Home » व्हेनिसच्या कॅनॉलमध्ये पाणी झालं हिरवं

व्हेनिसच्या कॅनॉलमध्ये पाणी झालं हिरवं

by Team Gajawaja
0 comment
Canals
Share

इटली मधील व्हेनिस हे जगभरातील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. वर्षाचे बाराही महिने व्हेनिस शहर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. याचं प्रमुख कारण म्हणजे व्हेनिसमधील सदाबहार कालवे. ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ या गाण्यामुळे हिंदी चित्रपटातही व्हेनिसचे कालवे गाजले आहेत. आता याच व्हेनिसमधील प्रसिद्ध अशा ग्रॅड कालव्यामधील पाण्याचा रंग एकदम हिरवा झाल्यानं व्हेनिसमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या वर्षी हे व्हेनिसचे शान असणारे कालवे आटले होते. त्यामुळे कधी नव्हे ते या कालव्याच्या गाळात रुतलेल्या बोटी दिसू लागल्या होत्या. त्याचे फोटोही सोशल मिडियावर गाजले. पण आता हे कालवे पुन्हा पाण्यानं भरल्यावर नवीच समस्या व्हेनिसच्या प्रशासनासमोर उभी राहिली आहे. या कालव्यांचे पाणी अचानक हिरव्या रंगाचे दिसू लागले. स्थानिक प्रशासनानं यासंदर्भात तपास केला असता समोर आलेल्या कारणांनी प्रशासनाची झोप उडली आहे. (Canals) 

व्हेनिसच्या प्रसिद्ध ग्रँड कालव्यांचे पाणी अचानक हिरवे झाल्यानं झाल्यानं पर्यटकांमध्ये घबराट पसरली. या पाण्याचा रंग एवढा हिरवा आहे. की, त्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली. या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोटींग चालते. व्हेनिसचा अर्धा अधिक आर्थिक व्यवहार या कालव्यांवर होतो. अशात कालव्याचे पाणी हिरवे झाल्यानं पर्यटकांमध्ये खळबळ निर्माण झाली. या पाण्यावर काही प्रक्रीया केली आहे किंवा यापासून काही त्रास होऊ शकतो, यामुळे पर्यटक या कालव्यापासूनच दूर रहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या सर्वाबाबत स्थानिक प्रशासनानं हिरव्या पाण्याचा स्त्रोत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे. (Canals)  

व्हेनिसचा प्रसिद्ध ग्रँड कालवा असलेल्या इटलीच्या व्हेंटो प्रदेशाचे गव्हर्नर लुका गिया यांनी याबाबत पुढाकार घेतला. व्हेंटोच्या पर्यावरण संरक्षण आणि प्रतिबंधक एजन्सीने पाण्याची चाचणी केली. या चाचणीतून त्यात फ्लोरेसीन नावाचे रसायन आढळले आहे. हे केमिकल पाण्यात कोणी टाकले किंवा ते कसे तयार झाले हे स्पष्ट झाले नाही. मात्र अशाप्रकारे पाण्यात रसायन सापडल्यानं व्हेनिस प्रशासन सतर्क झाले आहे.  या ग्रॅंड कालव्यासोबत व्हेनिसमधील अन्यही कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ग्रॅंड कालव्याबाबत झालेल्या घटनेमुळे अन्य कालव्यांमध्येही जाणीवपूर्वक प्रदूषण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. (Canals) 

व्हेनिसच्या पाण्यात असलेल्या हिरव्या रंगामुळे पाण्याला दूषित होण्याचा धोका नाही, अशी हमी प्रशासनानं दिली असली तरी सध्या या हिरव्या पाण्यात बोटींग करण्यास पर्यटक नकार देत आहेत. त्यामुळे ग्रॅंड कालव्याच्या भागात बोटींगचे प्रमाण कमी झाले आहे. यासोबत अन्यही कालव्यांमधील पाण्यांची तपासणी करण्यात येत आहे. एआरपीएव्ही तंत्रज्ञांनी पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.  ग्रॅंड कालव्यामधील पाण्यात सापडलेले रसायन हे मुख्यतः पाण्याखाली बांधकामादरम्यान गळती शोधण्यासाठी वापरले जाते.  याशिवाय, हे रसायन औषध म्हणून  शरीरातील जखमांवर वापरले जात आहे. त्यामुळे ते विषारी नक्कीच नाही. पण कालव्याच्या पाण्यात ते खूप जास्त प्रमाणत सापडल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी कालव्याच्या पाण्यात फक्त हिरव्या रंगाचे थेंब दिसत होते आणि दोन दिवसातच सर्व पाणीच हिरव्या रंगाचे झाले. त्यामुळे या रसायनाचा वेग पाहता अन्य भागातील कालव्यातील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. (Canals) 

========

हे देखील वाचा : Earphone चा अधिक वापर करत असाल तर व्हा सावध

========

व्हेनिस हे इटलीतील प्रमुख सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. हे संपूर्ण शहर बोटींवर चालते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील कार्निव्हलही प्रसिद्ध आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत या शहरात पर्यटकांचा पूर आलेला असतो.  गेल्या दोन वर्षाचा कोरोनाचा कालावधी वगळता व्हेनिस शहर कधीही सुने राहिले नाही. जगभरातल्या पर्यटकांना तेथील कालव्यांचे जेवढे आकर्षण आहे, तेवढेच आकर्षण येथील संग्रहालयांचेही आहे. त्यामुळे अनेक कलाकार या कालव्यांच्या तिरावर चित्रे काढतांना दिसतात. कलाकारांचे शहर म्हणूनही व्हेनिसची ओळख आहे.  याच व्हेनिसच्या कालव्यांचे हिरवे पाणी आता छायाचित्रांमधून दिसत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.