नाव ‘भारत’ आणि जन्म १५ ऑगस्ट नावाला साजेशी कामगिरी तर यांनी करूनच दाखवली. निव्वळ देशाच्या सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करणे म्हणजे देश सेवा नसते, एक सच्चा आणि प्रामाणिक नागरिक सुद्धा देशसेवा करत असतो.
भारत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला तर पोट धरून हसवलंच पण ‘चला हवा येऊ द्या’ च्या निम्मित्याने भारत दौरा करत निरनिराळ्या राज्यात जाऊन लोकांना पोट धरून हसायला लावलं. एका चांगल्या अभिनेत्याचं काम असत आपल्या कलाकृतीशी एकनिष्ठ राहत लोकांच मनोरंजन करणे. भारत आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक राहिले आहेत. सुरवातीला शिक्षण पूर्ण झाल्यावर एम.पी.एस.सी. च्या परीक्षेच्या निम्मित्ताने त्यांनी मुंबई गाठली खरी; पण मनात स्वप्न होतं ‘अभिनेता’ बनायचं. थोडके पैसे घेऊन भारत गावावरून मुंबईत आले.
छोट्या-मोठ्या भूमिका, मिळेल ते काम करण्याची तयारी असल्याने भारत यांनी आपल्या कष्टात कुठेही कसूर केली नाही. सुरवातीच्या काळात पैशांची चणचण होती. खूप स्ट्रगल चालू असताना सेटवर पडेल ते काम करत भारत यांनी केले, पण आपली अभिनया प्रतीची निष्ठा कुठेही कमी होऊ दिली नाही. पुढे ‘थरार’ सारख्या मालिकेतून भारत यांचा चेहरा रसिकांसमोर आला.
त्यापुढे ‘फु बाई फु’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘चला हवा येऊ द्या’ अशा कार्यक्रमातून भारत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खो-खो हसायला लावलं. चला हवा येऊ द्या च्या निम्मित्ताने त्यांनी विदर्भाच्या भाषेची गोडी रसिकांना लावली, आणि हळू हळू ‘विदर्भाचा आवाज: भारत गणेशपुरे’ अशी त्यांची ओळख होऊ लागली. विलन, सिरिअस, कॉमेडी अशा वेगवेगळ्या भूमिका सुद्धा त्यांनी आजवर अनेक चित्रपटातून पार पडल्या, अर्थात विलन म्हणून त्यांचा प्रसंगी राग आला, कधी दिलेल्या संदेशाने डोळे पाणावले, पण तरीही कॉमेडी किंग भारत गणेशपुरे लोकांची पाहिली पसंती ठरली.
फिल्म इंडस्ट्रीत काहीही ओळख नसतानाही, इथे येऊन शून्यापासून आपला प्रवास सुरु करणारे भारत यांना आज आपण कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखतो. आपले कष्ट, मेहनत, आणि कामाशी एखादा कलाकार प्रामाणिक राहतो तेव्हा सुरवातीचा काळ स्ट्रगलचा असला तरी, कलाकाराला यश नक्की मिळतं हा आदर्श भारत यांनी इंडस्ट्रीत नव्याने येणाऱ्या प्रत्येक नवोदित कलाकारापुढे आपल्या स्वतःच्या उदाहरणातून मांडला आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारत गणेशपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! या धकाधकीच्या जीवनात, सगळ्यांवर टेन्शनची तलवार असताना तुम्ही आम्हाला या पुढेही असेच हसत ठेवाल ही खात्री आहे.
-कांचन नानल