भगवान शंकराचे भक्त ज्या यात्रेची आतुरतेनं वाट बघत असतात, त्या अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) घोषणा करण्यात आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) 1 जुलै पासून सुरु होत आहे. या यात्रेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीनं नोंदणी प्रक्रीया असणार आहे. जम्मू-काश्मीरमधील या 62 दिवसांच्या पवित्र यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असते. ही नोंदणी 4 प्रक्रीया सुरु झाली आहे. अमरनाथ यात्रा या वर्षी 1 जुलै रोजी सुरू होईल आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटालसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
भगवान शिवाची ही यात्रा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. अमरनाथच्या बर्फाच्या शिवलींगाची पूजा करण्यासाठी दरवर्षी लाखो शिवभक्तांची गर्दी उसळते. हा सर्व मार्ग अत्यंत खडतर आहे. पण शिवभक्त जून ते ऑगस्ट दरम्यान चालणा-या या यात्रेसाठी हिमालयात असलेली भगवान शंकराची पवित्र गुहा गाठतात. या सर्व यात्रेचे नियोजन हे श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड द्वारे केले जाते. श्री अमरनाथजी यात्रेचे उत्तम व्यवस्थापन, पवित्र यात्रेकरूंच्या सुविधांमध्ये सुधारणा आणि त्यांच्याशी निगडीत आणि आनुषंगिक बाबी यासाठी श्राइन बोर्ड प्रयत्नशील असते. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळ सदस्य यांच्या सहाय्याने, या बोर्डाचे कार्य चालते.
या अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath Yatra) येणा-या भक्तांची नोंदणीही या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या पुढाकारानं करण्यात येते. पंजाब नॅशनल बँकेच्या 316 शाखा, जम्मू आणि काश्मीर बँकेच्या 90 शाखा, येस बँकेच्या 37 शाखा आणि सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या 99 शाखांसह देशभरातील 542 बँक शाखांमध्ये ऑफलाइन नोंदणी करण्यात येत आहे. या वर्षी नोंदणीमध्ये नवीन सुधारणा करण्यात आली आहे. यावेळी यात्रेसाठी नोंदणी करताना यात्रेकरूचा अंगठा स्कॅन केला जाईल. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 13-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथजी यात्रा 2023 साठी स्वतःची नोंदणी करू शकतात आणि सर्व यात्रेकरूंसाठी आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे. यासाठी इच्छुक भाविकांनी www.jksasb.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन आहे. ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा, यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यात सर्व आवश्यक तपशील लिहिल्यावर आणि सबमिट वर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल फोनवर OTP येईल. हा ओटीपी त्या फॉर्मवर लिहिल्यावर पुढची प्रक्रीया करावी. त्यानंतर अर्ज प्रत्यक्ष भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासंदर्भात मोबाईल फोनवर मेसेजही येईल. अर्ज भरल्यानंतर फी भरायची आहे आणि मगच यात्रेचे परमिट डाऊनलोड करता येईल.
या यात्रेसाठी नियम अत्यंत कडक आहेत. 6 आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भधारणा असलेल्या महिलांना हा प्रवास करण्याची परवानगी नाही. तसेच लहान मुलांनाही ही यात्रा करण्याची परवानगी नाही आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि यात्रेकरुच्या निवास, वीज, पाणी, सुरक्षा आणि इतर व्यवस्थेची सोय करण्यासाठी सर्व संबंधित विभाग समन्वयाने काम करत असल्याचे संबंधिक अधिका-यांनी सांगितले. याशिवाय यावर्षीपासून अमरनाथजी (Amarnath Yatra) श्राइन बोर्डातर्फे सकाळ आणि संध्याकाळच्या श्री अमरनाथच्या आरतीचे थेट प्रक्षेपण जगभरातील भाविकांसाठी दाखवण्यात येणार आहे.
=======
हे देखील वाचा : अक्षय्य तृतीया साजरी केली जाते? जाणून घ्या महत्व
=======
गेल्या वर्षीही जवळपास दोन लाख भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. गेल्या वर्षी बाबा अमरनाथची यात्रा 29 जूनपासून सुरू होऊन 11 ऑगस्ट रोजी संपली होती. ही यात्रा चालू झाल्यावर स्थानिक पोलीस आणि सैन्याचे जवानही मोठ्या प्रमाणात यात्रेकरुंच्या सुरेक्षिततेसाठी तैनात असतात. गेल्यावर्षी ढगफुटीमुळे काही भाविकांना जीव गमवावा लागला होता. पवित्र अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे 15 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यानंतर लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अनेक पथकांनी अथक परिश्रम करत अन्य भाविकांचा जीव वाचवला. अपघाताच्या वेळी गुहेजवळ सुमारे पाच हजार लोक उपस्थित होते. अन्य भाविकांना वाचवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले. या दुर्घटनेनंतर काही दिवसांनी यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली होती.
सई बने