नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसातच नागपुरात कोरोनाचे 13 हजार 608 नवे रुग्ण सापडले आहेत. परवा, 8 तारखेला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2 हजार 205 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यापासून एका दिवसातली आजवरची ही सर्वाधिक वाढ आहे. या दिवशी 37 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. मात्र, सर्वात जास्त भीतीदायक आहे की, कोरोना चाचण्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण. ते मार्च महिन्याच्या तुलनेत दहा पटीने तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह नागपुरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तर्क मान्य केले तरी दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची संख्या वाढणे हे धोक्याची घंटा आहे.
नागपुरात 17 ऑगस्ट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत तत्कालीन आयुक्त आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांची बैठक घेत नागपुरात कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला होता. चाचण्या वाढवल्याने काही दिवस नागपुरात रुग्ण वाढतील मात्र त्यांनतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल असे त्यांचे तर्क होते. त्यानंतर महापालिका आणि आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले. 17 ऑगस्ट पर्यंत दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान असलेली कोरोना चाचण्यांची संख्या आता आठ हजारांच्या वर गेली आहे. नागपुरात 8 सप्टेंबर रोजी 8 हजार 308 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये 2 हजार 205 जण कोरोना बाधित आढळले. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे हे स्पष्ट दिसतंय.
33
previous post