वयाचा ठराविक टप्पा ओलांडला की, काही आजार हे कधी कुठून सोबतीला येतात, याची जाणीवही होत नाही. त्यापैकीच एक म्हणजे गुडघेदुखी. वयाची पन्नाशी ओलांडली की, गुडघेदुखीच्या तक्रारी करणारे अनेकजण सापडतात. सुरुवातीला काही वेदनाशामक गोळ्यांमुळे या वेदना दूर करण्याचा प्रयत्न केला तरी हा काही कायमचा उपाय ठरू शकत नाही. मात्र या गुडघेदुखीत यागोसनांची एक सप्तपदी पाळली आणि नियमीत ही सात आसने जरी केली तरी त्याचा फायदा होतो. (Yoga for knee pain)
गुडघेदुखी कमी करण्यासाठी योग हा एक सोपा उपाय आहे. या आसनांमुळे पाय मजबूत होतात त्यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. यात वीरासन, मालासन, मकरासन, उत्थित पार्श्वकोनासन, पार्श्वोत्थानासन, त्रिकोणासन, गरुडासन या सात योगासनांचा जरी रोज सराव केला तरी या दुखण्यापासून बऱ्याच प्रमाणात आराम पडतो. तसंच जी मंडळी पहिल्यापासूनच योगसाधनेच्या मार्गात आहेत, त्यांना पन्नाशी काय पण वयाची सत्तरी पार केली तरी गुडघेदुखीचा त्रास जाणवत नाही, असे स्पष्ट झाले आहे.
====
हे देखील वाचा – ऑफिसच्या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसेल, तर चिंता नको…ऑफिसमध्ये बसल्या जागीही करू शकता काही सोपे योगप्रकार
====
गुडघेदुखी ही एरवी फार छोटी गोष्ट वाटू शकते. पण गुडघ्यांवर सूज, लालसरपणा, वेदना व्हायला लागली, तरत्यामुळे फक्त शारीरिक पीडाच नाही, तर मानसिक त्रासही होतो. गुडघ्यांच्या खालच्या बाजूला ठणका लागतो. थोडीशी जरी शारीरिक हालचाल झाली तरी गुडघ्यांची वेदना मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शारीरिक हालचाली सावकाश कराव्या लागतात. (Yoga for knee pain)
वीरासन
योगासनांमुळे शरीराच्या स्नायूंना ताण मिळतो आणि अशा वेदना कमी होतात. योगामुळे गुडघे निरोगी आणि लवचिक होतात. गुडघ्याच्या आसपासचे स्नायू बळकट झाल्याने वेदना कमी होते. यात वीरासन हे एक उत्तम आसन आहे. वीरासन केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरणाचा वेग वाढतो आणि मांड्या, गुडघे येथे ताण मिळून आराम वाटतो. या आसनाचा रोज 30 ते 60 सेकंदापर्यंत सराव केल्यास त्याचा फायदा होतो.
मालासन
गुडघेदुखीमध्ये पाय बळकट करण्यासाठी मालासन या आसनाचाही फायदा होतो. यात शरीरातील पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते.
मकरासन
गुडघेदुखीच्या दुखण्यात मकरासन मलमासारखे काम करते. या आसनामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. या आसनाचा सराव योगसाधनेच्या अखेरीस केला जातो. अगदी पाच मिनीटापर्यंतही हे आसन करता येते त्यामुळे त्याचा फायदाही जास्त मिळतो. (Yoga for knee pain)
उत्थित पार्श्वकोनासन
पाय, मांड्या, गुडघे आणि घोटे यांसारखे अवयव या आसनामुळे बळकट होतात. शरीरातील स्नायूंना आवश्यक असलेला ऑक्सीजनचा पुरवठा या आसनाद्वारे सुलभपणे होतो. परिणामी तेथील दुखणे दूर होते.
पार्श्वोत्थानासन
शरीराला संतुलन देण्यासाठी पार्श्वोत्थानासनासारखे आसन नाही. याला ‘पिरॅमिड आसन’ असेही म्हटलं जातं. कारण पुढच्या बाजूला झुकून हे आसन केले जाते. संपूर्ण शरीराला संतुलन देणारे हे आसन आहे. (Yoga for knee pain)
त्रिकोणासन
जी मंडळी लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि शरीराचा अतिरिक्त भार गुडघ्यांवर पडल्यामुळे गुडघे दुखतात त्यांच्यासाठी त्रिकोणासन उपयुक्त ठरते. या आसनाच्या नियमित सरावाने अतिरिक्त वजन कमी होऊन गुडघ्यांवर येणारा ताण कमी होतो.
गरुडासन
वयाची पन्नाशी ओलांडल्यावर पायाच्या पोटऱ्या अनेकवेळा दुखतात. विशेषतः महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. यासाठी गरुडासन उपयुक्त आहेत. गरुडासनामुळे अंगात लवचिकता येते. सोबत पोट-यांना बळकटी मिळते आणि मांड्यांवर ताण येऊन दुखणे कमी होते.
काही वर्षापूर्वी ज्येष्ठ मंडळी काठीचा आधार न घेता चालत असत. मात्र आता हातात काठी घेतलेले आजी-आजोबा सहज दिसतात. तसेच गुडघेदुखी आहे म्हणून गुडघ्यांचे ऑपरेशन केलेलेही अनेकजण आढळतात. ही गुडघेदुखी कमी करण्यासाठी योगासन उपयुक्त ठरू शकतात. अर्थात तहान लागल्यावर विहीर खोदायला घेण्यापेक्षा योग्य वयात योगाची साथ धरली, तर गुडघेदुखी काय अन्य कोणताही आजार चार कोस दूर राहील.(Yoga for knee pain)
– सई बने