आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. लीग स्टेजचे मोजकेच सामने शिल्लक असतानादेखील अजून प्लेऑफमध्ये कुठले चार संघ खेळतील याचा ठाम अंदाज बांधता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना महत्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीश राणाची कोलकाता संजू समसनच्या राजस्थान रॉयल्ससोबत दोन हात करणार आहे. कोलकता नाईट रायडर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे गरजेचे आहे तसेच प्लेऑफसाठी आपली दावेदारी बळकट करण्यासाठी राजस्थानसाठी देखील हा सामना महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच आज होणारी लढत चुरशीची होणार यात शंका नाही. (KKR vs RR)

अंकतालीकेत दोन्ही संघांच्या स्थानांत फार अंतर नाही. ११ सामन्यांपैकी ५ सामने जिंकत १० गुणांसह कोलकाता सहाव्या स्थानावर आहे तर राजस्थानदेखील ११ सामन्यात ५ विजय नोंदवून १० अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. उत्तम नेटरनरेटचा राजस्थानला फायदा झाला आहे. कोलकात्याएवढेच गुण असूनदेखील ते त्यांच्यापेक्षा एका स्थानाने सरस आहेत. मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला पाच विकेट्सनी धूळ चारून कोलकत्याचा संघ इथे पोहोचला आहे. आपली विजयी घौडदौड कायम ठेवायला ते उस्त्सुक असतील. दुसरीकडे राजस्थानला मात्र आपल्या मागच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. ते विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असतील.(KKR vs RR)
कोलकात्याचं होमग्राउंड असलेल्या इडन गार्डन्सवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना आपल्या प्रमुख खेळाडूंकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल. सातत्याने फिनिशरच्या भूमिकेतून आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत आलेला रिंकू सिंघ, कामगिरीत सातत्य राखणारा सालमीवीर फलंदाज जेसन रॉय, कर्णधार नितीश राणा, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण यांच्याकडून संघाला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल. तर संघाच्या गोलंदाजीची भिस्त वरून चक्रवर्ती, सुयश शर्मा आदींवर असेल. (KKR vs RR)
========
हे देखील वाचा : चेन्नईच ठरली सुपर किंग्स, दिल्लीचे आव्हान संपुष्टात.
========
तर दुसरीकडे राजस्थानच्या फलंदाजीची भिस्त युवा यशस्वी जयस्वाल याच्यावर असेल. तसेच जम बसल्यानंतर दुसऱ्या संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा स्फोटक फलंदाज जॉस बट्लर याच्याकडून परत मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल यांच्यावर शेवटच्या टप्प्यात येवून चौकार षटकार ठोकत संघाला आव्हानात्मक लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी असेल. तर संदीप शर्मा, यजुवेन्द्र चहल, रवीचंद्रन अश्विन आदींवर संघाच्या गोलंदाजीची मदार अवलंबून राहणार आहे.(KKR vs RR)
स्पर्धेच्या या टप्प्यावर दोन्ही संघांसाठी दोन अंक मिळवणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघात अत्यंत चुरशीचा सामना होईल यात मात्र शंका नाही.