Home » 51 Shakti Peethas : देवीच्या शक्तिपीठांचा महिमा !

51 Shakti Peethas : देवीच्या शक्तिपीठांचा महिमा !

by Team Gajawaja
0 comment
51 Shakti Peethas
Share

देशभरातील देवींच्या मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी सुरु झाली आहे. त्यातही देवीच्या शक्तीपीठांमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हिंदू धर्मात या शक्तीपीठांना वेगळे महत्त्व आहे. येथे माता शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. श्रीमद् देवी भागवतमध्ये 51 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. तर तंत्र चुडामणीत 52 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. यात कामाख्या शक्तीपीठ, आसाम, महाकाली, कोलकाता, ज्वालामुखी, हिमाचल प्रदेश, शाकंभरी, सहारनपूर आणि पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या हिंगलाज माता मंदिर अशा काही प्रमुख मंदिरांचाही समावेश आहे. देवीची ही शक्तीपीठे निर्माण कशी झाली याचीही कथा आहे. देवी सतीच्या शरीराचे अवयव, कपडे आणि दागिने जिथे पडले, तिथे या शक्तीपिठांची निर्मिती झाली. आज या सगळ्या शक्तीपीठांमध्ये नवरात्रीनिमित्त पूजा आणि होमहवन होणार आहेत. (51 Shakti Peethas)

देशभरातील देवीच्या मंदिरांची सजावट सुरु आहे. देशभरात देवीची 52 शक्तीपीठांमध्ये नवरात्रीपासून हजारो भाविक गर्दी करणार आहेत. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराची पत्नी असलेल्या देवी सतीनं तिचे वडिल तिचे राजा दक्ष यांच्या संमतीशिवाय भगवान शंकराबरोबर लग्न केले. त्यामुळे राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या मोठ्या यज्ञाला माता सती आणि भगवान शंकर यांना आमंत्रण दिले नाही. मात्र माता सती आपल्या वडिलांच्या घरी गेली. तेव्हा राजा दक्षानं मातेचा आणि भगवान शंकराचा अपमान केला. आपल्यामुळे आपल्या पतीचा अपमान झाला, हे जाणून व्यथित झालेल्या माता सतीनं यज्ञातील पवित्र अग्नीत उडी घेतली.

यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले. त्यांनी माता सतीच्या मृतदेहासह शिव तांडव करायला सुरुवात केली. यामुळे विश्वाचा नाश होऊ शकतो, हे जाणून भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले. पृथ्वीवर मातेचे अवयव आणि अलंकार 52 ठिकाणी पडले. तिथेच मातेचे शक्तीपीठ झाले. या सर्व शक्तिपीठांवर मातेचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. मात्र नवरात्रीच्या काळात हजारोंच्या संख्येनं भाविक माताराणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या शक्तीपीठांमध्ये पहिला नंबर लागतो तो वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाचा. येथे माता सतीची मणिकर्णिका पडली. येथे मातेची विशालाक्षी आणि मणिकर्णी रूपे पुजली जातात. प्रयागराज येथील माता ललिता देवी मंदिर ही शक्तीपीठ आहे. या ठिकाणी माता सतीच्या हाताचे बोट पडले होते. येथे मातेची ललिता देवी म्हणून पूजा केली जाते. माता सतीचे उजवे स्तन उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रामगिरी येथे पडले. या ठिकाणी माता शिवानी म्हणून पूजा केली जाते. वृंदावन येथील उमा शक्तीपीठामध्ये मातेच्या केसांचा गुच्छ आणि चुडामणी पडले होते. उमा शक्तीपीठ हे कात्यायनी शक्तीपीठ म्हणूनही पूजले जाते. (51 Shakti Peethas)

बलरामपूरमधील देवी पाटन मंदिरात मातेचा डावा खांदा पडल्याची आख्यायिका आहे. या शक्तीपीठात माता मातेश्वरीच्या रूपात विराजमान आहे. मध्यप्रदेशमधील हससिद्धी देवी शक्तीपीठही जागृत आहे. येथे माता सतीची कोपर पडली होती. याशिवाय मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे आईचा डावा नितंब पडला. येथे नर्मदा नदीचा उगम असल्याने, येथे नर्मतेच्या रूपात आईची पूजा केली जाते. नर्मदा माता शक्तीपीठ असे या मंदिराचे नाव आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील शिवालिक पर्वतावर देवी सतीचे डोळे पडले. येथे देवीला महिषा मर्दिनी म्हणतात. येथील नैना देवी मंदिर प्रसिद्ध आहे. हिमाचलमधील कांगडा येथे देवीची जीभ पडली, तिथे आता ज्वाला जी शक्तीपीठ आहे. पंजाबमधील जालंधर येथील कॅन्टोन्मेंट स्टेशनजवळ आईचा डावा पाय पडला. तिथे त्रिपुरमालिनी माता शक्तीपीठ आहे. अमरनाथमधील काश्मीरमधील पहलगाम येथे माता सतीचा गळा पडला, येथे महामायेची पूजा केली जाते. (Social News)

हरियाणातील कुरुक्षेत्रात आईच्या पायाची टाच पडली. येथे माता सावित्रीचे शक्तीपीठ आहे. अजमेरमधील पुष्कर येथील गायत्री पर्वतावर माता सतीचे दोन हात पडले. येथे आईचे गायत्री रूप पुजले जाते. राजस्थानमधील बिराट येथे माता सतीच्या डाव्या पायची बोटे पडल्याची आख्यायिका आहे. येथे माता अंबिका शक्तिपीठ आहे. गुजरातमधील माता अंबाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे. अंबाजी माता मंदिर जिथे आहे तिथे मातेचे हद्य पडल्याचे सांगितले जाते. गुजरातमधील जुनागढ येथे देवी सतीचे पोट पडले. येथे देवीला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात देवी सतीच्या हनुवटीचा भाग नाशिकजवळील वणी येथील जनस्थान शक्तीपीठावर पडला होता. हे मंदिर भ्रामरी शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. येथे देवीची हनुवटी पडल्यामुळे या ठिकाणाला जनस्थान असे नाव मिळाले. त्रिपुरातील उदरपूर येथील राधाकिशोरपूर गावात माताबारी पर्वत शिखर आहे. येथे मातेचा उजवा पाय पडला. येथे मातेला त्रिपुर सुंदरीच्या रुपात पुजले जाते. (51 Shakti Peethas)

बंगालमध्ये देवीची सर्वाधिक शक्तीपीठे आहेत. येथे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील तामलुकच्या विभास येथे देवी कपालिनी शक्तीपीठ आहे. येथे देवीची डावी टाच पडली होती. बंगलाच्या हुगळी येथील रत्नावलीत देवी सतीचा उजवा खांदा पडला. येथे देवीची देवी कुमारी या नावाने पूजा होते. मुर्शिदाबादच्या किरीटकोन गावात देवी सतीचा मुकुट पडला. येथे देवीचे शक्तीपीठ विमल रूप म्हणून पुजले जाते. जलपाईगुडीच्या बोडा मंडळातील सालबाधी गावात आईचा डावा पाय पडला. या ठिकाणी देवीच्या भ्रामरी रुपाची पूजा होते. वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम परिसरात माता सतीचा डावा हात पडला. येथे बहुला देवी शक्तीपीठ आहे. वर्धमान जिल्ह्यातच उजनी येथे मातेचे शक्तीपीठ आहे. येथे मातेचे उजवे मनगट येथे पडले होते. (Social News)

पश्चिम बंगालच्या वक्रेश्वरमध्ये देवी सतीची भुवया पडली होते. याठिकाणी आता देवीची महिष्मर्दिनी रुपात पूजा होते. बीरभूमच्या नल्हाटी येथे मातेच्या पायाचे हाड पडले होते, येथे आता देवीचे नल्हाटी शक्तीपीठ आहे. पश्चिम बंगलच्या अथाहामध्ये माता सतीचे ओठ पडले. येथे फुललारा देवी शक्तीपीठ आहे. नंदीपूर शक्तीपीठामध्ये माता सतीचा हात पडल्याची माहिती आहे. येथे मातेची देवी नंदिनी म्हणून पूजा होते. वर्धमान जिल्ह्यातील क्षीरग्राममध्ये मातेच्या उजव्या हाताचा अंगठा पडला. येथे युगधा शक्तीपीठ असून मातेला जुगाद्या या नावानं पुजले जाते. कालीघाटात देवीच्या उजव्या पायाचा अंगठा पडला होता. येथे कालिका देवी शक्तीपीठ आहे. पश्चिम बंगालमधील कांची येथे देवीचे हाड पडले. येथे देवगर्भाच्या रूपात आईची पूजा होते. दक्षिण भारतातही मातेची शक्तीपीठे आहेत. यात भद्रकाली शक्तीपीठ प्रमुख आहे. येथे मातेची पाठ पडल्याचे सांगितले जाते. शुची तीर्थम शिव मंदिर तामिळनाडूमधील कन्याकुमारीजवळ आहे. येथे देवीची वरची दाढ पडली होती. येथे शुची शक्तीपीठ आहे. देवीची नाभी ओडिशाच्या उत्कलमध्ये पडली होती. येथे विमला देवी शक्तीपीठ आहे. (51 Shakti Peethas)

आंध्रप्रदेशमध्ये सर्वशैल रामहेंद्री शक्तीपीठात देवीचे गाल पडले होते. येथे देवीच्या राकिनी आणि विश्वेश्वरी रूपांची पूजा होते. कुर्नूल जिह्यात श्रीशैलम शक्तिपीठ आहे. येथे देवी सतीच्या उजव्या पायाचे पायाचे पाउल पडले होते. कर्नाटकमध्ये देवीचे कान पडले. येथे मातेला जयदुर्गा रूपात पुजले जाते. प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी कामाख्या शक्तीपीठ आहे. हे मंदिर गुवाहाटी येथील निलांतल पर्वतावर आहे. मातेची योनी कामाख्यात पडली. येथे मातेच्या कामाख्या रूपाची पूजा केली जाते. कुरुक्षेत्र, हरियाणा येथे आईचा उजवा घोटा पडला. येथे भद्रकाली मातेची पूजा केली जाते. चट्टल भवानी शक्तीपीठ बांगलादेशातील चितगाव जिल्ह्यातील चंद्रनाथ पर्वतावर आहे. येथे माता सतीचा उजवा हात इथे पडला होता. बांगलादेशातील शिकारपूरपासून 20 किमी अंतरावर आईचे नाक पडले होते. येथे सुगंधा शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठाचे दुसरे नाव उग्रतारा शक्तीपीठ असेही आहे. (Social News)

========

Navratri : नवरात्रामध्ये अखंड दिवा लावताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

========

बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्यातील जयंतीय परगणा येथे आईची डावी मांडी पडली. येथे जयंती नावाने देवीची पूजा होते. बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्यात आई सतीचा गळा पडला होता. या शक्तीपीठात महालक्ष्मी रूपाची पूजा केली जाते. बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात यशोर नावाचे एक ठिकाण आहे. येथे आई सतीचा डावा तळहात पडला. याठिकाणी यशोरेश्वरी माता शक्तीपीठ आहे. श्रीलंकेतील जाफना नल्लूर येथे इंद्राक्षी शक्तीपीठ आहे. येथे देवीचे पैंजण पडले होते. नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरापासून काही अंतरावर बागमती नदीच्या काठावर गुहेश्वरी शक्तीपीठ आहे. माता सतीचे दोन्ही गुडघे येथे पडले होते. आद्य शक्तीपीठ नेपाळमधील गंडक नदीजवळ आहे. असे मानले जाते की, माता सतीचा डावा गाल या ठिकाणी पडला होता. येथे मातेचे गंडकी चंडी रूप पूजले जाते. (51 Shakti Peethas)

नेपाळमधील विजयपूर गावात माता सतीचे दात पडले होते. त्यामुळे या शक्तीपीठाला दंतकाली म्हणून ओळखले जाते. तिबेटमधील मानसरोवर नदीजवळ माता सतीचा उजवा तळहाता पडला होता. येथे माता दक्षयणी म्हणून देवीची पूजा केली जाते. भारत नेपाळ सीमेवर माता सतीचा डावा खांदा पडला होता. येथे मिथिला शक्तीपीठ आहे. मातेचे हिंगुला शक्तीपीठ पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये आहे. या शक्तीपीठात मातेला हिंगलाज देवी म्हणून ओळखले जाते. येथे माता सतीचे डोके पडले होते अशी आख्यायिका आहे. अशाप्रकारे देवीची 52 शक्तीपीठे असून यासर्व मंदिरामध्ये आता नवरात्रौत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. (Social News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.