मध्यप्रदेशच्या इंदौर येथे झालेल्या एनआरआय परिषदेत परदेशात राहणारे अनेक भारतीय सामिल झाले होते. या नागरिकांना इंदौर शहर भावलेच पण त्यासोबत इंदौरी खाण्याचेही ते चाहते झाले. या सर्वात या पाहुण्यांना सर्वाधिक आवडलेला पदार्थ म्हणजे चटपटा गराडू(Garadu). इंदौर आणि आसपासच्या भागात या गराडूची शेती केली जाते. गराडू हा रताळ्यासारखा कंद आहे, हिवाळ्याच्या दिवसात येणारा हा गराडू थंडीच्या दिवसात औषधासारखा उपयोगी होतो. थंडीच्या दिवसात जेव्हा हा गराडू तयार होतो, तेव्हा बहुतांशी घरात सायंकाळी गराडू हमखास खाल्ला जातो. इंदौरमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील पाहुण्यांनीही या गराडूचा आस्वाद घेतला आहे. फक्त काही महिन्यात मिळणारा हा गराडू (Garadu) म्हणजे बहुगुणी असाच आहे.
मध्यप्रदेश आणि आसपासच्या राज्यात गराडूंची शेती केली जाते. हिवाळ्याच्या आसपास हे गराडू तयार होतात. खास करुन मध्यप्रदेशच्या रतलाममधील गराडू प्रसिद्ध आहेत. गराडू (Garadu) शक्यतो काळ्या मातीत होतात. रतलाम जिल्ह्यातील बांगरोड गावात बहुतांशी ठिकाणी या गराडूचे उत्पादन केले जाते. बांगरोड गावातील गराडूला संपूर्ण देशात मागणी असते. गराडू लावल्यावर साधारण 5 ते 6 महिन्यात तयार होतात. या गराडूच्या वेलाची मोठी काळजी घ्यावी लागते. ही वेल बांबूच्या सहाय्याने वाढवली जाते. नोव्हेंबर महिन्यापासून गराडू विक्रीला आणले जातात. रतलामचे गराडू (Garadu) तर शेतातच विकले जातात. अलिकडे गराडूच्या पदार्थांची मागणी वाढली आहे, तेव्हापासून गराडूचीही मागणी वाढली आहे. विशेषतः रतलामच्या गराडूला मागणी वाढली आहे. रताळ्यासारखे गराडू दिसत असले तरी त्याची चव रताळ्यासारखी नसते. हा गराडू साधारण बटाट्यासारखा चवीसारखा असतो. या गराडूचे मोठे तुकडे करुन ते तेलात तळले जातात. नंतर त्यावर मिठ, मसाला, लिंबू आदी घालून ते खाल्ले जातात. त्यासाठीचा गराडू मसालाही प्रसिद्ध आहे.
या गराडूचे (Garadu) अनेक औषधी फायदे आहेत. गराडूमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर आहे. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेवर फायदेशीर ठरते. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठीही गराडू मदत करते. तांबे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, फॉस्फरस यासह अनेक पोषक तत्वांनी गराडू समृद्ध आहे. गराडूमध्ये असलेल्या भरपूर जीवनसत्त्वांमुळे मानसिक तणावही कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही गराडू (Garadu)फायदेशीर ठरते. याशिवाय, गराडूचे सेवन केल्यास हाडांची मजबूतीही होते. हिवाळ्यात सांधेदुखी आणि हाडांमध्ये वेदना होण्याची अनेकांची तक्रार असते. अशावेळी गराडूचे सेवन फायदेशीर पडते. शरीरातील जखमा लवकर भरण्यासही गराडूची मदत होते.
=========
हे देखील वाचा : मटारचे फायदे माहिती असतीलच पण तोटे माहिती आहे का?
=========
थंडी सुरु झाल्यावर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्येही अनेक भागात या गराडू विकणा-या गाड्या उभ्या रहातात. सायंकाळी हे गरम गरम गराडू (Garadu) खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. गराडू थोडे चिकट असतात. त्यामुळे त्यांना साफ करुन, कापून हे तुकडे पाण्यात टाकले जातात. त्याचा चिकटपणा दूर झाल्यावर गरम तेलात हे मोठे तुकडे सर्वबाजुंनी कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. या गराडूवर चाटमसाला किंवा खास गराडू (Garadu) मसाला टाकला जातो. काही ठिकाणी पुदीन्याची चटणीही त्यावर टाकून दिली जाते. त्याची चव अप्रतिम असतेच पण त्यासोबत त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळेच इंदौरमध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही या गराडूची मोहीनी पडली होती.
सई बने