कर्सन देवजीभाई घावरी म्हणजे कर्सन घावरी यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1951 रोजी गुजराथमधील राजकोट येथे झाला. कपिल देव यांच्या आधी जवळजवळ तीन वर्षे कर्सन घावरी यांनी कसोटी कारकीर्द सुरु केली होती. डावखुरे कर्सन घावरी जेव्हा गोलंदाजी करण्यास येत तेव्हा त्यांचा लांब रन अप बघण्यासारखा असेल. आपल्या देशाकडून 100 विकेट्स घेणारे ते पहिले वेगवान गोलंदाज होते.
त्यावेळी भारतीय संघाकडे फारसे जलद गोलंदाज नव्हते कारण ते पीक वेस्ट इंडिजमध्ये भरमसाठ उगवत असे. त्यावेळी भारतीय संघात स्पिन, गुगली गोलदाजाचा भरणा खूप होता तेव्हा कर्सन घावरी यांनी जलद गोलंदाजीकडे जास्त लक्ष दिले. 1976-77 नंतर सुनील गावस्कर यांनी जलद गोलंदाजीवर जास्त भर दिला होता अर्थात त्यामध्ये कपिल देव यांचाही समावेश झाला. सुनील गावस्कर यांचे म्हणणे असे होते की जेव्हा चेंडू नवीन असेल तर त्याचा फायदा जलद गोलंदाजाला प्रथम होतो आणि तसा त्याने तो उठवला पाहिजे म्ह्णून त्यांनी जलद गोलंदाजीला महत्व दिले होते.
कर्सन घावरी (Karsan Ghavri) यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना 22 डिसेंबर 1974 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इडन गार्डेनवर कोलकता येथे खेळला तेव्ह्स वेस्ट इंडिजचा कप्तान क्लाईव्ह लॉईड होता तेव्हा कर्सन घावरी यांनी दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी एक विकेट घेतली होती. जेव्हा भारतीय संघ 1977 मध्ये गेला असताना ऑस्ट्रेलियाच्या जलद खेळपट्टीवर गोलंदाजी कराताना मदनलाल, मोहिंदर अमरनाथ त्यांच्याबरोबर होते .
असेच एकदा मुंबईला खेळताना बिशनसिग बेदी कप्तान होते त्यांना दुखापत झाली तेव्हा ते ड्रेसिंग रूममध्ये गेले सहाजिक तात्पुरते कप्तानपद सुनील गावस्कर यांच्याकडे आले तेव्हा सुनील गावस्कर यांनी कर्सन घावरी यांच्या हातात चेंडू देत सांगितले तू स्पिन गोलंदाजी कर आणि कर्सन घावरी यांनी स्पिन गोलंदाजी केली, त्यांनी 35 धावा देऊन 5 विकेस घेतल्या होत्या. तेव्हा बिशनसिंग बेदी यांनी त्यांना गमतीत म्हणाले होते तू तुझ्या गोलंदाजीकडे लक्ष दे स्पिन चेंडू टाकू नकोस, तू स्पिन टाकू लागलास तर आमचे काय? अर्थात या सांगण्यात थट्टा होती. परंतु घावरी यांनी ते पण शक्य करून दाखवले होते. खरे तर त्यावेळी खेळपट्टीवर धूळ असल्यामुळे खेळपट्टी खराब झालेली होती. घावरी यांच्या गोलंदाजीवर खेळताना फलंदाज निश्चित गोधळला असणार कारण खराब खेळपट्टीमुळे कधी चेंडू वळत असे तर कधी सरळ जात असे. कर्सन घावरी यांनी ग्रेग चॅपल याची शून्यावर घेतलेली विकेट कोणीही विसरू शकत नाही, सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य, ‘काय बॉल घुसला होता.’
1978-79 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दूरवर गेला असताना घावरी यांच्यावर चेंडू ‘चक’ करण्याचा आरोप झाला होता. त्यावेळी तीन दिवसाच्या सामन्यात इंग्लंडचे तीन फलंदाज लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात घावरी यांच्या गोलंदाजीमुळे जखमी झाले होते. त्यावेळी रिची बेनॉ, टोनी ग्रेग आणि काही मंडळींनी घावरी चेंडू गोलदाजी करताना फेकतात असा आरोप केला होता परंतु पुढे पाच सहा कॅमेरे लावून त्यांची गोलंदाजी तपासण्यात आली तेव्हा ते चेंडू ‘चक’ करत नाहीत हे सिद्ध झाले.
कर्सन घावरी यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 6 मार्च 1981 रोजी न्यूझीलंड विरुद्ध ख्राइस्टचर्च येथे खेळला. त्यांनी ३९ कसोटी सामन्यात 913 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी दोन अर्धशतके केली तसेच त्यांची सर्वात जास्त धावसंख्या होती 86 धावा तसेच त्यांनी 109 विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये 33 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यांनी 19 एकदिवसीय सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आणि 40 धावात 3 खेळाडू बाद केले. त्याचप्रमाणे कर्सन घावरी यांनी 159 फर्स्ट क्लास सामान्यत 4500 धावा केल्या आणि एक शतक आणि 24 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 102 धावा तसेच त्यांनी 59 झेलही पकडले. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 452 विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये त्यांची 4 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या. कर्सन घावरी यांच्यानंतर त्यांची जागा मदनलाल यांनी घेतली. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट 1969 ते 1985 पर्यंत खेळले. त्यांना त्यांचे सहकारी आणि चाहते कडूभाई या नावाने संबोधतात.
- सतीश चाफेकर