१५ फेब्रुवारी १८६९ रोजी मिर्झा गालिब हे जग सोडून गेले. इतकी वर्षे झाली तरी गालिब अमर आहे त्यांच्या शब्दांतून, शायरीतून. गालिबचा जन्म १७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथील पिपलमंडी गल्लीत झाला, अजूनही तो वाडा उत्तम स्थितीत असून तेथे इंद्रभान गर्ल्स स्कुल आहे. गालिबच्या आजोबांनी त्यांना शिकवण्यासाठी दोन मौलवी ठेवले होते. गालिब १३ वर्षांचे झाल्यानंतर दिल्लीचे एक नवाब इलाही बक्ष यांची मुलगी उमराव बेगम हिच्याशी त्यांचा विवाह झाला. उमराव बेगम दिसावयास खास नव्हती परंतु ती धर्म मानणारी आणि पतीनिष्ठ होती. गालिब मात्र पूर्णपणे सुधारक वृत्तीचे होते.
कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. ते रोजे पढत नव्हते त्याचप्रमाणे नमाजही पढत नव्हते. त्यांचा सर्व धर्म समभावावर विश्वास होता. त्यांनी सुफी काव्याचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांची वृत्ती निराळा विचार करण्याची झाली होती. व्यक्तिगत आयुष्यात गालिब अत्यंत दुर्दवी होते. इस्टेटी बाबत अनेक खटले हरले, त्यांची मुले एकामागून एक गेली, धाकट्या भावाला कर्ज झाले, संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यात गेले, स्वतःचा पुतण्या ‘आरिफ’ ला दत्तक घेतले त्याचे पण निधन झाले.

गालिबचे (Mirza Ghalib) व्यक्तिगत आयुष्य हे असे होते. शायर म्हणून पहिले तर भन्नाट चढ उतार ही होते. पण असे असले तरी त्यांचा आत्मविश्वास मात्र जबरदस्त होता. लाल किल्ल्यात होणाऱ्या मुशाऱ्यात त्यांच्या सासऱ्याने त्यांना निमंत्रण दिले. त्याला वाटले मान सन्मान मिळेल, गरिबी दूर होईल, सांपत्तिक स्थिती सुधारेल. गालिबने त्या मुशाऱ्यात एक गजल म्हटली, ‘नक़्श फ़रियादी है किस की शोख़ी-ए-तहरीर का काग़ज़ी है पैरहन हर पैकर-ए-तस्वीर का’ आणि महफिलेचा नूर पालटला, सगळे स्तब्ध झाले, फक्त बादशहा बहादूर शहा जफरच्या तोडून वाहवा शब्द निघाले.
सगळ्यांचे म्हणणे असे होते, आग्र्यात इतके मोठे शायर असतांना ह्यांना कोणी पकडून आणले. गालिब संतापले आणि ती मैफिल अर्धवट सोडून निघून गेले. त्यानंतर गालिब यांच्या लक्षात आले आपल्याला मशहूर होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. प्रचंड गरीबी, बेकारी आणि हालअपेष्टा चालू होत्या. त्यांच्या पब्लिशर मित्राने त्यांच्या काही गजल प्रकाशित करण्यासाठी घेतल्या पण ते ही धड झाले नाही. परंतु त्यानंतर त्यांच्या गजल अनेकांच्या हाती लागल्या.
एकदा रस्त्याने जाताना त्यांना एक फकीर गात येताना दिसला नीट लक्ष देऊन ऐकले तर ती त्यांचीच गजल होती,
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले।
असंच एकदा मित्राच्या दुकानात गेले असतांना वरच्या मजल्यावरून त्यांना एका तवायफ चे गाणे ऐकू आले,
‘निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन
बहुत बे-आबरू हो कर तिरे कूचे से हम निकले ।
गालिब यांच्या सुरुवातीच्या उर्दू रचना फारसी शब्दाने युक्त होत्या त्यामुळे त्या दुर्बोध वाटत, त्यामुळे बरीच टीका झाली. नंतर मात्र मोमिन ख़ाँ मोमिन, मौलाना फज़ले हक, यांच्या सांगण्यामुळे त्यांनी बऱ्याच रचना फारसी शब्द बदलून ,सोप्या उर्दूत लिहिल्या. त्या गजलांमुळे त्यांना दिगंत कीर्ती मिळाली. १८५७ च्या युद्धात त्यांची अवस्था भयानक झाली, पैशाची आवक बंद झाली, सगळे श्रीमंत नवाब – मित्र नष्ट झाले, संपूर्ण दिल्ली शहर बेचिराख झाले. हळूहळू ते कर्जात बुडत होते, त्यांचे मित्र उरले नव्हते, तसेच त्यांची मुले, नातेवाईक दगावत होते.
१८६६नंतर त्याची प्रकृती ढासळत गेली, सतत दोन वर्षे ते अंथरूण धरून होते. विस्मृतीत जात होते. आणि अशाच स्थितीत ”दमे -वापसी बर – सरे – राह है, अजीजो ! अब अल्लाहही अल्लाह है।” असे म्हणत या असामान्य शायराने सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १८६९ रोजी दुपारी ३ वाजता या जगाचा निरोप घेतला.

जेव्हा जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा त्यांच्या कोठीवर जातो, आता तेथे संग्रहालय आहे, पुढेच काही मिनिटे अंतरावर त्याची कबर आहे, मजार आहे तेथे जातो. शांतपणे गालिब आणि त्याचे शेर आठवत काही काळ तेथे बसतो. तेव्हा मला त्याच्या या ओळी आठवतात,
‘ग़ालिब’ बुरा न मान जो वाइज़ बुरा कहे
ऐसा भी कोई है कि सब अच्छा कहें जिसे|
सतीश चाफेकर