चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) बिकिनी किलर म्हणून कुख्यात असलेला हा सीरियल किलर सध्या नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आता नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने या सिरियल किलरच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या तुरुंगात असलेल्या चार्ल्स शोभराजला त्याच्या वयाच्या आधारावर जमिनीवर सोडण्यात येणार आहे. चार्ल्स शोभराज हा सिरियल किलर म्हणून कुख्यात आहे. सोबतच त्यानं नेपाळच्या तुरुंगात असतांना केलेलं लग्नही गाजलं होतं. आता 19 वर्षानंतर हाच सिरीयल किलर चार्ल्स शोभराज तुरुंगाबाहेर येत आहे. चार्ल्स तुरुंगातून बाहेर पडल्यावर नेमका कुठल्या देशात राहणार हा प्रश्न आहे.

बिकिनी किलर म्हणून प्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) 19 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिल्यावर सर्वत्र चार्ल्स शोभराजची चर्चा रंगली आहे. तरुणींबरोबर मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना ड्रग्ज देऊन त्यांची हत्या करायचा. विशेषतः परदेशी स्त्रिया त्याच्या बळी असायच्या. चार्ल्सची सुटका त्याच्या वाढत्या वयाच्या आधारावर होत आहे. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2013 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे. तुरुंगातून सुटल्यावर चार्ल्सला 15 दिवसांच्या आत त्याच्या देशात पाठवण्यात यावे, असेही आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारीच्या जगात ‘बिकिनी किलर’ (Bikini Killer) आणि ‘सिरियल किलर’ अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) यांचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला. चार्ल्सने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान 20 पर्यटकांना ठार मारले आहे, ज्यात 14 थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करत असे. परदेशी स्त्रिया त्याचा मुख्य बळी असायच्या. गुन्हा करतांना तो एवढी सावधानता बाळगायचा की त्याचा सुगावा लागण्याआधीच तो त्या ठिकाणाहून पसार झालेला असायचा. 1976 मध्ये चार्ल्सने भारत भेटीसाठी आलेल्या एका फ्रेंच गटाची हत्या केली. या प्रकरणात, चार्ल्सला इस्रायली पर्यटकाच्या हत्येसाठी सात वर्षांची शिक्षा झाली. यानंतर 1986 मध्ये तो आपल्या साथीदारांसह तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पकडण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा झाली.

नेपाळमध्ये शिक्षा भोगत असताना चार्ल्सने (Charles Sobhraj) निहिता बिस्वास या नेपाळी मुलीशी लग्न केले. लग्नाच्या वेळी निहिता 20 वर्षांची होती. तर चार्ल्सचे वय 64 होते. एवढे असूनही या अट्टल गुन्हेगारीची फारशी छायाचित्रे नाहीत. 1 सप्टेंबर 2003 रोजी चार्ल्स नेपाळमधील कॅसिनोबाहेर दिसला. एका स्थानिक छायाचित्रकारानं त्याला ओळखून त्याचे छायाचित्र काढले. हेच त्याचे छायचित्रप प्रसिद्ध आहे. बारीकशी अंगकाठी आणि डोक्यावर टोपी असा चार्ल्स बघताक्षणी घातकी असेल असे कोणालाच वाटत नाही. विशेषतः तो अनेक भाषा बोलतो असेही म्हटले जाते. त्यातूनच तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे, आणि नंतर त्यांची हत्या करीत असे. 1975 मध्ये काठमांडू आणि भक्तपूर येथे दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले गेले. तो काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अमेरिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्याला 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) गुन्हेगारी जगतात सुंदर, मोहक आणि घातक असा ओळखला जातो. त्याच्यावर अनेकांनी लेख लिहिले. फारकाय माहितीपटही प्रसिद्ध झाले. चार चरित्रे, तीन माहितीपट, मैं और चार्ल्स नावाचा एक भारतीय चित्रपट आणि 2021 मध्ये आठ भागांची बीबीसी, नेटफ्लिक्स वर द सर्पंट ही मालिका….या सर्वांतून चार्ल्स शोभराज आणि त्याच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चार्ल्सचे वडील भारतीय तर आई व्हिएतनामी होती. पुढे त्याच्या आईनं फ्रेंच व्यक्तीबरोबर लग्न केले. पण या जोडप्यांनी चार्ल्सकडे फार लक्ष दिले नाही. चार्ल्स युरोप फिरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्याला अनेक भाषा बोलता येतात. कुटुंबातून झालेल्या दुर्लक्षामुळे तो लहान वयातच गुन्हेगारीकडे वळला. 1963 मध्ये त्याला घरफोडीसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर चार्ल्स चोरी, तस्करी, जुगार…आदी गुन्ह्यांमध्ये ओढला गेला. 1973 मध्ये, हॉटेल अशोका येथील दागिन्यांच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याला अटक झाली. पण तिथून तो पळून गेला. पोलीसांनी त्याला अटक केली. पण चार्ल्स पुन्हा पळण्यात यशस्वी झाला. या सर्वात चार्ल्स परदेशी पर्यटकांना आणि महिलांना आपले शिकार करु लागला. थंड डोक्यानं त्यानं अनेक हत्या केल्या.
========
हे देखील वाचा : चीनच सरकार करतंय तरी काय?
=======
आता काठमंडूच्या तुरुंगात शिक्षा भोगणारा चार्ल्स शोभराज 77 वर्षाचा आहे. त्याच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ओपन हार्ट सर्जरीही झाली आहे. शोभराजच्या वकील शकुंतला विश्वास यांनी सांगितले की, वृद्धापकाळ आणि खालावलेली तब्येत या कारणांमुळे चार्ल्सच्या सुटकेची मागणी करण्यात आली आणि न्यायालयानं ती मान्य केली. आता न्यायालयाच्या आदेशानंतर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या व्हिसाची मुदत वाढवून त्याला फ्रान्सला परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ही शोभराजची पुढची योजना आहे. दुसरीकडे चार्ल्सने सुटकेपर्यंत काठमांडूतील हयात हॉटेलमध्ये एक खोली बुक केली आहे. त्याने नेपाळमध्ये येण्यासाठी त्याच्या काही जवळच्या नातेवाईकांना निरोपही पाठवला आहे. याशिवाय चार्ल्सने त्याच्यावर पुस्तके लिहिणाऱ्या काही परदेशी पत्रकार आणि लेखकांनाही काठमांडूला बोलावले आहे. हयात हॉटेलमध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शोभराजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आणि काही चित्रपटही बनले आहेत. नुकतीच शोभराजवर एक वेब सीरिजही प्रदर्शित झाली, जी खूप चर्चेत आली. शोभराज तुरुंगातून बाहेर येताच त्याला सर्वप्रथम काठमांडूतील शहीद गंगालाल रुग्णालयात नेण्यात येईल. जिथे त्याची तपासणी केली जाईल. पाच वर्षांपूर्वी कारागृहात असताना शोभराज यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. याचा पाठपुरावा करण्यासाठी शोभराज यांनी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना भेटण्याची वेळ मागितली आहे. एकूण वयाचा आणि तब्बेतीचा दाखला देत तुरुंगातून बाहेर पडणा-या चार्ल्स शोभराजची (Charles Sobhraj) राहणी तुरुंगात जाण्यापूर्वी जशी अलिशान होती, तशीच तुरुंगातून बाहेर आल्यावरही असणार आहे. हा कुख्यात बिकनी किलर आपलं उर्वरित आयुष्य कुठे आणि कसं व्यतित करतो, यावर मात्र पोलीसांची नजर असणार आहे.
सई बने