Home » मैत्री राजकारणापलिकडची – राजकारणात विरोधक, तर प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जिवाभावाची मैत्री

मैत्री राजकारणापलिकडची – राजकारणात विरोधक, तर प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जिवाभावाची मैत्री

by Team Gajawaja
0 comment
Share

ऑगस्ट महिना सुरु झाला की, तरुणाईला ‘फ्रेंडशिप डे’चे वेध लागतात. पण फ्रेंडशिप डे हा फक्त तरुणाईचा असतो असं कुठे आहे? मैत्री कुठल्याही वयात, कुणाशीही होते. राग-लोभ-रुसवे-फुगवे, सामाजिक, वैचारिक, आर्थिक दरी यातलं काही म्हणजे काही मैत्रीच्या आड येत नाही. (Friendship Day 2022)

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस रंगलेली नाराजीनाट्य, मोडलेली युती-आघाडी आणि बदललेली राजकीय समीकरणं या पार्श्वभूमवीर राजकारणातल्या लोकांची खरंच एकमेकांशी निरपेक्ष मैत्री असते का? राजकारण्यांची मैत्री ही फक्त पद आणि खुर्ची पुरतीच मर्यादित असते का? असे अगदी स्वाभाविक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. म्हणूनच ‘फ्रेंडशिप डे’चं (Friendship Day 2022) निमित्त साधून राजकारणातल्या व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यातलं ‘मैत्र’ यांचा आढावा घेणं अनिवार्य ठरतं.

 

=====

हे देखील वाचा – सुषमा स्वराज: वाजपेयी काळात घेतला होता महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे बहरली चित्रपटसृष्टी

=====

शरद पवार – बाळासाहेब ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली मैत्री तर महाराष्ट्र जाणतोच. देशाच्या राजकारणात काहीही खुट्ट झालं तरी त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जाते, ती त्यांच्या या सर्वपक्षीय मैत्रीमुळेच! शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे ही दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीची महाराष्ट्रातली दोन दिग्गज माणसं, पण त्यांच्या मैत्रीच्या आड ही परस्पर विरुद्ध विचारसरणी कधीही डोकावली नाही, हे विशेष. 

आमची मैत्री असूनही आमच्यावर ठाकरी भाषेत टीका करण्याची संधी बाळासेहब कधीही सोडत नसत. आम्हीही त्यांना प्रत्युत्तर देत होतो, पण त्यामुळे आमच्यातल्या व्यक्तिगत नात्यावर कधीही परिणाम झाला नाही, असं शरद पवार आजही आवर्जून सांगतात. 

२००६ मध्ये सुप्रिया सुळे पहिल्यांदाच राज्यसभा निवडणुक लढवणार होत्या तेव्हा बाळासाहेबांनी फोन केला आणि – सुप्रिया निवडणुक लढवणार हे तुम्ही मला सांगितलं नाहीत, अशी तक्रार केली. तुमची भाजपबरोबर युती आहे, म्हणून सांगितलं नाही; या उत्तरावर सुप्रिया लहान असल्यापासून मी तिला पाहिलंय. ती तुमची मुलगी आहे, तशी माझीही मुलगी आहे. शिवसेनेचा एकही उमेदवार सुप्रियाच्या विरोधात निवडणुक लढवणार नाही, असं बाळासाहेबांनी तेव्हा सांगितल्याची आठवण शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात नोंदवली आहे. राजकारणात राहुनही व्यक्तिगत मैत्री जोपासण्याचं याहून मोठं उदाहरण कुठलं असणार? (Friendship Day 2022 – Political Friends)

शरद पवार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचे किस्सेही फ्रेंडशिप्स डेच्या निमित्तानं आवर्जुन आठववावेत असेच आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपल्याला गुजरातमध्ये निमंत्रित केल्याचं शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी बारामतीतल्या एका विशेष कार्यक्रमात सांगितलं होतं. 

हा कार्यक्रम व्हॅलेंटाईन्स डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला झाला होता. एरवी राजकीय सभांमधून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींनी त्यावेळी मुक्तकंठाने पवारांची स्तुती केली होती. तीन चार वेळा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नाही असा आपला एकही महिना जात नाही, असं मोदींनी सांगितलेलं महाराष्ट्रातली जनता विसरणं शक्यच नाही. या कार्यक्रमानंतर एकमेकांवर तिखट जळजळीत शब्दात टीका आम्ही दोघेही करु शकतो, कारण आमचे विचार वेगळे आहेत, पण विकासाच्या वाटेवर देश पुढे जावा हे आमचं ध्येय मात्र सारखं आहे असं म्हणत मोदींनी त्यावेळी पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भाष्य केलं होतं. मोदी पवार यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगली होती. (Friendship Day 2022 – Political Friends)

मोदी आणि पवार यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता दोन्ही नेत्यांच्या पक्षातले तरुण आणि महत्त्वाकांक्षी नेते – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतात. दोन्ही नेत्यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतरही त्यांच्या परस्पर मैत्रीची खुसखुशीत चर्चा रंगली ती वेगळीच. 

राजकारण हे क्षेत्र चांगलं की वाईट, राजकीय नेत्यांना सत्तेपलिकडे काही दिसतं की नाही, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना सतत पडतात. ते साहजिकही आहे. पण सत्ता आणि पद प्रतिष्ठेपलिकडे जाऊन एकमेकांबद्दल वैयक्तिक स्नेहभाव जपणारी मैत्री करणारे राजकारणी आहेत, तोपर्यंत राजकारण आणि राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.