Home » अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…

अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…

by Team Gajawaja
0 comment
America
Share

आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचे (America) वर्चस्व सर्वश्रृत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेची सैन्यशक्ती. अमेरिका (America) म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांचे भांडार मानले जाते. यामध्ये अनेक घातकी अशी शस्त्रेही आहेत. ज्या शस्त्रांच्या जोरावर अमेरिका जगात सर्वशक्तीमान देश असा गौरव मिळवत आहे. याच अमेरिकेनं सर्व जगाला आश्चर्यचकीत करेल असा निर्णय घेतला आहे. अमेरिका आता सप्टेंबरपर्यंत रासायनिक शस्त्रे नष्ट करणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी हा निर्णय बायडेन यांनी  रशियाच्या दबावाखाली घेतल्याची चर्चा आहे.   अमेरिकेव्यतिरिक्त (America) चीन आणि  जपान या देशांमध्ये रासायनिक शस्त्रे मोठ्याप्रमाणात आहेत. अमेरिकेनं जर त्यांची रासायनिक शस्त्रे नष्ट केली तर चीन आणि जपान हे दोन देश जगात वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यातही चीनकडे रासायनिक शस्त्रांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर जगाचे नेतृत्व चीनकडे गेल्यास काय होईल, याचीही चर्चा आहे.  

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सर्व जगाला आश्चर्यात टाकणारी घोषणा केली आहे. जो बायडेन यांनी हा निर्णय घेतल्यावर त्याचे स्वागत आणि त्याच्यावर टिकाही करण्यात येत आहे. मुळात अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्र निर्मिती हा मोठा व्यवसाय आहे आणि या व्यावसायिकांचे अमेरिकेच्या राजकारणात मोठे वर्चस्व आहे. या सर्वांनी बायडेन यांच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सप्टेंबर 2023 पर्यंत अमेरिकेतील (America) सर्व रासायनिक शस्त्रे नष्ट करणार असल्याची घोषणा केली आहे. यामागे चीन आणि रशियाची रणनिती असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात रशिया आणि चीनने संयुक्त निवेदन जारी करून रासायनिक शस्त्रे नष्ट करण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला होता. रासायनिक शस्त्रे कराराअंतर्गत सर्व रासायनिक शस्त्रधारी देशांनी ती नष्ट करण्याचे एकमतानं मंजूर केलं होतं. मात्र अमेरिकेनं (America) ही शस्त्रे नष्ट केलेली नाहीत. हे कराराचे उल्लंघन असल्याचा ठपका चीन आणि रशियानं एका पत्रकाद्वारे अमेरिकेवर ठेवला आहे.  त्यामुळे अमेरिकेनं हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. जो बायडेन यांच्या या निर्णयाला विरोध करत अमेरिकेतील शस्त्रास्त्र विक्रेत्यांनी  निषेध केला आहे. अमेरिका (America) आणि CWC सदस्य पुढील आठवड्यात एका परिषदेसाठी एकत्र येणार आहेत.  यामध्ये जगाला रासायनिक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. धोकादायक शस्त्रास्त्रांच्या साठ्याला अमेरिका नेहमीच विरोध करेल, आश्वासनही देण्यात आले आहे.  

या कराराअंतर्गत रशियाने 2017 मध्येच आपली सर्व रासायनिक शस्त्रे नष्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचा हा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. रशियाच्या क्रेमलिनवर नुकताच द्रोणद्वारे हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर रशियानं युक्रेनविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र केले आहे. या युद्धात जी शस्त्रास्त्रे रशियाकडून वापरण्यात आली आहेत, त्यांची तीव्रता अधिक आहे. आता रशिया, युक्रेनविरुद्ध रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. अशावेळी अमेरिकेनं जर रासायनिक शस्त्रास्त्रे नष्ट केली तर, ते अमेरिकेच्या (America) सुरक्षिततेसाठीही धोकादायक ठरु शकते, असा इशारा देण्यात आला आहे. रशियाने अमेरिकेवर युक्रेनमध्ये रासायनिक आणि जैविक शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रशियाकडून अमेरिकालाही धोका आहे,  अशा परिस्थितीत अध्यक्ष जो बायडेन यांचा निर्णय अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी घातकी ठरु शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.  

दुसरीकडे चीनही आपल्याजवळची रासायनिक शस्त्रे लपवित असल्याचा आरोप आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शस्त्रे असून ती शस्त्रास्त्रे लपवून ठेवल्याचाही आरोप आहे.  या सर्वात अमेरिकेनं (America) पडतं धोरण घेतलं तर अमेरिकेचं स्थानही कमकुवत होण्याची भीतीही तज्ञ व्यक्त करीत आहेत.  

======

हे देखील वाचा : इटलीला पास्ताची चिंता…

======

ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स नुसार, रासायनिक शस्त्रे ही अशी शस्त्रे आहेत ज्यात विषारी रसायनांचा वापर जाणूनबुजून लोकांना मारण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी केला जातो.  या धोकादायक रसायनांना शस्त्र बनवणारी लष्करी उपकरणे देखील रासायनिक शस्त्रे किंवा रासायनिक शस्त्रे मानली जाऊ शकतात.  ही रासायनिक शस्त्रे इतकी प्राणघातक आहेत की त्याचा वापर झालाच तर एकाचवेळी हजारो नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो किंवा मानवी शरीराला घातकी ठरु शकणारे आजार होऊ शकतात.  पहिल्या महायुद्धानंतर किमान 12 युद्धांमध्ये रासायनिक शस्त्रे वापरली गेली आहेत.  आणि त्याचे परिणाम अत्यंत घातक झाले आहेत.   इराकी सैन्याने 1980 च्या दशकात पहिल्या आखाती युद्धादरम्यान इराणविरूद्ध रासायनिक शस्त्रे वापरली आणि कमीतकमी 50,000 इराणी लोक मारले गेले.  1988 मध्ये, सद्दाम हुसेनच्या सूचनेनुसार इराकी सैन्याने कुर्द नागरिकांवर घातक रासायनिक वायूंचा मारा केला.  त्यात सुमारे एक लाख कुर्द नागरिक ठार झाले.  सिरीया गृहयुद्धातही रासायनिक शस्त्रांचा वापर झाला.  या रासायनिक शस्त्रांचे होणारे घातकी परिणाम पाहता त्यांना नष्ट करण्याची आंतरराष्ट्रीय मोहीम चालू केली आहे.  मात्र यात जो बायडेन यांनी अमेरिकेची बाजू कमकुवत करण्याचे आश्वासन दिल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.