भारतात वाहतुकीची अनेक साधनं उपलब्ध असली तरी सर्वाधिक पसंती मिळते ती ट्रेनला. कारण सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना परवडणारा आणि आवडणारा प्रवास म्हणजेच ट्रेनचा प्रवास असे मानले जाते. या भारतीय ट्रेनचे रुप बदलले, जेव्हा वंदे भारत ट्रेन दाखल झाली. वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमुळे ट्रेनच्या प्रवासाला अधिक गती आली. मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून सुरु झालेल्या या ट्रेनचे देखणेपण आणि वेग याची भुरळ आता समस्त भारताला पडल्याचे चित्र आहे. कारण विविध मार्गावर या वंदे भारत ट्रेनची मागणी होत आहे. यासर्वांसाठी आणखी एक खुशखबर आली आहे. ती म्हणजे आता वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन भारतातील तिर्थस्थळांना जोडणार आहे. भारतात सध्या तिर्थस्थळांचे पर्यटन हे अधिक जोमात सुरु आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगाची याला जोड मिळाल्यास अधिकांना त्याचा फायदा होईल आणि रेल्वेच्या उत्पादनातही भर पडेल असा अंदाज आहे. साधारण 15 ऑगस्टपासून भारतातील निवडक तिर्थस्थळांना वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यामातून जोडण्यात येणार आहे. लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या तब्बल 75 ते 78 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या योजनेवर सध्या रेल्वे प्रशासन काम करत आहे.
15 ऑगस्टनंतर तिर्थस्थळांना ज्या भाविकांना भेट द्यायची आहे, त्यांचा प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. कारण भारतीय रेल्वे प्रशासनातर्फे भारतातील प्रमुख तिर्थस्थळांना वंदे भारत (Vande Bharat) एक्सप्रेसने जोडणार आहे. यामध्ये प्राथमिक टप्प्यावर निवडक तिर्थस्थळांचा समावेश असला तरी ऑगस्ट 2023 नंतर अधिकाधिक तिर्थस्थळांना जोडण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे यासाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जाहीर करत असून दक्षिण भारतातील राज्यांना 2024 पूर्वी आणखी वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे.
देशातील आतापर्यंतची सर्वात वेगवान ट्रेन म्हणून गौरवलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास प्रवाशांना आनंददायी आणि आरामदायी ठरत आहे. त्यामुळे ही वंदे भारत (Vande Bharat) एक्सप्रेस आणखीही वेगवेगळ्या मार्गांवर चालवण्यात येणार आहे. तिर्थस्थळांना जोडण्यासाठी 13 वंदे भारत एक्सप्रेस चालू आहेत. ती संख्या आता 78 पर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना आली असून रेल्वेमंत्री या योजनेवर लक्ष ठेऊन आहेत. भारतातील सर्व धर्माच्या जवळपास सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना या योजनेतून जोडण्यात येणार असून रेल्वेलाही यातून मोठा महसूल मिळेल, अशी आशा आहे.
दक्षिण भारतातील मंदिरांची संख्या आणि तेथील भाविकांची वाढती संख्या पाहता, दक्षिण भारतातील राज्यांना 2024 पूर्वी आणखी वंदे भारत गाड्या मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती दरम्यान वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत (Vande Bharat) एक्सप्रेस सेवा सुरू झाली. तेव्हापासून या एक्सप्रेसला प्रवाशांची भरभरुन पसंदी मिळत आहे. शिवाय या गाड्या अन्य मार्गावर सुरु कराव्यात म्हणून मागणीही करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत महाकाल मंदिर उज्जैन आणि अजमेर शरीफ पर्यंत वंदे भारत एक्सेप्रेस नेण्यात येणार आहे. नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत ट्रेनने 92.29 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. वंदे भारतला मिळणारा हा प्रवाशांचा पाठिंबा पहाता सरकारने 400 वंदे भारत (Vande Bharat) गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचा महसूलही वाढणार असून काही वर्षांत 40,000 कोटी रुपयांहून अधिक कमाईचा अंदाज आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन 2024-25 पर्यंत वंदे भारत गाड्यांचे स्लीपर व्हर्जन आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचा फायदा अधिक लांब टप्प्यातील प्रवाशांना होणार असून, भारतीय रेल्वेचे सर्व रुप वंदे भारत स्लिपर एक्सप्रेस आल्यावर पालटणार आहे.
========
हे देखील वाचा : पहिले पाऊल टाकत भारताची ट्रेन डिप्लोमसी चालू…
========
मेक इन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून, सुधांशू मणी यांच्या नेतृत्वाखाली वंदे भारत एक्सप्रेसची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. वंदे भारत (Vande Bharat) एक्सप्रेस, ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. 29 ऑक्टोबर 2018 रोजी चेन्नई येथे वंदे भारतची पहिली चाचणी घेण्यात आली. आज या ट्रेननं भारतीय रेल्वेच्या इतिहासात भरघोस कमाईचा उच्चांक केला आहे. आता हीच वंदे भारत भारतातील तिर्थस्थळांना जोडून नवा उच्चांक करणार आहे.
सई बने