Home » वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकीत करणारे बृहदीश्वर मंदिर

वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकीत करणारे बृहदीश्वर मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Brihadishwar Temple
Share

भारतातील अनेक मंदिरे ही स्थापत्यकलेचा एक अनोखा नमुना म्हणून गौरवली गेली आहेत. त्या मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर म्हणजे, बृहदीश्वर मंदिर (Brihadishwar Temple). या मंदिराची रचना बघून शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत झाले आहेत. अविश्वसनीय शिवमंदिर म्हणून या बृहदीश्वर मंदिराचा (Brihadishwar Temple) उल्लेख करण्यात येतो. तामिळनाडूच्या तंजोर जिल्ह्यात असलेले हे प्रसिद्ध शिव मंदिर लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. हे प्रसिद्ध मंदिर अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधले गेल्याची माहिती आहे. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे विशाल मंदिर हजारो टन ग्रॅनाईटने बनवले गेले आहे. या ग्रॅनाईटला जोडण्यासाठी कुठल्याही अन्य साधनाचा वा सिमेंटचाही वापर करण्यात आलेला नाही. तर एकमेकांवर एका साच्यात रचण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराला पझल्स मंदिर असेही म्हणतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या भागात असे ग्रॅनाईट कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे ग्रॅनाईट कुठून आले आणि त्यांची जोडणी कशी झाली हा प्रश्न आताही संशोधकांना पडलेला आहे. त्यामुळे रहस्यमयी मंदिर असा त्याचा उल्लेख करण्यात येतो.   

राजाराजा चोल पहिला याने 1010 मध्ये हे बृहदीश्वर मंदिर बांधले. चोल शासकांनी या मंदिराचे नाव राजराजेश्वर असे ठेवले. परंतु कालांतरानं या भागात मराठी शासकांचे राज्य होते. मराठा शासकांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची माहितीही आहे. त्यांनी या मंदिराचे नाव बदलून बृहदीश्वर असे ठेवले. बृहदीश्वर मंदिर (Brihadishwar Temple) हे स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, नृत्य, संगीत, आणि तांब्यामध्ये कोरीव कामाचा एक अद्वितीय नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट आणि त्याची उभारणी पाहता, 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून या मंदिराची घोषणा केली. या बृहदीश्वर मंदिराची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे, या मंदिराच्या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही. या मंदिराच्या बांधकाम कलेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुपारी मंदिराच्या प्रत्येक भागाची सावली जमिनीवर दिसते. पण घुमट दिसत नाही.  ही घटना बघण्यासाठी या वेळी येथे अनेक भाविक उपस्थित असतात आणि भगवान शंकाराचा जयजयकार करतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य त्याच्या घुमटामध्ये आहे. या मंदिराचा घुमट 80 टन वजनाच्या एकाच दगडाचा बनलेला आहे. त्याच्या वर सोन्याचा कलश ठेवला आहे.  हा घुमटाचा दगड मंदिरावर चढवण्यासाठी त्याकाळी अनेक हत्तींची मदत घेण्यात आली होती. या मंदिराच्या आत भव्य असे शिवलिंग आहे.  या शिवलिंगाची भव्यता पाहूनच या मंदिराचे नाव मराठ्यांनी बृहदेश्वर केले असे सांगितले जाते. प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मुर्ती असतेच.  तशीच मुर्ती बृहदीश्वर मंदिरातही (Brihadishwar Temple) आहे. मात्र ही नंदीची मुर्तीही अतिशय भव्य आहे. ही नंदीची मूर्ती ही भारतातील एकाच दगडात कोरलेली नंदीची दुसरी सर्वात मोठी मूर्ती आहे. ही मुर्ती 16 फूट लांब आणि 13 फूट उंच आहे.

========

हे देखील वाचा : मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध

========

हे मंदिर 13 मजली आहे. तंजोरच्या कोणत्याही कोपऱ्यातून मंदिर बघता येते. मंदिराची उंची 216 फूट आहे. जगातील सर्वात उंच मंदिर असून ते बांधण्यासाठी ग्रॅनाईटशिवाय अन्य कुठल्याही सामग्रीचा वापर केलेला नाही. तरीही एवढ्या वर्षानंतर हे मंदिर तसेच उभे आहे. या भागात आत्तापर्यंत सात मोठे भूकंप झाले आहेत. मात्र त्याचा मंदिराच्या ढाच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही.  या सर्वांमुळे मंदिराबाबत अधिक रहस्य निर्माण झाल्याचे स्थानिक सांगतात. ग्रॅनाइटपासून बनवलेले हे जगातील पहिले आणि एकमेव मंदिर आहे. सुमारे 216 फूट उंचीचे हे मंदिर बांधण्यासाठी 130,000 टन ग्रॅनाइट दगड वापरल्याचा अंदाज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंजोरमध्ये आजूबाजूला 60 किमीच्या परिसरात असे दगड आढळून येत नाहीत. त्यामुळे हजारो हत्तींच्या मदतीनं हे ग्रॅनाईट आणले गेल्याचे सांगण्यात येते.  या मंदिरासोबत मराठी शासकांचाही इतिहास जोडला आहे.  तंजोरमध्ये मराठी शासनकाळ होता. त्या मराठा शासकांनी या मंदिरासाठी नव्यानं बांधकाम केल्याचे सांगतात.  तसेच या मंदिराचा संरक्षणासाठीही वापर झाल्याची महिती आहे. मात्र याबाबत अद्याप संशोधन झालेले नाही.  भाविक मात्र हे मंदिर बघण्यासाठी खास वेळ काढून येतात, आणि मंदिराची भव्यता पाहून दिपून जातात.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.