Home » यशस्वी जयस्वाल!

यशस्वी जयस्वाल!

by Team Gajawaja
0 comment
Yashasvi Jaiswal
Share

जवळपास ४८ च्या सरासरीने १४ सामन्यांत ६२५ रन्स. यामध्ये ६ अर्धशतके अन एक शतक. सहा अर्धशतकांपैकी एक अर्धशतक फक्त १३ चेंडूत आलेलं, यामुळे आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लागलेली वर्णी. भल्याभल्या खेळाडूंना जे जमत नाही ते या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालने अगदी ‘यशस्वी’पणे करून दाखवलं. जॉस बट्लर, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर अशा तगड्या फलंदाजांचा भरणा असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचा कणा यशस्वी जयस्वालने सांभाळला. आडेतेडे फटके न मारता, अगदी अचून आणि नेमाकेपणाने क्रिकेटिंग शॉट्स खेळत, त्याने आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. आयपीएल ही स्टार बनवणारी प्रतियोगिता आहे असं बऱ्याचदा म्हंटल जातं आणि यशस्वी जयस्वालच्या बाबतीत ते अगदी खरं ठरलं. आयपीएलनंतर तो स्टार झाला.
उबर सारख्या ब्रँडने त्याच्या स्ट्रगलची जाहिरात केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी त्याची स्टँडबाय म्हणून निवड झाली. आयपीएलचा हा हंगाम यशस्वीला आंतरारष्ट्रीय ओळख मिळवून देणारा ठरला. एका हंगामानंतर जरी त्याचं नशीब पालटलं असलं तरी याची तयारी मात्र तो मागच्या तेरा वर्षांपासून करत आलाय.(Yashasvi Jaiswal)

यशस्वी मुळचा उत्तरप्रदेशचा. सुरीयावान, बादोही येथे त्याचा जन्म झाला. एकूण सहा भावंडांपैकी तो चौथ्या नंबरचा. आई घरकामात व्यस्त असणारी तर वडिलांचे छोटेसे हार्डवेअरचे दुकान. टिपिकल मध्यमवर्गीय परिस्थिती. अशा परिस्थितीत दहा वर्षांच्या यशस्वीने आपल्या आवाक्याबाहेरचं स्वप्न बघायला सुरुवात केली. जिथे नाकासमोरचा मार्ग स्वीकारत, पोटापाण्यासाठी छोटा मोठा धंदा टाकायचा हाच सगळ्यांचा विचार, तिथे यशस्वीने हातात बॅट घेत आपल्या स्वप्नांच्या मागे धावणे पसंत केले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आपलं घरदार सोडून तो मुंबईला आला. आझाद मैदानावर क्रिकेट शिकता यावं, स्वतःला घडवता यावं म्हणून अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने सगळं सोडून मुंबईच्या दिशेने धाव घेतली होती. दादर येथे आपल्या काकांसोबत राहत त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.(Yashasvi Jaiswal)

सुरुवातीचे काही दिवस मुंबई समजून घेण्यात, इथे स्वतःला रुळवून घेण्यात निघून गेले. क्रिकेटचा सराव सुरु होताच. दादर ते आझाद मैदान, हा रोजचा प्रवास खूप वेळखाऊ आणि थकवणारा होत चालला होता. त्याची बरीचशी शक्ती या प्रवासातच खर्च होऊन क्रिकेटकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. इथे परत त्याने अजून एक धाडसी निर्णय घेतला. आपल्या काकांचे घर सोडून, आपल्या स्वप्नांचा बोजवारा घेवून त्याने कळबादेवी इथे आपलं बस्तान मांडलं. एका डेअरीमध्ये काम करण्याच्या बदल्यात तिथे त्याची राहण्याची व्यवस्था झाली. पुन्हा त्याच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला. आपला बराचसा वेळ आणि शक्ती क्रिकेट सरावातच खर्च होत असल्याने त्याला डेअरीच्या कामाकडे लक्ष देता येईनासे झाले आणि हेच कारण पकडत डेअरी मालकाने त्याला रूमबाहेर काढलं. तो पुन्हा बेघर झाला, पण जिद्द अजून कायम होती. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही अगदी मनापासून प्रयत्न करत राहिलात तर प्रत्येक अडचणींवर कुठला न कुठला मार्ग निघतोच. घर नसलेल्या यशस्वीला पुन्हा घर मिळालच. यावेळी त्याच्या मदतीला आझाद मैदानाचे सहकारी आणि त्याचा एक मित्र धावून आले आणि आझाद मैदानावरील टेंट मध्ये त्याची राहण्याची व्यवस्था झाली. तो आझाद मैदानावरील त्या टेंटस मध्ये राहू लागला. मन लावून क्रिकेट खेळू लागला. आपला मुलगा असा टेंटमध्ये राहतोय म्हणल्यावर कुठल्याही आईवडिलांना काळजी वाटणे साहजिकच. मुलाच्या चिंतेपोटी कित्येकदा तु घरी परत ये म्हणून त्याच्या आईने यशस्वीला विनवणी केली. तो मात्र मागे हटला नाही. सकाळी उठलं की माझ्या डोळ्यासमोर क्रिकेट असत, अजून मला काय हवंय ? म्हणत त्याने माघारी जायला स्पष्ट नकार दिला.(Yashasvi Jaiswal)

एके दिवशी आझाद मैदानावर सगळ्या खेळाडूंची प्रक्टिस सुरु होती. सगळे गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत कुठल्याही बॅटरचा निभाव लागू देत नव्हते. ज्वाला सिंग, जे सांताक्रूझला क्रिकेट अकॅडमी चालवतात, ते त्या धडपडणाऱ्या फलंदाजांना बघत होते. तेवढ्यात यशस्वी फलंदाजीला आला अन अगदी मोकळेपणाने फटकेबाजी करायला लागला. जिथे कुठल्याही फलंदाजांचा निभाव लागत नव्हता तिथे हा मात्र अगदी सहजपणे चेंडूला आपल्या मनाप्रमाणे टोलवत होता. ज्वाला सिंगनी ते बघितलं. तो कोण आहे ? चौकशी केली. त्याच्या जिद्दीबद्दल, त्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आली. हे टॅलेंट वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणत त्यांनी त्याला आपल्या मार्गदर्शनात घडवायचा निश्चय केला. जवळपास तीन वर्षे टेंटस मध्ये काढल्यानंतर यशस्वी तिथून बाहेर पडला. ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे त्याने सुरु केले. त्याच्या खेळासोबतच त्याच्या मानसिकतेवरदेखील काम करायला ज्वाला सिंग यांनी सुरुवात केली. त्यांचे योग्य मार्गदर्शन आणि यशस्वीच्या मेहनतीने अखेर रंग दाखवाला. २०१५ मध्ये पहिल्यांदा तो प्रकाशझोतात आला. गाईल्स शिल्ड आंतरशालेय स्पर्धेत जयस्वालने नाबाद राहत तब्बल ३१९ धावा ठोकल्या. त्याचबरोबर ९९ धावांच्या मोबदल्यात १३ बळी आपल्या नावे केले. या कामगिरीची दखल खुद्द लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. भारतीय क्रिकेटपटलावर यशस्वीचं नाव पहिल्यांदा एवढ्या ठळकपणे झळकलं. ही तर सुरुवात होती.(Yashasvi Jaiswal)

मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाकडून त्याने खेळायला सुरुवात केली. इथेही चांगली कामगिरी. आपली दखल घ्यायला लावत तो थेट भारताच्या एकोणवीस वर्षाखालील संघाचा सदस्य बनला. २०१८ साली पार पडलेल्या एकोणवीस वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचा भारतीय संघ विजेता ठरला, या विजयाचा शिल्पकार होता, यशस्वी जयस्वाल. संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीचा डंका वाजवत त्याने ३१८ धावा ठोकल्या, ज्या त्या स्पर्धेतील एका फलंदाजाने ठोकलेल्या सर्वाधिक धावा होत्या. एकोणवीस वर्षांखालील भारतीय संघाकडून तो खेळत होता. सातत्याने उत्तम कामगिरी पार पाडत होता. अशात एकोणवीस वर्षांखालील वर्ल्डकप खेळवला गेला. मोठ्या संधीचे सोने करणार नाही तो यशस्वी कसला ? या स्पर्धेत खोऱ्याने धावा चोपत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पाकिस्तान सोबत झालेल्या उपांत्य फेरीत त्याने शतक झळकावले होते हे विशेष !(Yashasvi Jaiswal)

======

हे देखील वाचा : आयुष्यातील दु:ख दूर करण्यासाठी गौतम बुद्धांचे हे विचार जरुर वाचा

======

वर्ल्डकपच्या या अप्रतिम प्रदर्शनाचे बक्षीस त्याला आयपीएलमध्ये मिळाले. राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघाचा भाग करून घेतले. सुरुवातीच्या काही सामन्यांत अपयश आल्यानंतर यशस्वीने इथेही जम बसवायला सुरुवात केली अन या हंगामात तो राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तर ठरलाच शिवाय प्रतिभावान युवा खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या इमर्जिंग प्लेयर अवार्डवरदेखील आपले नाव कोरले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याने राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवले आहे. यशस्वी होण्यासाठी फक्त नावात यशस्वी असून चालत नाही. ध्येयासक्ती, स्वप्नांच्या पाठीमागे चालत राहायची जिद्द अन अगदी कुठल्याही परिस्थितीला तोंड देत त्यामधून मार्ग काढत आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवणं फार महत्वाचं ठरतं. यशस्वीने मागची जवळपास दहा वर्षे तेच करत यशस्वी फक्त आपल्या नावापुरत मर्यादित नाहीये हे दाखवून दिलंय.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.