फेब्रुवारी महिना सुरु झाला की, वेध लागतात ते साजरे होणा-या विशेष दिवसांचे. यावर्षीही सात फेब्रुवारी पासून हे खास दिवस सुरु होत आहेत. रोझ डे, म्हणजेच गुलाबांचा (Rose) दिवस म्हणून साज-या होणा-या दिवसांपासून सुरु झालेला हा उत्सव व्हॅलेंटाईन डे पर्यंत चालतो. 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे, 11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे, 13 फेब्रुवारी रोजी किस डे आणि 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे….या सर्व डे मध्ये एका गोष्टीला जास्त महत्त्व असतं….ते म्हणजे गुलाब….आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाप्रती आभार करण्यासाठी गुलाबाची फुलं दिली जातात. पण हे गुलाब देतांना आपण कुठल्या रंगाचे गुलाब (Rose) देत आहोत, हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. आपण देणा-या गुलाबामधूनही रंगाच्या माध्यमातून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करु शकतो. त्यामुळेच गुलाबाचे फुल आणि त्याच्या रंगाचे महत्त्व जाणणे गरजेचे आहे.
प्रत्येक गुलाबाचा (Rose) वेगळा रंग काहीतरी सांगत असतो. त्यातून भावना व्यक्त होतात. फेब्रुवारी महिन्यात तर या गुलाबांच्या वेगवेगळ्या रंगांना अधिक मागणी येते. गुलाबाचे जसे रंग तशी त्यातून व्यक्त होणारी भावना….आणि प्रेमही….त्यामुळेच समोरच्याला गुलाब (Rose) भेट देताना हे रंगाचे गणित जाणून घेणं गरजेचं असतं. यात पहिला नंबर असतो तो पांढ-या रंगाच्या गुलाबाचा. पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक मानले जाते. तसेच पांढरा गुलाबही (Rose) शांततेचे प्रतिक म्हणून मानला जातो. जर कोणाशी भांडण झाले असेल आणि तुमच्यामध्ये अबोला निर्माण झाला असेल तर हे भांडण मिटवण्यासाठी हा पांढरा गुलाब मदत करु शकतो. आपल्या समोरच्या व्यक्तीला हे पांढरे रंगाचे गुलाब दिल्यावर तुमच्यातील दुरावा शांततेने दूर होऊन नवीन सुरुवात करायला पांढरा गुलाब मदत करतो.

त्यानंतर गुलाबी (Rose) रंगाच्या गुलाबाचा नंबर येतो. गुलाबी रंग हा जास्त पसंद केला जातो. कधीही धन्यवाद किंवा आभार व्यक्त करण्यासाठी या गुलाबी रंगाचा वापर होतो. गुलाबी रंगाचे गुलाबही धन्यवाद आणि आदराची भावना व्यक्त करण्यासाठी वापरता येतात. आपल्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतात की, ज्यांच्यामुळे आपल्याला आधार मिळतो, अशांना गुलाबी गुलाब (Rose) भेट दिल्यास त्यांच्याबदद्ल आपल्या मनात असलेला आदर व्यक्त होतो. केशरी गुलाबालाही महत्त्व आहे. केशरी हा आनंददायी रंग मानण्यात येतो. समृद्धीचे प्रतिक म्हणूनही केशरी रंगाकडे पाहिले जाते. शिवाय केशरी रंग म्हणजे पावित्र्यही मानले जाते. त्यामुळे आपल्या मित्रपरिवारात या रंगाच्या गुलांबांचा गुच्छ नक्की द्यावा, यामुळे सर्वांकडे भरभराट होईल, असा संदेश दिला जातो. मैत्री आणि नाते घट्ट करणारा रंग म्हणून केशरी रंगाला मान्यता आहे.
पिवळ्या रंगाच्या गुलाबाचेही खास महत्त्व आहे. आपल्याला कोणाबरोबर मैत्री करायची असेल तर पिवळ्या रंगाच्या गुलाबाची मदत होऊ शकते. पांढरा रंग जसा शांततेचा संदेश देतो, तसाच हा पिवळा रंग मैत्रीचा संदेश देतो. त्यामुळे कोणाबरोबर मैत्री करायची असेल तर या पांढ-या आणि पिवळ्या रंगाचे गुलाब (Rose) मिळून दिल्यास त्याचा चांगला संदेश जातो, असे सांगण्यात येते. त्यानंतर अबोली रंगाच्या गुलाबाचा नंबर येतो. हा अबोली रंगाचा गुलाब कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा आहे, असे सांगितले जाते. विशेषतः आपल्या गुरुजांचे आभार व्यक्त करण्यासाठी या अबोली रंगाच्या गुलाबांचा वापर केला जातो.
=======
हे देखील वाचा : बांबूची झाडं लावून कमवू शकता लाखो रुपये, खर्च ही कमी येतो
======
सगळ्यात शेवटी येतो तो लाल रंग. लाल रंग हा प्रेमाचा रंग मानण्यात येतो. अगदी लग्नातही नवरी लाल रंगाचेच कपडे परिधान करते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या मनात ज्याच्याविषयी प्रेमाची भावना आहे, त्यांना या लाल रंगाचे गुलाब दिले तर न बोलताही ही भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचली जाते. लाल रंगाचे हे गुलाब फेब्रुवारी महिन्यात अगदी व्हीआयपी होऊन जातात. अनेकवेळा फुलांच्या बाजारात या लाल रंगाच्या गुलाबांची चढी बोली लावली जाते. भारतात आता मोठ्याप्रमाणात गुलाबांची शेती होती. महाराष्ट्रात पुणे आणि कर्जत मधूनही हे लाल रंगाचे गुलाब मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होतात. व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधत फुलशेती करणारे शेतकरीही आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांची शेती करतात. आताही बाजारात सर्व रंगाचे गुलाब उपलब्ध आहेत, पण हे गुलाब विकत घेतांना त्यांच्या रंगाचा नक्कीच विचार करा.
सई बने…