तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम मंदिर जगप्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष श्रीरामानी या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. चार धामांपैकी एक मानले जाणारे हे मंदिर समस्त हिंदूंसाठी पवित्र आहे. या मंदिराला रोज हजारो भाविक भेट देतात. या मंदिराचा विस्तार आणि त्याचे स्थापत्य आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्याही कितीतरी पुढे आहे. याच रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरात मोठा खजिना सापडला आहे. सोन्याची नाणी किंवा हिरे माणकांचा हा खजिना नाही, तर हा खजिना हस्तलिखितांचा आहे. तळहाताच्या आकारातील हस्तलिखिते येथे सापडली आहेत. या मंदिरातील एक तळघर बंद होते. हे तळघर फोडून आत गेल्यावर हा हस्तलिखितांचा अनमोल खजिना हाती लागला आहे. यात तामिळ, संस्कृत आणि तेलुगूमध्ये लिहिलेली एकूण 277 हस्तलिखिते आणि 25 हजारांहून अधिक ताडपत्रींवर लिहिलेला मजकूर हाती लागला आहे. ही सगळी कागदपत्र आता संबंधित तज्ञांकडे सोपविण्यात आली आहेत. या सगळ्या हस्तलिखितांवरचा मजकूर समोर आला की, भारताच्या इतिहासावर नव्यानं प्रकाश पडणार आहे.
रामेश्वरम मंदिर तामिळनाडू मधील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. रामेश्वरम मंदिरच रामनाथस्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग बारा द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तर भारतात ज्याप्रमाणे काशीचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही रामेश्वरमचे महत्त्व आहे. रामेश्वरमला जोडण्यासाठी एका जर्मन अभियंत्याने बांधलेला पूलही बघण्यासाठी लाखो पर्यटक येतात. हे मंदिर अद्भूत आहे. मंदिर एक हजार फूट लांब आणि 650 फूट रुंद आहे. या भव्य मंदिरात अद्यापही तळघरात अनेक रहस्य जतन करुन ठेवली आहेत. या मंदिराच्या तळघरातली एका बंद खोलीत अशापद्धतीनं हस्तलिखितं मिळाली आहेत. त्यातील मजकूराची उकल झाल्यावर या मंदिराबाबत आणि त्या काळातील परिस्थितीबाबत आणखी काही माहिती उघड होईल, अशी आशा आता मंदिर व्यवस्थपनाला आहे.
आपल्या देशात लेखन संस्कृती ही अतीप्राचीन आहे. आतासारखे मुलायम कागद उपलब्ध नसले तरी पूर्वीचे राजे, सम्राट आपला इतिहास लिहिण्यासाठी ताडांच्या पानांचा किंवा विशिष्ट झाडांच्या सालीचा वापर करायचे. काही ठिकाणी दगडांचाही वापर लिखाणासाठी केला जायचा. पाचव्या शतकात ताडांच्या पानांवर लिहिले जायचे. हिंदू मंदिरे संस्कृतीचे केंद्रे म्हणून काम करत असत. या मंदिरात प्राचीन हस्तलिखिते नियमितपणे शिकण्यासाठी वापरली जात असत. हे ग्रंथ जतनही करुन ठेवण्यात येत असत. त्यातीलच एक भाग म्हणून आता रामनाथस्वामी मंदिरात सापडलेली हस्तलिखिते असावीत असे सांगण्यात येते. पण हे सर्व साहित्य आत्ता वाचायला मिळाल्यावरच त्या काळातील रहस्ये उघड होणार आहेत.
रामनाथस्वामी मंदिराचा मोठा इतिहास आहे. भगवान रामाने लंकेहून परत येताना या ठिकाणी भगवान शंकराची पूजा केली होती. रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम देवी सीतेसह रामेश्वरमच्या तीरावर पाऊल ठेवूनच भारतात परतले. अयोध्येला जाण्यापूर्वी राजा राम यांना ब्राह्मणाच्या हत्येचा दोष दूर करण्यासाठी शंकर भगवानांची पूजा करायची होती. बेटावर कोणतेही मंदिर नसल्याने हनुमानाला कैलास पर्वतावर जाऊन शिवलिंग आणण्यासाठी रामांनी सांगितले. पण हनुमान पुजेच्या वेळेवर न आल्यामुळे देवी सीतेने समुद्राची वाळू आपल्या मुठीत बांधून शिवलिंग बनवले आणि भगवान रामाने त्याच शिवलिंगाची पूजा केली, नंतर हनुमानाने आणलेले शिवलिंगही तिथे स्थापित केले, असे सांगण्यात येते.
15 व्या शतकात राजा उदयन सेतुपती आणि नागूर निवासी वैश्य यांनी 67 फूट उंच गोपुरम बांधला. त्यानंतर 16 व्या शतकात तिरुमलय सेतुपतीने मंदिराच्या दक्षिणेला भिंतीचा दुसरा भाग बांधला. असे मानले जाते की रामेश्वरम मंदिर सध्याच्या स्वरूपात 17 व्या शतकात बांधले गेले. एक हजार फूट लांब असलेले मंदिर चाळीस फूट उंचीच्या दगडांवर समान लांबीचे लांबलचक दगड ठेऊन बांधलेले आहे. हा चमत्कार आधुनिक वास्तकारांनाही चकित करतो. रामेश्वरम मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगड श्रीलंकेतून बोटीने आणल्याचे सांगण्यात येते. रामेश्वरमचा कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गोपुरम 38.4 मीटर उंच आहे. हे मंदिर सुमारे सहा हेक्टरमध्ये बांधले गेले आहे. पौराणिक कथेनुसार, मंदिर परिसराच्या आतील सर्व विहिरी भगवान रामाने आपल्या बाणांनी तयार केल्या आहेत. रामेश्वरम मंदिराच्या आत 22 देवस्थान आहेत. रामनाथस्वामी म्हणजे मंदिरातील लिंगाच्या रूपातील शिव हे प्रमुख देवता आहेत.
=======
हे देखील वाचा : बदलत्या हवामानाचा कॅलिफोर्नियाला तडाखा
=======
याच मंदिराच्या तळघरात हजारो वर्षांपूर्वींचा हस्तलिखितांचा खजिना मिळाला आहे. भारतात अशा अनेक ठिकाणांहून जुनी हस्तलिखिते मिळाल्यावर त्यांना संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसी येथे पाठवण्यात येते. या विद्यापीठात अत्यंत जुन्या अशा हस्तलिखितांचा अभ्यास होतो आणि त्यांचे जतनही होते. यात सध्या तीन लाख पुस्तके, प्राच्य ग्रंथ, दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. देशाच्या विविध भागातून आणलेल्या 16,500 दुर्मिळ हस्तलिखिते येथे जतन करण्यात आली आहेत. खजुराच्या पानांवर लिहिलेल्या हजारो हस्तलिखिते शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्संचयित करण्यासाठी तज्ञांची एक टीम नियुक्त करण्यात आली आहे. अशाच तज्ञांकडून आता रामनाथस्वामी मंदिरातील हस्तलिखितांच्या खजिन्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
सई बने