Home » शेगावचे भक्तनिवास

शेगावचे भक्तनिवास

by Correspondent
0 comment
Gajanan Maharaj | K Facts
Share

संत श्री गजानन महाराज यांची आज पुण्यतिथी. दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू अशी गजानन महाराजांची ओळख. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे हा त्यांचा नित्यनेम होता. ते सतत परमेश्वराचे नामस्मरण करायचे. महाराष्ट्रातील शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळांमध्ये गणले जाणारे हे मंदिर. ‘माऊली’चा गजर करत शेकडो भाविक येथे दर्शनासाठी नेहमीच गर्दी करतात.

‘गण गण गणात बोते’, हा महाराजांचा आवडता मंत्र होता. जीव आणि ब्रह्म एकच आहेत, त्यांना निराळे समजू नये, असा या मंत्राचा अर्थ होतो. ते सतत त्याचा जप करीत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा असे नाव पडले. याचा अपभ्रंश म्हणजेच ‘गजानन महाराज’.

श्री गजानन महाराजांचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या मधोमध स्थित आहे. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात! श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे.

मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘भक्तनिवास’ बांधण्यात आले. या भक्त निवासामुळे महाराष्ट्रभरातील भाविकांना महाराजांच्या दर्शनास येणे आर्थिकदृष्ट्या शक्य होते. आज तीर्थक्षेत्रांच्या गर्दीत भक्तनिवासात वेगळेपण टिकून राहण्याची काय बरं कारण असतील?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तनिवास सर्वसामान्य भाविकांना परवडण्यासारखे आहे. अगदी स्वस्त दरात येथे वास्तव्यासाठी खोल्या मिळतात. म्हणजे ९६० रुपयांत सहा सदस्यांच्या कुटुंबाची सोय होते. पाच दिवसांपर्यंत या खोलीत राहता येते. त्यामुळे दूरदूरहून दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आर्थिकदृष्ट्या ते सोयीस्कर पडते. या कारणाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रोजची संख्या वीस हजारांवर सहज पोहोचते.

भक्तनिवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली भोजन कक्षाची व्यवस्था. सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत महाराजांचा प्रसाद भाविकांना दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांहून अधिक भाविक भोजनाचा आनंद घेतात.

शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात महाराष्ट्रातील साधे ग्रामीण जीवन पहावयास मिळते. अध्यात्मिक शांततेसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय आहे, जे भाविकांसाठी सतत खुले असते. त्यामुळे रोजच्या घाईगडबडीतून मनाला आणि बुद्धीला शांतता मिळण्यासाठी हे अत्यंत योग्य असे ठिकाण आहे.

भक्त निवासातील अत्यंत नाविन्यपूर्ण आणि आकर्षक इमारती रचनांसाठी ‘आनंद विहार’ला स्वतःची प्रतिष्ठा मिळाली आहे. सुंदर घरांसारखे भासणारे हे निवासस्थान भाविकांना आपलेपणाची ऊब देते.

भक्तनिवासात भटकंती करताना जाणवणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथील शिल्पकला! भव्य प्रवेशद्वारावरील शिल्प तर मोहून टाकतेच, परंतु जागोजागी असलेल्या देवादिकांच्या मूर्ती आणि त्यातून साकारलेले मोहक देखावे मन प्रसन्न करतात. परिसर सुशोभित करणारी झाडे सोबत असतातच!

भक्तनिवासाचं महत्त्व आणि वेगळेपण सिद्ध करणारा समकालीन मुद्दा म्हणजे स्वच्छता आणि पार्किंगची सुविधा. जागोजागी ठेवलेले कचऱ्याचे डबे आणि वेळेत केली जाणारी साफसफाई यामुळे शहरांच्या दुर्गंधीपासून दूर असलेल्या कचरामुक्त परिसराचा आनंद घेता येतो. सोबतीला आनंदात भर घालणारी सुंदर कुरणे असतात. पार्किंगची सोय तर सर्वात उत्तम आहे. सायकल, मोटार सायकल आणि आणि कार यांसाठी वेगवेगळी आणि भव्य पार्किंग सुविधा असल्याने पार्किंगचा गोंधळ उडत नाही.

तर असे आहे ‘शेगावचे भक्तनिवास’! आकर्षक रचना, प्रसन्न वातावरण, सुंदर परिसर आणि आरोग्यदायी स्वच्छता यामुळे स्वप्नातील स्वर्गभूमीकडे घेऊन जाणारी वाट सापडल्याचा जणू भासच होतो. तसंही श्री गजानन महाराज नेहमी म्हणायचेच…’गण गण गणात बोते’!

– सोनल सुर्वे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.