तुमचं वय काय? हा प्रश्न बहुधा कोणालाही आवडत नाही. आपण जेवढ्या वयाचे असतो, त्यापेक्षा थोडं वय कमी असतं तर? हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो. अशा सर्वांसाठी एक बातमी आली आहे, ती म्हणजे, जगातील एका देशानं चक्क त्यांच्या नागरिकांचे वयच कमी केले आहे. एका रात्रीत या देशातील नागरिकांचे वय दोन वर्षांनी कमी झाले आहे. पहिल्यांदा ही बातमी ऐकल्यावर वाटलं असे उलटपलट नियम आणणारा देश जगात एकच आहे, तो म्हणजे उत्तर कोरिया. पण यावेळी दक्षिण कोरिया या देशानं असा काहीसा वेगळा नियम आणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दक्षिण कोरियामध्ये एक नवा नियम लागू करण्यात आला आणि एका रात्रीत नागरिकांचे वय दोन वर्षांनी घटले. आता दक्षिण कोरियाच्या सर्व नागरिकांचे सरकारी सर्व कागदपत्रांवर वय कमी करण्यात येणार आहे. यात अगदी जन्मदाखल्यापासून ते शाळाप्रवेश असा सगळाच बदल करण्यात येणार आहे. एका नियमानं दोन वर्षाचं वय कमी कसं झालं हे नक्की जाणून घेण्यासारखं आहे. (Age Decreasing)

याला मुख्य कारण म्हणजे दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याची पारंपरिक पद्धतच बदलली आहे. दक्षिण कोरियामध्ये पारंपारिक कालगणनेचा वापर केला जात होता. मात्र आता जगासोबत चालत असलेल्या या देशानं जगभर वापरल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. जगभर मान्य असलेली पद्धती स्विकारल्यावर आता सर्वच नागरिकांचे वय कमी करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी मोठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या निर्णयाचा फायदा दक्षिण कोरियातील 51 दशलक्ष नागरिकांना झाला आहे. (Age Decreasing)
दक्षिण कोरियामध्ये जन्माला आल्यावर मूल एक वर्षाचे मानले जाते. एवढेच नाही तर प्रत्येक जानेवारी हे वर्ष म्हणून जोडले जाते. अशा प्रकारे, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जन्मलेले मूल मध्यरात्री दोन वर्षांचे होते. हा नियम दक्षिण कोरियात जरी असला तरी तेथील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रत्य़क्ष असलेल्या वयापेक्षा त्यांचे वय दोन वर्षांनी अधिक दाखवण्यात येत असे. त्यामुळे त्यांना अपेक्षित अशा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी अडजण येत होती. तसेच जगभर फिरणा-या अनेक दक्षिण कोरियाच्या नागरिकांच्या पासपोर्टमधील तक्रारीही वाढत होत्या. यासर्वांमागे दक्षिण कोरियाची पारंपारिक कालगणना आहे, हे स्पष्ट होते. ती पद्धती बदलून जगभर प्रचलित कालगणना अवलंबावी अशी मागणी होती. डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने नियमांमधील दुरुस्तीला मंजुरी दिली. वयाची गणना करण्यासाठी स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय पद्धतीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल, अशी हमी संसदेनं दिली. यासंदर्भात अध्यक्ष यून सुक-येओल यांनीही वयाच्या मानकांमध्ये सुधारणा केली जाईल असे वचन दिले होते. त्यानुसारच हा बदल करण्यात आल्याचे कायदे मंत्री ली वानक्यु यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण कोरियामध्ये वयासंदर्भात अनेक तक्रारी दाखल होत होत्या. आता वयाची पद्धत बदलल्यामुळे निर्माण होणारे कायदेशीर वाद, तक्रारी आणि सामाजिक गोंधळ बऱ्याच अंशी कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. (Age Decreasing)
पारंपारिक वय मोजण्याची पद्धत बदलण्यापूर्वी दक्षिण कोरियामध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 86 टक्के दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी नवीन कायद्याचे समर्थन केले होते. हा बदल दक्षिण कोरियाच्या प्रगतीमध्ये नवी उर्जा देईल, असेही अनेकांना मत व्यक्त केले आहे. (Age Decreasing)
=========
हे देखील वाचा : 5 एप्रिलला येणार बस्तर नावाचे वादळ
=========
हा बदल झाल्यामुळे दक्षिण कोरियाच्या शाळांमध्ये सहा वर्षाच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. पूर्वी जी मुलं पाच वर्षाची होती, त्यांना हा प्रवेश देण्यात येत होता. दक्षिण कोरियात वयाची 19 वर्षे पूर्ण केलेल्यांना अल्कोहोल खरेदी करता येते. पण आता खरोखरच ज्यांनी वयाची 19 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना अल्कोहोल विकत घेता येणार आहे. दक्षिण कोरियामध्ये लष्करी शिक्षण गरजेचे आहे. त्यांच्यासाठीही हा नियम फायदेशीर ठरणार आहे. चीन, जपान आणि उत्तर कोरिया या देशांनी वेढलेल्या दक्षिण कोरियाच्या या नियमाची दखल जगभर घेतली गेली आहे. महासत्ता म्हणून दक्षिण कोरियाकडे बघितले जाते. आशियातील चौथा आणि जगातील 12 वा श्रीमंत देश आहे. मोटार वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रसामग्री आदींच्या उत्पादनात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया हा संयुक्त राष्ट्रसंघ, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना आणि जागतिक व्यापार संघटना यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.
सई बने