चीनने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील बंदी आता उठवली आहे. ही नेमकी अशी वेळ आहे, जेव्हा चीनमध्ये कोरोना संसर्गाने (Corona virus) कहर झाला आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतच आहे. शिवाय तिथला मृत्यूदरही भयानक झाला आहे. मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह ठेवण्यासाठी आता विशेष तंबू उभारण्याची वेळ आली असताना चीननं आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील बंदी उठवली आहे. जगाला पुन्हा कोरोना या महामारीच्या खाईत लोटणारा हा निर्णय असल्याचे आरोग्य संघटनेला वाटत आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा उघडल्यानंतर चीनने परदेशी प्रवाशांच्या पहिल्या तुकडीचे स्वागत केले. कोरोनामुळे, तीन वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विशिष्ठ नियमांशिवाय चीनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चीनमध्ये दोन दिवसांपूर्वीच ‘लुना न्यू इयर’ सुरू झाले आहे. हे निमित्त साधत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. या काळात मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. 21 जानेवारीपासून चीनमध्ये शासकीय सुट्या सुरू होत आहेत. 2020 नंतर ही पहिलीच वेळ आहे की, चीनमध्ये प्रवासी निर्बंधांशिवाय लुना नववर्ष साजरे केले जाईल. चीनच्या वाहतूक मंत्रालयाच्या अंदाजानुसार, पुढील 40 दिवसांत 200 दशलक्षाहून अधिक लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.
हे नव वर्ष असताना आता चीनची स्थिती बिकट आहे. कोरोनाचा कहर या देशात सुरु आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्थाही सरकार करू शकत नाही. एका अहवालानुसार, चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोकांना फक्त दहा मिनिटे दिली जात आहेत. येथील स्मशान स्थळांवर पाचपट मृतदेह येत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व स्थितीमध्ये चंद्र नववर्ष साजरे करत असताना उठवलेले निर्बंध कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहेत. गेल्या महिन्यात चीनमध्ये आपल्या ‘झिरो कोविड’ धोरणाविरोधात जनतेने आंदोलन केले. झिरो कोविड धोरणामुळे (Corona virus) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता हे धोरण मागे घेतल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. पण कोरोनाग्रस्तांची दुप्पट-तिप्पटीनं वाढलेली संख्याही चिंतेचा भाग झाली आहे.
सध्या येथील रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी असते. औषधांची दुकाने रिकामी झाली असून स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळेच चीनमध्ये नववर्ष स्वागत करण्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी यंदा प्रवास करणार नसल्याचे सांगितले आहे. काही लोकांनी वृद्ध नातेवाईकांना संसर्ग होण्याची चिंता देखील व्यक्त केली आहे. शहरांमध्ये काम करणारे लोक त्यांच्या घरी परतल्यामुळे लहान शहरे आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आधीच शहरातही कोरोनाचा (Corona virus) सामना करण्यासाठी आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. अशात गावांमध्येही कोरोना पसरला तर काय करायचं हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
त्यातच चीनने सर्व सीमा उघडल्यानं भारत, जपान, थायलंड आणि अमेरिका या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा खुल्या केल्यावर रविवारी हाँगकाँग आणि मुख्य भूप्रदेश चीन दरम्यान प्रवाशांनी स्थलांतर केले. या लोकांसाठी क्वारंटाईनसारखा मोठा प्रोटोकॉलही रद्द करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, देशात येणाऱ्या प्रवाशांचे स्वॅब नमुने कोरोना प्रकारांच्या निरीक्षणासाठी गोळा केले जातील. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग होईल. याशिवाय स्थानिक प्राधिकरणाला सामाजिक मेळाव्यावर बंदी घालण्याचे स्वातंत्र्य असेल. हे सर्व करत असताना चीनचे सरकार जाणून बुजून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यात होणा-या मृतांबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून स्मशानभूमीत नेले जात आहेत. जेनिफर झेंगच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ नानजिंग शहरातील आहे. इथे स्मशानभूमीत मृतदेह ठेवायला जागा उरलेली नाही आणि बाहेर जाम आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फीगेल-डिंग यांनीही सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची अवस्था चिंताजनक आहे. कोरोनावर मोठा इशारा देताना ते म्हणाले की, 90 दिवसांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य सल्लागार डॉ. रामशंकर उपाध्याय यांनी चीनने उठवलेले निर्बंध आणि कोरोनाची परिस्थिती चुकीच्या पद्धतीनं हाताळल्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाल्याचे सांगितले आहे.
=======
हे देखील वाचा : मेघालयातील ‘या’ ठिकाणांचे नाव जरी घेतले तरी लोक घाबरतात… पण का?
=======
आता पुन्हा चीन सर्व जगाला या महामारीच्या लाटेत टाकत आहे. स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरियाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. येथे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवावा लागेल. मोरोक्कोने आधीच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तैवानने चीनमधून येणाऱ्यांसाठीही कोविड चाचणी (Corona virus) अनिवार्य केली आहे. पाकिस्तान आणि फिलिपाइन्सही नजर ठेवत आहेत. थायलंड आणि न्यूझीलंडने कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला आहे. कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 66 कोटी 81 लाख 58 हजार 29 रुग्ण आढळले आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जगातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची प्रक्रिया वाढू लागली. आतापर्यंत 67 लाख 10 हजार 504 मृत्यू झाले आहेत. मात्र पुन्हा चीनमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि चीनचे धोकादायक धोरण जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
सई बने