राजस्थानमध्ये चैत्र नवरात्रौत्सवात गणगौर मातेची पूजा केली जाते. गणगौर मातेची मिरवणूक निघते. समस्त महिलावर्ग या पुजेमध्ये आणि त्यानंतर निघणा-या मिरवणुकांमध्ये पारंपारिक पोषाखामध्ये सामिल होतात. गेल्या काही वर्षापासून राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूर येथील गणगौर मातेच्या मिरवणुकीला पर्यटनाच्या दृष्टोकोनातूनही महत्त्व आले आहे. येथील गणगौर मातेच्या मिरवणुकीला देशातीलच नव्हे तर परदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. यावेळीही ही मिरवणूक झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक उपस्थित होते. गणगौर मातेच्या मिरवणुकीत राजघराण्यातील सदस्यही सहभागी होतात. जोधपूरमधील गणगौर मातेला तर मिरवणुकीमध्ये काही कोटींचे दागिने घालण्यात आले होते. (Gangaur Festival)
गणगौर सण (Gangaur Festival) हा माळवा, बुंदेलखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा करण्यात येतो. या दिवशी महिला भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा करतात. या दिवशी महिला दिवसभर मातेची आरती आणि तिच्या नैवेद्याची तयारी करतात. स्वतःही सजतात आणि पार्वती मातेलाही सजवतात. राजस्थानमध्ये या सणाला आता पर्यटनाच्या दृष्टोकोनातूनही महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच जयपूर आणि जोधपूरमध्ये गणगौर सण मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येत आहे. जोधपूरमध्ये निघालेल्या गणगौर मातेच्या मिरवणुकीत देवीला काही कोटींचे सोन्याचे दागिने घालण्यात आले होते.
जयपूर, जोधपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. यातील सर्वात खास ठरली ती जयपूरमधील गणगौर मिरवणूक (Gangaur Festival). जयपूरच्या राजघराण्याच्या निवासस्थानापासून गणगौर मातेची ही शाही मिरवणूक काढण्यात आली. राजघराण्याचे प्रमुख पद्मनाभ सिंह यांनी देवीच्या मिरवणुकीचे स्वागत केले. त्याचवेळी जोधपूरमध्ये काढण्यात आलेल्या गणगौर मातेच्या मिरवणुकीत देवीला 2.5 कोटीचे सोन्याचे दागिने घालण्यात आले होते. हे सर्व दागिने तब्बल 4 किलो सोन्याचे होते, असे सांगण्यात आले.(Gangaur Festival)
गणगौर मातेच्या या मिरवणुका शाही थाटाच्या असतात. त्यात घोडा, पालखी यांच्यासोबत सजवलेले उंटही मोठ्याप्रमाणात असतात. गणगौर मातेचे सैनिक असतात. हे सैनिक उंटावर स्वार होऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही शाही थाटाची मिरवणूक आणि त्यातील राजघराण्यातील सदस्यांना बघण्यासाठी विविध देशांतून परदेशी पाहुणे मोओठ्या संख्येनं आले होते. या मिरवणुकीमध्ये जयपूरमधील प्रसिद्ध अशा बॅंडचे कलाकर सामिल होतेच शिवाय राजस्थानमधील स्थानिक कलाकारही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. या सर्व मिरवणुकीसाठी अलिकडे पर्यटन विभागही खास मेहनत घेत आहे. पर्यटन विभागातर्फे सर्व विदेशी पर्यटकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यावेळी सर्वांना राजस्थानच्या खाद्यपदार्थांची सफर घडवण्यात आली. (Gangaur Festival)
या मिरवणुकीत राज्यभरातील 100 हून अधिक लोककलाकारांनी आपली कला सादर केली. यामध्ये कच्छी घोडी, मयूर नृत्य, अलगोजवादक, कालबेलिया नर्तकांनी वाहवा मिळवली. याशिवाय या मिरवणुकीत पारंपरिक तोफ वाहून नेणारी वाहने, सजवलेले रथ, सजवलेले घोडे, उंट यांचा समावेश होता. मिरवणुकीच्या शेवटी ढाल परिधान केलेले चोपदार आणि पारंपारिक वेशभूषेतील महिलांचा समावेश होता.(Gangaur Festival)
======
हे देखील वाचा : काश्मिरमध्ये पुन्हा ‘शारदा माता मंदिरात’ भाविकांचा जयघोष
======
जयपूरमध्ये हा शाही थाट असतांना जोधपूरमध्येही गणगौर मातेला सोन्यानं मढवण्यात आलं होतं. येथे गेल्या 70 वर्षापासून अशी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत गणगौर मातेला परिसरातील महिला देवीला सोन्यानं सजवतात. सर्व दागिने आजूबाजूला राहणारे लोक एकत्र गोळा करतात. देवीला आपले दागिने देऊन सजवणे हे खूप शुभ मानले जाते. देवीच्या अंगावर सोन्याचे दागिने घातले तर आपली भरभराट होते, अशी भावना भाविकांमध्ये आहे. देवीला सजवून या गणगौर मातेच्या पूजनासाठी महिला नववधूच्या वेशात येतात. यावेळी जोधपूरमध्ये 700 महिलांनी सामूहिक पूजा केली. जोधपूरमध्येही गणगौर मातेच्या (Gangaur Festival) या थाटाच्या मिरवणुकीसाठी परदेशी पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. आता पुढचे काही दिवस राजस्थानमध्ये गणगौर मातेच्या पुजेनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासर्वातून राजस्थानच्या पारंपारिक कलांचे सादरीकरण होत आहे, शिवाय खाद्यसंस्कृतीचीही ओळख करुन देण्यात येत आहे. पर्यटन विभाग या सर्वांसाठी खास मेहनत घेत असून त्यामुळे गेल्या काही वर्षात गणगौर सणासाठी (Gangaur Festival) परदेशातून मोठ्या संख्येनं पर्यटक जयपूरमध्ये दाखल होत आहेत.
सई बने