भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर सोनं. नव-या मुलीनी किती सोन्याचे दागिने घातले आहेत. तिला कोणी किती दागिने दिलेत. यावर सर्वाधिक चर्चा लग्नसमारंभात होते. भारतीयांमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. सोनं खरेदी हा एक सोहळाच असतो. पण या आर्थिक वर्षापासून सोनं खरेदी आणि सोनं विक्री करण्यासाठी काही नियम सरकारनं लागू केले आहेत. मुख्य म्हणजे आपल्याकडे काही सोनं असेल आणि त्याच्याशिवाय हॉलमार्कची मोहर नसेल तर या सोन्याची विक्रीही करता येणार नाही. त्यामुळे हे हॉलमार्क काय आहे आणि सोन्याला आधार कार्डप्रमाणे 6 अंकी कोड असणार म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Gold New Rule)
नव्या आर्थिक वर्षापासून, म्हणजे 1 एप्रिलपासून कोणत्याही ज्वेलर्सला हॉलमार्क टॅगशिवाय सोने विकता येणार नाही. केंद्रसरकानं यासंदर्भात कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता सोन्यावर 6 अंकी कोड टाकला जाणार आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेकांच्या मनात संभ्रम आहे. मुळात यामुळे सोन्याच्या किंमतीवर काही परिणाम होणार का? सोन्याची किंमत अधिक वाढणार का? अगदी थोडं म्हणजे एक ग्रॅम सोनं खरेदी करतानाही हा नियम पाळावा लागणार का? (Gold New Rule) असे प्रश्न ग्राहकांना सतावत आहेत. त्यात एप्रिल आणि मे हे दोन महिने लग्नसमारंभाचे म्हणून ओळखले जातात. यात सोन्याची खरेदी जास्त होते. काही दिवसांवर अक्षय तृतीयाही आहे. अशावेळी आलेल्या या हॉलमार्कच्या नियमामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
मुळात हे समजून घेतले पाहिजे की, हॉलमार्कमुळे सोन्याच्या किंमती वाढणार नाहीत. ज्वेलर्सकडून खरेदी करत असलेले सोने शुद्ध आहे की नाही, हे जाणण्याची विशिष्ट पद्धती आहे. सोन्याची शुद्धता भारतीय मानक ब्युरो अर्थात BSI द्वारे तपासली जाते. ही संस्था सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंनी बनवलेल्या दागिन्यांचे किंवा कलाकृतींचे परीक्षण करते. जर धातू शुद्ध असेल तर त्याला चिन्ह दिले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला हॉलमार्क म्हणतात. भारतात सोन्याची खरेदी मोठ्याप्रमाणात होते. कितीही किंमत वाढली तरी भारत सोन्याच्या खरेदीत दुस-या क्रमांकावर आहे. सोनं लग्नसमारंभासाठी जसं घेतलं जातं, तसंच सोन्याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं. अशा परिस्थितीत खोटे किंवा कमी शुद्धतेचे सोने खरे करु नये…नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्याचे हॉलमार्किंग (Gold New Rule) करण्यात येत असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे. याप्रक्रियेत हॉलमार्क केलेले सोने ओळखणे सोपे होणार आहे. कारण ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये 12 अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. या क्रमांकाद्वारे सोन्याचा शोध घेतल्यास किती कॅरेटचे सोने आहे हे शोधणे शक्य होणार आहे. दागिने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे. देशभरात सोन्यावर ट्रेड मार्क देण्यासाठी 940 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आणि मागणीप्रमाणे त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. (Gold New Rule)
आता दागिने खरेदी करतांना ग्राहकांना अनेक गोष्टी त्यावर आहेत की नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक दागिन्यावर ट्रेडमार्क म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचा लोगो आहे की नाही, हे पहावे लागणार आहे. सोन्यावर 22K916 लिहिले असेल तर ते सोने 22 कॅरेट आहे आणि ते 91.6% शुद्ध आहे, हे ओळखणे सोप्पे होईल. तसेच सोन्यावर 18K750 लिहिले असल्यास सोने 18 कॅरेट आहे आणि ते 75% शुद्ध आहे. सोन्यावर 14K585 लिहिले असल्यास ते 14 कॅरेट सोने आहे आणि ते 58.5% शुद्ध आहे, हे ग्राहकांनाही ओळखणे सोप्पे होणार आहे. अर्थात ही सर्व प्रक्रीया अचानक लागू झाली असे नव्हे. जून 2021 मध्ये, बनावट सोन्याची विक्री आणि दागिन्यांची चोरी रोखण्यासाठी भारत सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केले.
=======
हे देखील वाचा : महिलांमध्ये Egg Freezing चा ट्रेंन्ड का वाढतोय?
=======
1 जून 2021 पर्यंत सोन्याचे हॉलमार्किंग (Gold New Rule) आवश्यक नव्हते. तेव्हा HUID क्रमांक 4 अंकांचा होता. यानंतर 1 जुलै 2021 पासून हॉलमार्क क्रमांक 6 अंकी करण्यात आला. आता 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता 1 एप्रिलपासून केवळ सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. तसेच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हा नवा नियम लागू होण्यापूर्वी चार अंकी मालाचा साठा साफ करण्यासाठी एक वर्ष नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आता ती मुदत संपली आहे. नवीन हॉलमार्क क्रमांक सर्व सोने, सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाण्यांसाठी लावण्यात येईल. मग ज्या दागिन्यांवर असा सहा अंकी हॉलमार्क नाही त्यांचं काय, हा प्रश्न आला असेल तर, ज्वेलर्स ग्राहकांकडून हॉलमार्क नसलेले जुने सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि नाणी परत खरेदी करु शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. अर्थात आत्तातरी हॉलमार्कची सक्ती फक्त सोन्याच्या दागिन्यांसाठी आहे, चांदीसाठी नाही.