परी बघितली आहे का, या प्रश्नाचं उत्तर बाकी कोणाला विचारलं तर ‘नाही’ असं असेल, पण इंग्लडमधल्या नागरिकांना हाच प्रश्न विचारला तर ते नक्की सांगतील, “हो, आम्ही परी बघितली आहे आणि ती आजही आमच्या मनात आहे.” ही परी दुसरी तिसरी कोण नसून प्रिन्सेस डायना (Princess Diana) आहे.
ब्रिटनच्या राजघराण्याची सून, प्रिन्स चार्ल्सची पत्नी, प्रिंन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरीची आई….या व्यतिरिक्त डायनाची ओळख म्हणजे तमाम ब्रिटनच्या जनतेच्या मनातली राणी, परी आणि राजकुमारी. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूला 31 ऑगस्ट रोजी 25 वर्ष होत आहेत, पण प्रिन्सेस डायनाच्या सौदर्यांची मोहीनी अजूनही जनतेच्या मनावर कायम आहे.
प्रिन्सेस डायनाच्या (Princess Diana) अपघाती मृत्यूनंतर कधी नव्हे ती ब्रिटनची जनता राजघराण्यावर नाराज झाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याची शंकाही तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली होती. दरवर्षी डायनाची आठवण काढताना तिचे चाहते, या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणीही करतात. या घटनेत राजघराण्याला लागलेला डाग मात्र पुसला गेला नाही, हेही तेवढचं खरं आहे.
29 जुलै 1981 रोजी प्रिन्स चार्ल्सशी विवाह झाल्यानंतर लेडी डायना राजकुमारी डायना झाली. ब्रिटिश राजघराण्याचे 32 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांनी लेडी डायनाबरोबर लग्न केले. सेंट पॉल कॅथेड्रल येथे झालेला हा विवाह सोहळा सुमारे सातशे पन्नास लोकांनी दूरदर्शनवर पाहिला. लग्नानंतर डायनाला प्रिन्सेस ऑफ वेल्स, डचेस ऑफ कॉर्नवॉल, डचेस ऑफ रोथेसे, काउंटेस ऑफ चेस्टर आणि बॅरोनेस ऑफ रेनफ्रू या पदव्याही मिळाल्या.
19 वर्षांची डायना तेव्हापासून लाईमलाईटमध्ये आली. लग्न झालं तेव्हा प्रिन्स चार्लपेक्षा डायना 13 वर्षांनी लहान होती. अवघी 19 वर्षाची डायना तेव्हापासून ब्रिटनच्या जनतेच्या मनातली राजकुमारी झाली. लाजरीबुजरी डायना, स्नेन्सर या सरदार घराण्यातली होती. मात्र राजघराण्याची सून झाल्यापासून तिचे अवघे आयुष्यच बदलले.
लग्नानंतर सुरुवातीचे दिवस हे सोन्यासारखे होते. मात्र नंतर डायनाला राजघराण्यातल्या चालीरीतींचे चटके लागायला सुरुवात झाली. त्यातच राजकुमार चार्ल्सच्या प्रेमप्रकरणाची दबक्या आवाजतली चर्चाही तिला त्रस्त करु लागली. डायनाला समजून घेणारे राजघराण्यात तेव्हा कोणीच नव्हते. राजघराण्याच्या बाहेरची व्यक्ती सून म्हणून आली आणि आता ती राजगादीच्या वारसांच्या यादीत पुढच्या क्रमाकांची दावेदार झाली, ही गोष्ट प्रमुख होती. त्याचा डायनाला त्रास होत होता. त्यातच राजकुमार चार्ल्सची वागणुकही डायनाच्या त्रासाचे प्रमुख कारण ठरली. या सर्वात एक चांगली गोष्ट झाली म्हणजे डायना आई झाली.
प्रिन्स विल्यम या डायनाच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. विल्यमच्या जन्मानंतर सर्व परिस्थिती ठिक होईल अशी डायनाची अपेक्षा होती. पण विल्यमच्या जन्मानंतर डायनाची तब्बेत आणखी बिघडली. तिचा मानसिक त्रास वाढला. गोळ्यांही घ्याव्या लागल्या. अनेक कार्यक्रमांत पांढरी पडलेली डायना दिसल्यावर यामध्ये प्रचार माध्यमात चर्चा सुरु झाली. पण सर्व ठिक आहे, असा संदेश सर्वांना मिळाला कारण डायना दुसऱ्या मुलाची आई होणार ही बातमी सर्वांना कळली.
=======
हे देखील वाचा – मूसेवालाची हत्या मी केल्याचा खुलेआम दावा करणारा सचिन बिश्नोई कोण?
=======
डायनाला (Princess Diana) दुसरा मुलगा प्रिन्स हॅरी झाला. डायना आपल्या दोन्ही मुलांसोबत आनंदात असल्याचे फोटो समोर येऊ लागले आणि राजकुमारी डायना सावरल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांना येऊ लागला. या सर्वात प्रिंन्स चार्ल्सची भूमिका महत्त्वाची होती. आत्तापर्यंत जी प्रसिद्धी राजकुमार चार्ल्स यांना मिळत होती, ती प्रसिद्धी डायनाला मिळू लागली होती. डायना जिथे जाईल तिथे पत्रकार आणि छायाचित्रकारांचा घोळका तिला पडत असे. तिच्या चाहत्यांची संख्या मोठी होती हिच गोष्ट या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी एक कारण ठरली, अशीही चर्चा आहे.
या सर्वात प्रिंन्स चार्ल्स आणि त्यांची मैत्रिण कॅमिला पार्कर यांचे प्रेमप्रकरण पुन्हा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डायनाने याबाबत जाहीर उल्लेख केल्यामुळे या शाही जोडप्यांमधील दुराव्याची कल्पना जनतेला आली. ब्रिटीश राजघराण्याने डायनावर घटस्फोटासाठी दबाव टाकल्याची चर्चा सुरु झाली. या सर्वात डायना एकाकी पडली. तिला तिच्या मुलांची काळजी होती. पण दुरावत चाललेले पतीबरोबरचे संबंधही ती असह्य होत होते. शेवटी 28 ऑगस्ट 1996 रोजी तिचा आणि प्रिन्स चार्ल्स या शाही जोडप्याचा घटस्फोट झाला.
घटस्फोट झाल्यावर डायना स्वतंत्र झाली. तिचा स्वतःचा असा मोठा चाहतावर्ग होता. राजघराण्याच्या बंधनापासून मोकळ्या झालेल्या डायनानं अनेक समाजसेवी उपक्रमात भाग घेतला. ती जिथे जाईल, तिथे हजारो नागरिक तिची एक झलक पहाण्यासाठी उपस्थित असायचे. अशातच डायनाच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही सुरु झाली. इजिप्शियन चित्रपट निर्माता आणि प्लेबॉय ‘डोडी अल फयद’ या बिझनेसमनसोबत तिचे फोटो येऊ लागले. याच डोडीबरोबर असताना एका कार अपघातात डायनाचा वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी मृत्यू झाला.
डायनाचे (Princess Diana) असे अचानक निघून जाणे हा मोठा धक्का होता. तिच्या मृत्यूला राजघराण्याला जबाबदार ठरवण्यात आले. प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी या तिच्या दोन्ही मुलांबद्दल सहानुभूती वाढली. जनतेची नाराजी एवढी होती की, राणीलाही त्यापुढे झुकावे लागले. डायनाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लाखो चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. तिच्यासाठी आणलेल्या फुलांचा मोठा डोंगर तयार झाला होता.
31 ऑगस्ट 1997 रोजी जनतेच्या मनातली राजकुमारी अपघातात मृत्युमुखी पडली, तेव्हा डायनाची आठवण फारतर काही वर्ष ठेवली जाईल, असे काहींना वाटत होते. मात्र डायना तिच्या चाहत्यांच्या मनात कायम रहाणार आहे.
25 वर्षांनंतरही डायनाच्या स्मृती तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रेमानं जतन केल्या आहेत. डायनाने वापलेल्या फोर्ड कारला एका लिलावात 6 कोटी 11 लाख एवढी किंमत मिळाली. त्यावरुनच डायनाची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नसल्याची खात्री पटते. 1980 च्या दशकात डायनाने चालविलेल्या कारचा नुकताच लिलाव करण्यात आला. लिलावाबाबत माहिती देताना लिलाव कंपनी सिल्व्हर स्टोन यांनी सांगितले की, एका खरेदीदाराने विक्री किंमतीपेक्षा 12.5% जास्त रक्कम देऊन ही बोली जिंकली. गेल्या वर्षीही डायनाच्या आणखी एका कारचा लिलाव करण्यात आला होता. त्यालाही अशीच वाढीव किंमत मिळाली होती.
राजकुमारी डायनाच्या (Princess Diana) मृत्यूमुळे राजघराण्यालाही त्यांच्या काही प्रथा परंपरा बदलाव्या लागल्या. आता प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर, कॅमिला पार्कर यांच्यासोबत दुसरा विवाह केला आहे. डायनाच्या दोन्ही मुलांची, प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांचे विवाह झाले असून त्यांना मुलंही झाली आहेत. या नातवंडांच्या गोतावळ्यात डायना नक्की हवी होती….अशी रुखरुख तिच्या चाहत्यांना आहे.
आज डायना असती, तर नातवंडासोबत मनमुराद खेळली असती; त्यांना राजघराण्याच्या कडक शिस्तीपासून थोडी मोकळीक दिली असती, अशा चर्चा सोशल मिडीयावर होत असतात. अर्थातच डायना ही एक सोनपरी होती. ती आणि तिच्या आठवणी अशाच कायम रहाणार आहेत. पंचवीस काय पण पन्नास….शंभर वर्षानंतरही डायना (Princess Diana) अशीच जनतेच्या मनात कायम अधिराज्य गाजवणार आहे.
सई बने