एसबीआय (SBI)- ७ महत्वाच्या गोष्टी
भारतामधील सरकारी बँकांचा विषय निघाला की पहिले नाव डोळ्यासमोर येते म्हणजे ‘एसबीआय (SBI)’. भारतामधील ही सर्वात मोठी सरकारी बँक असून देशातील लाखो लोकांचे खाते या बँकेत आहे. तर अशा या सर्वात मोठ्या सरकारी बँकेबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
१. स्टेट बँकेचे आधीचे नाव ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ होते. १९५१ साली पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली तेव्हा त्यामध्ये देशामधील ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तोपर्यंत इम्पीरियल बँक ऑफ इंडियासह देशातील व्यावसायिक बँका शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या. या बँका ग्रामीण भागातील आर्थिक पुनर्रचनेच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार नव्हत्या. त्यामुळे ग्रामीण भागाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ग्रामीण पत सर्वेक्षण समितीने ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ ताब्यात घेऊन सरकारी-सहभागी आणि सरकार-प्रायोजित बँक स्थापन करण्याची शिफारस केली. यानंतर एसबीआयची स्थापना झाली. १ जुलै १९५५ पासून अंमलात आलेल्या भारतीय संसदेने १९५५ च्या भारतीय कायद्यानुसार इंपीरियल बँकेचे नाव बदलून त्याचे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ असे नामकरण केले.
२. बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे या तीन बँकांचे २७ जानेवारी १९२१ रोजी ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ म्हणजेच सध्याच्या एसबीएआय मध्ये विलीनीकरण करण्यात आले. बँक ऑफ बंगाल ही सर्वात जुनी बँक असून तिची स्थापना २ जून १८०६ रोजी बँक ऑफ कलकत्ता म्हणून करण्यात आली होती. जी नंतर २ जानेवारी १८०९ पासून बँक ऑफ बंगालमध्ये बदलली गेली. या बँकांचे लोगो वेळोवेळी बदलत राहिले.
३. एसबीआय ही चीनमध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक आहे. तसेच जम्मू -काश्मीर व कारगिल प्रदेशातील द्रास येथे एटीएम उघडणारीही पहिली बँक होती एसबीआय
४. रिझर्व्ह बँकेचा एजंट म्हणून ही बँक काम असते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टेट बँक ऑफ इंदूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ पटियाला या सात सहयोगी बँका होत्या. या सर्व बँकांचे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
५. ऑक्टोबर १९६३ मध्ये, एसबीआयने लंडनमध्ये आपली पहिली शाखा उघडली आणि भारतीय उच्चायुक्तालयाची बँकर म्हणून काम पाहू लागली.तत्पूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) हे कार्य करत असे. भारताव्यतिरिक्त, जगभरातील ३२ देशांमध्ये एसबीआयची एकूण १३७ विदेशी कार्यालये आहेत.
हे ही वाचा: हुंड्याच्या पैशातून जगातील पहिल्या गाडीचा शोध लागला; आणि पुढे याच गाडीमुळे औद्योगिक क्रांती घडली
‘असा’ लागला होता पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा शोध! त्याचे प्रकार वाचून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल
६. स्टेट बँक ही भारतातील जुनी बँक असून ही सरकारी बँक भारताच्या अर्थकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. आजच्या घडीला भारतामध्ये एसबीआयची एकूण ६२,६१७ एटीम सेंटर्स आहेत.
७. स्टेट बँक ऑफ इंडिया या संकल्पनेचा उदय एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात २ जून १८०६ रोजी बँक ऑफ कलकत्ताच्या स्थापनेसह झाला. तीन वर्षांनंतर बँकेला तिची सनद मिळाली आणि २ जानेवारी १८०९ रोजी बँक ऑफ बंगाल म्हणून तिची पुनर्रचना करण्यात आली.
-निवास उद्धव गायकवाड