लॅटिन व रोमन भाषा इतिहासजमा होत आहेत, परंतु संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे. अनेकदा लहान मोठ्या नद्या काही काळ लुप्त होतात आणि पुन्हा पुनरुज्जीवित होतात, त्याप्रमाणे संस्कृत भाषा लुप्त होत आहे असे वाटत असले तरीही ती सदा जागृत भाषा आहे. संस्कृत ज्ञानभाषा असून तिला राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.
रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल कोश्यारी तसेच पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव यांच्या आभासी उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
संस्कृत हृदयस्पर्शी भाषा असून ज्ञानाचा अथांग सागर आहे. गीता, उपनिषदे त्यातील मोती आहेत. संस्कृतमधील सुभाषिते अर्थपूर्ण आहेत. संस्कृत भाषेतील ज्ञान प्रकाशात आणून त्याचा प्रचार प्रसार कसा होईल याचा समग्र विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील शिक्षण संस्कृत मधून द्यावे: बाबा रामदेव
संस्कृत केवळ भाषा नसून ती एक संस्कृती आहे. भाषा, साहित्य, वेदविद्या, दर्शनादि विविध शास्त्रे संस्कृतमधून आहे. परा – अपरा विद्या, प्रवृत्ती – निवृत्ती, प्रेयस् – श्रेयस् या सर्वांचे सार संस्कृत भाषा आहे. अभियांत्रिकी, चिकित्साशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विविध तंत्र विषयांचे शिक्षण संस्कृतमधून झाले पाहिजे, असे यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते बारावी संस्कृत शिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक संस्कृत शिक्षकांची गरज संस्कृत विद्यापीठाने पूर्ण करावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संस्कृत विद्यापीठाने महाकवी कालिदास यांचे समग्र साहित्य मराठी भाषेत भाषांतरित केले असल्याचे सांगून विद्यापीठ सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले.
यावेळी संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव ओमप्रकाश तिवारी यांनी मानद विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली तसेच निवडक स्नातकांना पीएच डी व सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’: राज्यपाल
33