संगिताचे सात सूर, सा रे ग म प ध नी सा…हे कुठलाश्या मंदिरात ऐकायला मिळतात, याची माहिती आहे का? हे सप्तसूर भारतातल्या एका मंदिराच्या पाय-यांवर ऐकू येतात. या पाय-यांवर चालल्यावर हे सप्तसूर कानावर पडतात, असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण भारतात असलेल्या 800 वर्ष जुन्या मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श केल्यावर संगीताचा सूर उमटतो. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. चोल सम्राटांनी बनवलेले हे मंदिर म्हणजे ऐरावतेश्वर मंदिर (Airavateshwar Temple) म्हणून प्रसिद्ध आहे. देवांचा राजा इंद्र याचे वाहन म्हणजेच ऐरावत…या ऐरावतानं येथे भगवान शंकराची आराधना केली होती. त्यामुळेच या मंदिराला ऐरावतेश्वर मंदिर (Airavateshwar Temple) म्हटले गेले. हे मंदिर म्हणजे भारतीय वास्तूशास्त्राचा अनमोल असा खजिना आहे. या मंदिरात एका ठिकाणी असलेल्या पाय-यांवर चालल्यास संगीताचे सात सूर ऐकायला मिळतात. अर्थात आता या पाय-या मंदिर प्रशासनानं जाळी घालून बंद केल्या आहेत. मात्र या मंदिराला भेट देण्यासाठी आणि या संगिताच्या पाय-या बघण्यासाठी अनेक भक्त या मंदिराला भेट देतात.
भारतात सर्वत्र भगवान शंकराची मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे तामिळनाडूतील ऐरावतेश्वर मंदिर(Airavateshwar Temple). भगवान शिवाचे हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले. तामिळनाडूमधील 800 वर्ष जुन्या या ऐरावतेश्वर मंदिरात गाण्या-या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांना स्पर्श केल्यावर संगीताचा सूर उमटतो. तामिळनाडू मधील कुंभकोणम जवळ 3 किमी अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन वास्तुकलासाठीही प्रसिद्ध आहे. चोल राजा द्वितीय यांनी हे मंदिर बांधल्याची माहिती आहे. या मंदिराची बांधणी अत्यंत वैशिष्यपूर्ण असून मंदिराचा आकार आणि त्याची रचना हा आत्ताही वास्तूशास्त्रज्ञांचा अभ्यासाचा विषय आहे. हे मंदिर द्रविड शैलीत बांधले गेले आहे. मंदिरात रथाची रचना असून त्यात इंद्र, अग्नि, वरुण, वायू, ब्रह्मा, सूर्य, विष्णू, सप्तमातृका, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, गंगा, यमुना या वैदिक आणि पौराणिक देवतांचा समावेश आहे. काळाच्या ओघात मंदिराचे नुकसान झाले असले तरी मंदिराचा ढाचा हा अत्यंत मजबूत आहे. या मंदिरातील नक्षी आणि मुर्ती जेवढ्या प्रसिद्ध आहेत, तेवढेच त्याचे मुख्य आकर्षण येथील एका मंडपात असलेल्या पाय-या आहेत. आता या दगडी पाय-यांभोवती मंदिर प्रशासनाने जाळी उभारली आहे. कारण या पाय-यांवर चालल्यावर त्यातून सप्तसूर ऐकायला मिळतात. मंदिराची हे वैशिष्ट्य स्पष्ट झाल्यावर अनेकांनी या पाय-यांवर चालण्याचा प्रयत्न केला. त्यातून या पाय-यांना बरेच नुकसान झाले. शेवटी या पाय-या पर्यटक आणि भाविकांसाठी बंद करण्यात आल्या. आता फक्त या दगडाच्या पाय-या बघता येतात. या पाय-यांमधून निघणा-या संगीताबाबत सांगण्यात येते की, या पायऱ्यांवरून संगीताच्या सातही नोट्स ऐकू शकता. यासाठी लाकूड किंवा दगडाने वरपासून खालपर्यंत घासावे लागते. मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळेच युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविले आहे. या मंदिरात दरवर्षी हिंदू यात्रेकरूंची मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो शिवाय दुर्गा आणि शिवाच्या काही प्रतिमांची पुजा करण्यासाठी भक्तांची गर्दी होते.
ऐरावतेश्वर शिव मंदिरात (Airavateshwar Temple) पाण्याची टाकी आहे. या टाकीला एक जोडलेली वाहिनी आहे, ज्यातून कावेरी नदीचे पाणी येते, या स्थानावर अंघोळ करणे पवित्र मानले जाते. हजारो भाविक येथे दरवर्षी स्नानासाठी येतात. स्थानिक पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाचे वाहन, ऐरावत यानं या कुंडात स्नान केले होते. त्यानंतर त्याची त्वचा स्वच्छ, पांढर्या रंगाची झाली. या संदर्भातील आख्यायिका मंदिराच्या आतील दगडावर कोरलेली आहे. इंद्राच्या या हत्तीवरुनच मंदिराल ऐरावतेश्वर मंदिर असे बोलले जाते. चोल सम्राटांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक भव्य मंदिरे बांधली. त्यातील एक प्रमुख मंदिर म्हणून ऐरातेश्वर मंदिराचा उल्लेख होतो.
=======
हे देखील वाचा : प्रयागराजच्या बडे हनुमानाची ‘ही’ आहे खासियत
=======
या मंदिरात विविध शिलालेख आहेत. यापैकी एक कुलोत्तुंगा चोल तृतीय याने मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. मंदिरात अनेक खांब आहेत. या मंदिराच्या मंडपाच्या उत्तर भिंतीवर शिलालेख आहेत. यात तत्कालीन राजांचा उल्लेख असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केलेला आहे. सध्या या मंदिरातील बहुतांश मूर्ती आता मोडकळीस आलेल्या किंवा गायब झाल्या आहेत. मात्र त्यातील शिलालेखामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ कार्ल सगन यांनी त्यांच्या 1980 च्या टेलिव्हिजन माहितीपट मालिकेसाठी ऐरावतेश्वर मंदिराला भेट होती. या मंदिराची भव्यता बघून ते आश्चर्यचकीत झाले होते. हिंदू स्थापत्यशास्त्र अत्यंत प्रगत असल्याचे त्यांनी सांगून मंदिराचा इतिहास जाणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले होते. या मंदिराला आता अनेक वास्तूशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी भेट देतात.
सई बने