Home » उधारीच्या रु. १० हजार भांडवलावर सुरु झाली इन्फोसिस; या व्यक्तीने दिले होते पैसे  

उधारीच्या रु. १० हजार भांडवलावर सुरु झाली इन्फोसिस; या व्यक्तीने दिले होते पैसे  

by Team Gajawaja
0 comment
Narayana Murthy
Share

कर्नाटकातल्या सिडलघट्टा नावाच्या छोट्या गावात जन्मलेला मुलगा ते भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा जनक, जगातील सर्वोत्तम १२ उद्योजकांपैकी एक पद्म विभूषण, पद्म श्री पुरस्कारांनी सन्मानित नागरिक नारायण मूर्ती (Narayana Murthy) हा प्रवास ज्या काळात झाला तेव्हा स्टार्ट- अप्स, फंडिंग, शार्क टँक्स हे शब्द जाऊ दे, पण माहिती तंत्रज्ञान हा शब्दसुद्धा कोणाला माहीत नव्हता. 

१९६७ मध्ये नारायण मूर्तींनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि नंतर आयआयटी कानपूरमधून मास्टर्स केलं. पुढे काही काळ त्यांनी आयआयएम अहमदाबादमध्ये आधी रिसर्च अस्टिस्टंट आणि नंतर चीफ सिस्टीम्स प्रोग्रॅमर म्हणून काम केलं. त्याच काळात त्यांनी भारतातल्या पहिल्या टाइम शेयरिंग कम्प्युटरवर काम केलं. (Narayana Murthy)

पुढे १९७५ मध्ये त्यांनी आपली पहिली कंपनी स्थापन केली, जिचं नाव होतं सॉफ्ट्रॉनिक्स. ही कंपनी देशांतर्गत बाजारपेठेत सॉप्टवेअर सेवा देण्यासाठी त्यांनी सुरू केली होती. पण ही कंपनी त्या काळाच्या खूप पुढची होती आणि केवळ याच कारणामुळे ती चालू शकली नाही. मूर्ती यांनी फक्त दीड वर्षात आपली कंपनी बंद केली आणि सरळ पुण्याच्या पटनी कम्प्युटर सिस्टीम्समध्ये नोकरी धरली. 

सॉफ्टवेअर सेवांप्रतीच्या पॅशनमधून सुरू केलेल्या कंपनीला ते धरून राहिले नाहीत, तर ती चालत नाही म्हटल्यावर सरळ त्यांनी ती बंद केली. आजच्या उद्योजकांना मूर्ती हेच सांगतात, की अपयश येईल म्हणून सुरुवात करायचीच नाही, हे योग्य नाही. उलट धाडस करा, त्यातून शिका आणि समजा, अपयश आलंच, तर कुठे चूक झाली ते लक्षात घ्या आणि ती परत करू नका. फक्त पॅशन आहे म्हणून त्यात अडकून राहू नका, तर पुढे जा. मूर्तींनी स्वतःसुद्धा हेच केलं. सॉफ्टवेअर सेवांना भारतात बाजारपेठ मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी निर्यातीच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.(Narayana Murthy)

=====

हे देखील वाचा – राजीव गांधी ….. पायलट ते पंतप्रधान

=====

सहा सहकारी आणि १० हजार रुपयांची उधारी

१९८१ मध्ये मूर्ती यांनी आपल्या फक्त सहा सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली. गंमत म्हणजे, तेव्हा त्यांच्याकडे भांडवलासाठी लागणारे पैसेही नव्हते. मूर्ती यांच्या पत्नी आणि आज ज्यांना जग प्रसिद्ध समाजसेविका व लेखिका म्हणून ओळखतं, त्या सुधा मूर्तींनी १०,००० रुपये भांडवलासाठी दिले आणि इन्फोसिस सुरू झाली. 

सॉफ्टवेअर किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची तेव्हा अगदी जेमतेम सुरुवात झाली होती. त्या काळात कम्प्युटर मिळवायलाही दोन वर्ष लागायची. इन्फोसिसलासुद्धा पहिला कम्प्युटर मिळाला तेव्हा १९८४ साल उजाडलं. इन्फोसिसची सुरुवातीची काही वर्ष अतिशय अवघड होती. (Narayana Murthy)

कंपनी विकत घेण्यासाठी देशापरदेशातून सातत्याने ऑफर्स यायच्या. कंपनीपुढची आव्हानं पाहाता त्या ऑफर्स मोहात टाकणाऱ्या असायच्या. आव्हानांचा सामना करत बसण्यापेक्षा चांगली किंमत घेऊन कंपनी विकणं केव्हाही सोपं होतं, मात्र मूर्ती पाय घट्ट रोवून उभे राहिले आणि त्यांनी काहीही झालं, तरी इन्फोसिस विकायची नाही असा ठाम निर्णय घेतला. १९९० मध्ये आर्थिक उदारीकरणाचं वारं वाहायला लागलं, तसं इन्फोसिसची झपाट्यानं वाढ झाली. फक्त सहा सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आज या कंपनीत किमान दोन लाख कर्मचारी काम करतात.

साधी राहाणी, उच्च विचारसरणी

साधी राहाणी हे नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचं आजही सर्वात प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. कंपनीचं उत्पन्न एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी देशात किंवा परदेशात विमानाने फिरताना कधीच बिझनेस क्लास वापरला नाही. ते कायम इकॉनॉमी क्लासचंच तिकीट काढायचे. नेत्याने आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण केला पाहिजे, त्यानं स्वतः त्याग आणि बांधिलकी दाखवली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असायचं आणि त्यांनी स्वतः त्याचं कायम पालन केलं. 

२०११ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते दररोज सकाळी ६.२० वाजता ऑफिसमध्ये हजर असायचे. आपल्या वागण्यातून त्यांनी तरुण कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याचा धडा अगदी सहजपणे घालून दिला. तत्वं आणि नीतीमूल्यं जपण्याची त्यांची निष्ठाही प्रसिद्ध आहे. इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात एका जर्मन कंपनीसाठी विकसित केलेल्या अप्लिकेशनमध्ये फक्त एका अक्षराची चूक होती, मात्र मूर्ती (Narayana Murthy) यांनी तातडीनं त्या ग्राहकाला चूक झाल्याचं कळवलं आणि नंतर ती दुरुस्त केली.

 – कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.