्या सर्पासारख्या दिसतात. त्यामुळे या फुलाला शिवलिंगम फूल म्हणूनही ओळखले जाते. हे शिवलिंगम फूल अतिशय दुर्मिळ आहे. या फुलाचे झाड जेव्हा बहरते तेव्हा त्याच्या खोडापासून ही फुले धरतात. पण या फुलांचा सुगंध अतिशय तिव्र असतो. त्यामुळेच या फुलांच्या मुळामध्ये सापाचे वास्तव्य असते, असेही सांगण्यात येते. मात्र हे फूल भगवान शंकराचे सर्वात लाडके फूल आहे, असे सांगण्यात येते. या फूलाला आयुर्वेदिक महत्त्वही आहे. (Ceylon Ironwood)
निसर्गानं निर्माण केलेल्या अनेक अशा वस्तू आहेत, ज्यांचा आकार मनुष्याला प्रेमात पाडतो. त्यापैकीच एक म्हणजे हे शिवलिंगम फूल(Ceylon Ironwood) . सापाच्या फण्यांनी झाकलेल्या शिवलिंगाच्या आकारासारखे हे फूल अनेक नावांनी ओळखले जाते. त्याला शिवकमल फूल म्हणतात. दक्षिण भारतात या फुलाला नागलिंगम फूल तर बंगालमध्ये नागकेसर फूल म्हणतात. हे फूल दिसायला अतिशय सुंदर असले, तरी ते मिळवण्यासाठी अतिशय जोखीम घ्यावी लागते. कारण ही शिवलिंगम फुलाची झाडे उंच असतात. त्यावर चढून फुलं काढणे कठीण असते. शिवाय या शिवलिंगम झाडाला फळेही मोठी येतात. ही फळे वटवाघुळांना आवडतात. त्यामुळे या झाडांवर अनेकवेळा वटवाघळांची वस्ती असते. तसेच शिवलिंगमची फुले रात्री उमलातात आणि ती उमलतांना येणारा वास हा अतिशय तीव्र असतो. त्यामुळे या वासासाठी सापांचे वास्तव्य या झाडाच्या मुळाशी असते, असे सांगण्यात येते. या दोघांच्या भीतीमुळे या झाडावर चढण्यासाठी शक्यतो कोणीही तयार नसते. (Ceylon Ironwood)
साधारण 3 मीटर उंचीच्या या झाडाची रचनाच वेगळी आहे. कारण या झाडाला पानंही गुच्छांसारखी असतात. त्याची फुलंही तशीच गुच्छांमध्ये उमलतात. फुलांचा बहर चालू झाल्यावर संपूर्ण झाडच फुलांनी सजून जातं. विशेष म्हणजे एका झाडावर एका दिवसात 1000 पेक्षा जास्त फुले उमलू शकतात. या फुलांमध्ये अनेक रंग असतात. गुलाबी, जांभळा, पिवळा अशा रंगांनी हे फुल अधिक उठावदार दिसते. या झाडाच्या बाबतीत अनेक चमत्कार असल्याचे मत आहे. या झाडांची पानं अचानक गळून जातात. पण पुन्हा सर्व पानं आठवडाभरात येतातही. औद्योगिक कारखाने ज्या भागात आहेत, त्या भागातील शिवलिंगमच्या वृक्षांची पाने लवकर काळी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यावरुन हे झाड पर्यावरणपूरक असल्याचे मत आहे. या शिवलिंगमच्या झाडावर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. या शिवलिंगम फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. उच्च रक्तदाब, वेदना आणि जळजळ यामध्ये फुलांचा अर्क वापरला जाते. तसेच सर्दी आणि पोटदुखी, जुन्या जखमा भरण्यासाठी देखील केला जातो. (Ceylon Ironwood)
या वृक्षाला परदेशात कॅनन बॉल ट्री म्हणतात. कारण या झाडांची फळे आकारांनी एखाद्या तोफगोळ्यासारखी असतात. ही फळे जमिनीवर पडल्यास त्याचा आवाज येतो. ही फळे खाण्यासाठी या झाडावर वटवाघुळांची गर्दी असते. सहा पाकळ्याचे शिवलिंगम फूलही मोठे असते. साधारण एका कमळाच्या आकाराइतके हे फूल मोठे असते. त्याच्या पाकळ्यांचा रंग लालसर गुलाबी असतो. तर मध्ये शिवलिंगाच्या आकारातील परागकण, पिवळ्या रंगाचे असतात. ॲमेझॉनच्या जंगलात या झाडांचे मुळ असल्याचे सांगण्यात येते. (Ceylon Ironwood)
=========
हे देखील वाचा : बृहदेश्वर मंदिराच्या रहस्यमय गोष्टी
==========
भारतात आता या शिवलिंगमच्या फुलांवर संशोधन सुरु आहे. या फुलांमध्ये काही अभ्यासकांना नैराश्यविरोधी गुणधर्म आढळले आहेत. तर फळांच्या अर्कामध्ये ई-कोलाई, बॅसिलस आणि स्टॅफिलोकस यांसारख्या रोगजनकांच्या विरूद्ध बॅक्टेरियाविरोधी क्रिया आढळली आहे. तामिळनाडूमधील संशोधकांना फुलांच्या अर्कांमध्ये लक्षणीय, शक्तिशाली अँटीपॅरासाइट आढळले आहेत. ब्राझिलियन संशोधकांना या शिवलिंगम वृक्षाच्या पानांमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आढळले आहेत. त्वचा सदैव तरुण ठेवण्यासाठी या शिवलिंगमच्या फुलांचा अर्क उपयोगी येतो, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एकूण शिवलिंगासारखी दिसणारी शिवलिंगम फुले भगवान शंकराला प्रिय आहेत. मात्र या फुलांवर अधिक संशोधन झाल्यास त्यातील औषधी गुणधर्माची माहितीही होणार आहे.
सई बने