१९६३ च्या सुमारास मर्यादित आणि सोवळ्या स्वरुपाच्या मराठी साहित्य विश्वात ‘ठणठणपाळ’ नावाच्या लेखकानं खळबळ उडवून दिली होती. ललित मासिकातल्या सदरातून मराठी साहित्यिक आणि प्रकाशकांची धमाल चेष्टामस्करी करणारा हा ‘ठणठणपाळ’ नेमका आहे तरी कोण ही तेव्हाच्या साहित्यविश्वातली सर्वात ‘हॅपनिंग’ चर्चा ठरली होती. काही वर्ष गुलदस्त्यात राहिल्यानंतर अतिशय नाट्यमय पद्धतीने ठणठणपाळचा कर्ताकरविता लोकांसमोर अवतरला होता.(Jaywant Dalvi)
१९६९ सालची गोष्ट. मुंबईतल्या बॉम्बे डेपो या पुस्तकांच्या अतिशय प्रसिद्ध दुकानात लेखकांच्या सह्या मिळण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि एके दिवशी ‘ठणठणपाळ’ आपल्या वाचकांना सह्या देतील असं बॉम्बे बुक डेपोच्या सदानंद भटकळांनी जाहीर केलं आणि मराठी साहित्यिकांपासून वाचकापर्यंत सगळ्यांमध्ये नवा उत्साह संचारला. त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला ‘ठणठणपाळ’ म्हणजे लेखक जयवंत दळवीच आहेत, हे अगदी मोजक्या लोकांना माहीत होतं.

ललित मासिकातल्या आपल्या सदरातून ठणठणपाळ मराठी साहित्यिक आणि प्रकाशकांची मस्त खिल्ली उडवायचे. टोपणनावानं लिहित असल्यामुळे त्यांच्यातल्या मिश्किल लेखकाला रान मोकळं मिळालं होतं. कोणाचेही वाभाडे न काढता खुमासदार पद्धतीने चेष्टा करणारं त्यांचं हे सदर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. सामान्य माणसापासून अगदी पुलं देशपांडे यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांपर्यंत सर्वांमध्ये ‘ठणठणपाळ’ म्हणजे नेमकं कोण याची उत्सुकता होती, तर ना सी फडके किंवा गंगाधर गाडगीळांसारखे लेखक त्यावर नाराजही होते. मात्र, कोणालाच ठणठणपाळ नावामागे दडलेला लेखक माहीत नव्हता.(Jaywant Dalvi)
प्रसिद्ध चित्रकार वसंत सरवटे यांनीसुद्धा ‘ठणठणपाळ’ म्हणजे कोण हे माहीत नसतानाच हातात मोठा टोला घेतलेला भरदार मिशांचा ‘ठणठणपाळ’ आपल्या कल्पनेतून साकारला आणि ते सदर अजूनच लोकप्रिय झालं. सदर सुरू होऊन तीन- चार वर्ष झाली, तरी लेखकाचा पत्ता लागत नव्हता आणि अशातच भटकळांनी ‘ठणठणपाळ’ सह्या देणार असं जाहीर करत रंगत वाढवली.
असा अवतरला ठणठणपाळ
सह्या देण्यासाठी जाहीरपणे सर्वांसमोर यायची जयवंत दळवींची तयारी नव्हती कारण त्यामुळे गुप्त राहून खिल्ली उडवण्यातला बिनधास्तपणा गेला असता. त्यावर भटकळांनी खास उपाय केल्याचं सांगत त्यांना निश्चिंत केलं. भटकळांनी एका पातळ लाकडी फळीवर वसंत सरवटेंचं ठणठणपाळाचं ते प्रसिद्ध चित्र चांगलं सहा- सात फूट उंची आणि तीन फूट रूंदीत रंगवून घेतलं आणि त्याच्या पोटावर पुस्तक जाण्याइतपत फट ठेवली. सह्या घेण्यासाठी वाचकांची गर्दी व्हायच्या आतच दळवी त्या चित्रामागे लपून बसले आणि फटीतून पुस्तक घेत सर्वांना सह्या देऊ लागले. अर्ध्या तासात तिथे वाचकांची मोठी गर्दी झाली आणि सगळे जण ठणठणपाळाने बाहेर यावे म्हणून आग्रह करायला लागले.

आपलं म्हणणं ऐकत नाही तोवर वाचकांनी सहीसाठी पुस्तकं देणंही बंद केलं. मग, मात्र दळवींचा नाईलाज झाला आणि ते त्या चित्रामागून बाहेर आले. वाचकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता, मात्र आता गुप्त राहाण्यातली गंमत गेली हे जाणून दळवी मनातून जरासे खट्टू झाले. मात्र, याचा त्यांचं सदर किंवा लेखनावर जराही परिणाम झाला नाही. किंबहुना, क्वचित ठणठणपाळचे सदर नेहमीच्या घणाघाती टिकेशिवाय लिहिलेलं असलं की, जीए कुलकर्णींसारखा प्रख्यात लेखक ताबडतोब त्यांना पत्र पाठवून, ‘हे अत्यंत निराशाजनक आहे. तुम्ही लिआम (लिहून आलेला मजकूर) परत गरम करून वाढताय’ असा प्रेमळ दम द्याचचे. तब्बल वीस वर्ष हे सदर त्याच यशासह सुरू राहिलं.(Jaywant Dalvi)
=====
हे देखील वाचा – विलासरावांच्या फिल्डींगमुळे राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
=====
नाटककार दळवी
कोकणातल्या आरवली गावात मोठ्या झालेल्या दळवींनी कविता सोडून लेखनाच्या सगळ्याच प्रांतात शिखर गाठलं. महानंदा, चक्र, महासागर, अंधाराच्या पारंब्या या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. जयवंत दळवी यांचं लिखाण आणि विजया मेहता दिग्दर्शन- अभिनय यातून तयार झालेली संध्याछाया, बॅरिस्टर, पुरुष अशी नाटकंही प्रचंड गाजली.
दळवींच्या लिखाणात दिसणारा मानवी नात्यातील गुंता, रंगमंचावर हळूहळू फुलणारा, डोळ्यांचा कडा ओलसर करणारा त्यांचा निरागस विनोद यांच्या आठवणी विजया मेहता यांनी लिहून ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, नाटककार म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या दळवींची या क्षेत्रातली सुरुवात अपयशानं झाली होती. त्यांनी अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर नाटक लिहून नाट्यलेखनाची सुरुवात केली, पण त्यांच्या प्रयोगांना यश मिळत नव्हते. अखेर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून, फुकट पास वाटत नाटकाचा प्रयोग ठेवला आणि त्याला गर्दीही जमली.(Jaywant Dalvi)

नाटक पाहाण्यासाठी आलेले मंगेश पाडगावकर काहीच वेळेत कंटाळले आणि वैतागून म्हणाले, “दळवी हे बंद करा. नाटक हा तुमचा प्रांत नाही. भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाही”. त्यापैकी भाषणाची बाब दळवींच्या एरवीच्या भिडस्त स्वभावामुळे खरी होती आणि दुसरी त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर खोटी ठरवली. त्यांनी आपल्यावर झालेली टीका, आक्षेप अतिशय खिलाडूपणे घेतले आणि नंतर ‘सभ्य गृहस्थहो’ हे नाटक यशस्वी करत आपल्यावर झालेली सगळी टीका धुऊन काढली.(Jaywant Dalvi)
- कीर्ती परचुरे