गेली २३०८ दिवस अखंड तेवत आहे सावरकर ज्योत…!
डोंबिवलीच्या सावरकर रोडवरच्या सावरकर उद्यानात प्रवेशद्वारावरच एक अखंड दीप अहोरात्र प्रज्वलित असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला वंदन करणारा हा अखंड दीप गेली #२३०८ दिवस राष्ट्रप्रेमी डोंबिवलीकरांना अक्षय ऊर्जा देत आहे. स्वा. सावरकरांना अभिवादन करणारा असा ऊर्जा दीप इतरत्र कुठेही नाही फक्त डोंबिवलीतच आहे.
तो कोणी प्रज्वलित केला ? का केला ?
डोंबिवलीत आरएसएस आणि भाजपा विचारधारेच वर्चस्व गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याच बरोबर मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्यप्रेमी लोकांचं गाव म्हणूनही डोंबिवलीची ओळख महाराष्ट्राला आहे. सात आठ वर्षांपूर्वी मणिशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्याने अंदमान सेल्युलर जेलमध्ये असलेल्या स्वा. सावरकरांच्या काव्यपंक्ती नष्ट करण्याचे वाईट कृत्य केले. त्या घटनेच्या विरोधातील सर्वात प्रखर प्रतिक्रिया डोंबिवलीत उमटली. राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वप्रेमी आणि मराठी भाषा प्रेमी आणि मराठी अस्मितानिष्ठ अनेक डोंबिवलीकरांनी तत्कालीन केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला.
यात पुढाकार घेतला डोंबिवलीचे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी. निष्ठावान सावरकरप्रेमी असलेल्या आमदार चव्हाण यांना एक कल्पना सुचली. सावरकरांच्या विचारांची ऊर्जा देणारा अखंड दीप डोंबिवलीच्या सावरकर उद्यान इथे प्रज्वलित करण्याचं त्यांनी ठरवलं.
आमदार चव्हाण यांना जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ध्येयवादी नेतृत्व अजरामर आणि अतुलनीय आहे. “न कि घेतले अम्ही व्रत हे अंधतेने” म्हणत स्वातंत्र्य संग्रामात आयुष्याची आहुती देणाऱ्या या सूर्याला ब्रिटिश साम्राज्य निस्तेज करू शकले नाही. सावरकरांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहावी म्हणूनच २८ मे २०१४ रोजी डोंबिवलीत अखंड सावरकर ज्योत पेटवावी हा संकल्प केला आणि अंमलात आणला.
सावरकरांचे विचार त्यांच्या ज्योतीच्या द्वारे समाजात दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरावे ही भावना. स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाशी, त्या विचारधारेशी असे काही ऋणानुबंध जुळले आहेत की त्याचं वर्णन शब्दांत करता येत नाही. सावरकरांच्या विचारांचा वारसा, त्यांची स्मृती पुढच्या पिढीला कळावी त्यांच्या जाज्वल्य विचारांची ऊर्जा सतत मिळावी म्हणून डोंबिवलीत सावरकर ज्योत अहोरात्र २४x७, ३६५ दिवस तेवत आहे.
भाजपाचे नगरसेवक, तीन टर्म आमदार, फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अशी यशाची नियोजनबद्ध शिखरं सर करणाऱ्या तरीही मनाने आणि कृतीने लढवय्या कार्यकर्ता असलेल्या रविंद्र चव्हाण यांचा आज ५० वाढदिवस.
क फॅक्टसतर्फे आमदार रविंद्र चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस सदिच्छा !