24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. वरवर पहाता या घटनेचे बहुतेकांनी विश्लषण करतांना आता युक्रेनचे काही खरे नाही, असाच अर्थ लावला होता. अगदी नखाएवढा देश बलाढ्या अशा रशिया समोर फार वेळ टिकाव धरु शकणार नाही, असा जगातील सगळ्याच जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता. काहींनी हे युद्ध फारतर पंधरा दिवसात संपेल असं भविष्यही सांगितलं होतं. पण या सर्वांवर युक्रेननं मात केली. फक्त जाणकारांवरच नाही, तर बलाढ्य अशा रशियावरही युक्रेननं आता मात करायला सुरुवात केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्याला आता तब्बल 200 दिवस झाले. (Russia-Ukraine war)
200 दिवस रशियाला झुंझवणाऱ्या युक्रेनमधून पहिली मोठी बातमी आली आहे ती म्हणजे आता रशियन सैन्य युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांमधून माघारी परतायला लागले आहे. एकीकडे युक्रेनच्या युद्ध कौशल्याचा हा विजय असला तरी या लहानग्या देशानं त्याची जबर किंमत मोजली आहे. आतापर्यंत 5700 हून अधिक नागरिक ठार झाले असून त्यामध्ये 300 पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश आहे. युद्धामुळे 20 लाख युक्रेनीयन नागरिकांनी पलायन केले आहे. त्यात 200 पेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या मुलांचे शोषण झाल्याचा आरोपही करण्यात येतोय.
आतापर्यंत या युद्धात उद्धवस्त झालेल्या युक्रेनच्या बाजूने चांगल्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आता रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने, युक्रेनच्या खार्किव शहरातून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनं युक्रेनमध्ये आनंद व्यक्त झाला असला तरी पुन्हा नव्यानं युक्रेनची उभारणी करणे हे एक आव्हानच असणार आहे..
रशियाने युक्रेनवर 3,500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. परिणामी हा संपन्न देश आता भकास असा झाला आहे. यापेक्षा अधिक भयावह म्हणजे अनेक सैनिकही मारले गेले आहेत, त्यांची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही. शिवाय काही सैनिक युद्धकैदी म्हणून रशियाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचीही हमी नाही. (Russia-Ukraine war)

देशाची अशी परिस्थिती असतानाही युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी खार्किव शहर रशियामुक्त झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे आणि लवकरच कीव शहरही पुन्हा ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही युक्रेनच्या इझुम भागातून आपले सैन्य मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे युक्रेनच्या सैन्याचे मोठे यश मानण्यात आले आहे. (Russia-Ukraine war)
रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनच्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र काही नागरिक अद्यापही युक्रेनमध्ये आहेत. आता परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असा आशावाद त्यांना आहे. युद्धामुळे बंद झालेला हॉटेल व्यवसायही काही स्थानिकांनी पुन्हा सुरु केला असून आपला देश पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा नागरिकांना वाटत आहे.
या सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात पुर्नबांधणी प्रकल्प राबवण्याची गरज आहे. त्यासोबत हजारो नागरिकांना मानसिक धक्का बसला आहे. संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलांचे विनाकारण बळी गेले आहेत, या सर्वांनाही सावरण्याची गरज आहे. एका अहवालानुसार युक्रेनच्या विविध शहरात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. (Russia-Ukraine war)
डोनेस्तकमध्ये 388, खार्किवमध्ये 204, कीवमध्ये 116, मायकोलायवमध्ये 71, लुहान्स्कमध्ये 61, खेरसनमध्ये 55 आणि झापोरिझियामध्ये 46 मुलांचा मृत्यू झाला. याशिवाय हजारो मुले अनाथही झाली आहेत. या सर्वांनाच आधाराची गरज आहे. युक्रेनची लिव, खार्किव, कीव आणि खोरासान पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
युक्रेनमध्ये 24 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी रशियाने केलेल्या हल्ल्यालाही 6 महिने पूर्ण झाले. युद्ध परिस्थितीमुळे यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा झाला नाही. एका अहवालानुसार युक्रेनमध्ये 1900 शिक्षण संस्था उद्ध्वस्त झाल्या असून युक्रेनचे आतापर्यंत 48 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. या युद्धात अनेकवेळा मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे.
डिसेंबर 2021 मध्ये, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी NATO च्या सदस्यत्वाची घोषणा केली. युक्रेनच्या या घोषणेपासून रशिया संतप्त झाला आहे. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उघड नाराजी व्यक्त केली. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास तो रशियाला डोईजड होईल अशी भीती रशियाला आहे. युक्रेन आणि रशियाची 2 हजार किलोमीटरहून अधिक सीमा आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटोच्या सैन्याला युक्रेनमध्ये सहज प्रवेश मिळेल आणि त्याद्वारे रशियाच्या सिमेजवळ नाटोचे सैन्य येऊ शकते, अशी शक्यता आहे. पुतीन यांना ही शक्यता धोक्याची वाटते. यामुळेच रशिया, युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्याबाबत इशारे देत आहे. युक्रेन कधीही नाटोमध्ये सामील होणार नाही याची हमी रशियाला हवी आहे. या हमीवरच युद्ध कधी थांबणार हे नक्की होणार आहे.
हे ही वाचा: ‘या’ ठिकाणी महिलांना नो एन्ट्री, जाणून घ्या काय आहे कारणं
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स यांनी युक्रेन युद्ध हरले आहे, असा उल्लेख केला. आता युक्रेनला अमेरिका आणि इतरही राष्ट्रांकडून शस्त्रपुरवठा होत आहे. मात्र रशियाला कोणीही दुर्लक्षित करु शकत नाही. पुतिन हे आयत्यावेळी काय निर्णय घेतील, याची धास्ती सर्वांनाच आहे. एकूण युद्ध थांबल्यास तो रशियाचा पराभवच धरला जाईल आणि हाच शब्द पुतिन यांना त्रस्त करणारा आहे. त्यामुळेच त्यांची अंतिम भूमिका काय आहे, यावरच या युद्धाचे भविष्य अवलंबून रहाणार आहे.
– सई बने