भारतात १ लाख वाघ होते..होय १ लाख वाघ… आजपासून १०० वर्षांपूर्वी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात वाघाची डरकाळी ऐकायला यायची. हो म्हणजे त्यावेळी नरभक्षक वाघांच्या अनेक गोष्टी ऐकायला यायच्या. पण १ लाख वाघांच्या तुलनेत त्या कमीच होत्या. १०० वर्षांपूर्वी जेव्हा इंडस्ट्रीअलायजेशन व्हायच्या आधी जंगलं समृद्धा होती, तेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी जंगलांमध्ये वावरत होते. वाघांनी खाण्याची कमतरता नव्हती… पण वाघांची संख्या अचानक कमी झाली होती. म्हणजे इतकी कमी की, एका वेळेला वाटत होतं की वाघ हा प्राणीच भारतातून नामशेष होतोय की काय ? आज भारत वाघांची संख्या स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण तेव्हा अशा कोणकोणत्या गोष्टी झाल्या होत्या, ज्यामुळे वाघांची संख्या ५० हजारांपासून इतकी कमी झाली ?

आता भारत ही वाघांची भूमी आहे, पण वाघ हा मुळचा भारताचा प्राणी नाही. वाघाचं मूळ दडलेलं आहे नॉर्थ एशियामध्ये… सायबेरीयन बेटखंडाजवळ ! इथे बरेच वाघांचे जीवाश्म सापडले आहेत. म्हणजे सुरुवातीला वाघ हा थंड प्रदेशाचा रहिवासी होता. पुढे तो मायग्रेट करत भारतात आला, इथलं वातावरण त्याला भावलं. आणि तो इथेच मोठ्या प्रमाणात विसावला. आज जगाच्या तुलनेत ७५ % वाघ एकट्या भारतात आहेत. म्हणजे थोडी वर्ष मागे गेलात तर विचार करा भारतात वाघांची संख्या आणि वाघाचा दरारा काय लेव्हलचा असेल. पण काही गोष्टी अशा घडत गेल्या ज्यामुळे वाघ हा जंगलावर राज्य करणारा प्राणी हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आला. १०० वर्षांपूर्वी वाघांची संख्या लाखांमध्ये होती. याचं कारण म्हणजे जंगलं मोठ्या प्रमाणात होती. मानवाचा जंगलांमध्ये हस्तक्षेप खूपच कमी होता. मानव-वन्यप्राणी हा संघर्ष नव्हताच…वाघांची शिकार इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हती. त्यात माणूस आणि प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले नव्हते. म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे काही नरभक्षक त्याला अपवाद ठरले. पण ब्रिटिशांनी भारतात आपली मुळ रोवल्यानंतर गोष्टी बदलत गेल्या. पहिली गोष्ट तर ब्रिटिशांना वाघांची शिकार करणं भयंकर पसंत होतं. म्हणजे त्या काळात वाघांची शिकार स्टेटस सिम्बॉल मानलं जात होतं. जो वाघ मारणार तो धाडसी पराक्रमी माणूस… असा त्यांचा समज होता. याशिवाय आपला राजकीय प्रभाव दाखवण्यासाठी ते शिकारी मोहिमा आयोजित करायचे. या गोष्टी पुढे स्पोर्ट्स आणि एन्टरटेनमेंटमध्ये बदलल्या. म्हणजे कोण किती वाघ मारणार… अशी स्पर्धा लागायची. वाघांची शिकारी करणं हौशी छंद होता ब्रिटीशांचा… याला रॉयल हंटस ते म्हणायचे.
हे देखील वाचा
Chota Matka : ताडोबाच्या छोटा मटकाची इतकी दहशत का ?
पण यामध्ये आपल्या भारतातले राजे-रजवाडे पण काही कमी नव्हते. त्यांनीही इतके वाघ मारलेत, ज्याची गणती नाही. वाघ का मारायचे तर घरात सजवायला… भिंतीवर टांगण्यासाठी किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी… बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये जॉर्ज युल नावाचा ब्रिटीश अधिकारी होते. त्या एकट्याने तब्बल ४०० वाघ मारलेत असा उल्लेख आहे. म्हणजे आज महाराष्ट्रात जितकी वाघांची संख्या आहे… ती त्याने एकट्याने मारली होती. याच दरम्यान काही नरभक्षक वाघ सुद्धा ब्रिटीश अधिकारी मारत होते. यामध्ये जिम कॉर्बेट हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. त्यांनी मुख्यत्वे नरभक्षक बाघ आणि बिबटेच मारले. आता याच दरम्यान शहरीकरण वाढलं होतं. सोबत जंगलतोड तर प्रचंड वाढली होती. याचदरम्यान जे वाघ शहरी भागात किंवा मानवी वस्तीत घुसत होते, त्यांना मारलच जायचं. त्यावेळी जेरबंद करणं असं काहीच नव्हतं. कारण वाघ किती महत्त्वाचा प्राणी आहे, भारतातल्या जंगलांसाठी हे कुणालाच इतकं समजलं किंवा उमगलं नव्हतं. सोबत लोकसंख्यासुद्धा वाढत होती. १०० वर्षांपूर्वी भारताची लोकसंख्या २७ कोटींच्या आसपास होती, म्हणजे पाकिस्तान बांगलादेश एकत्र करून हा.. त्यावेळी ते भारताची भूमी होते. बरं इतकं सगळ होत गेलं आणि वाघांची संख्या घटतच गेली. शिकार तर प्रचंड वाढली आणि यावेळी इतर देशांमध्ये तस्करी करण्यासाठी वाढली. वाघांची कातडी, वाघनख, दात, हाडं यांची मागणी जगभरात प्रचंड होती आणि सगळ्यांच्या नजरा भारतावरच असायचा. त्यामुळे शिकारीला काही सीमाच राहिली नव्हती. १९७२ पर्यंत भारतात फक्त २६८ वाघ उरलेले होते, फक्त २६८ म्हणजे विचार करा… जर काही पावलं उचलली नसती… तर पुढच्या तीन वर्षात वाघ ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली असती. १९७५ नंतर जन्मलेल्यांसाठी वाघ हा प्राणी फक्त फोटो आणि गोष्टींमध्येच उरला असता… पण याच दरम्यान राबवण्यात आलं एक प्रकल्प… ज्याचं नाव होतं प्रोजेक्ट टायगर !

आता या प्रोजेक्टचे दोन प्रमुख उद्देश होते, वाघांची संख्या वाढवणं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करणं… १९७२ लाच Wildlife Protection Act लागू करण्यात आला, ज्यामुळे फक्त वाघांचीच नव्हे, तर इतर प्राण्यांचीही शिकार थांबली. टायगर टास्क फोर्ससुद्धा नेमण्यात आली. याच वर्षी वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला. भारतात टायगर रिझर्व्ह वाढवण्यात आले. या प्रोजेक्टमुळे हळू हळू का होईना पण पुढच्या ३० वर्षात वाघांची संख्या हजारांच्या आसपास पोहोचली. पण इतका कडक कायदा काढूनही शिकार थांबली होती, असं नव्हतं. शिकार सुरूच होती. पण तरीही १००० वाघ सुद्धा जंगलांसाठी पुरेसे नव्हते. वाघांची फार गरज होती. आता वाघांची गरज का असाही प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल. आता जंगल हे पृथ्वीचं वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पावसासाठी खूप गरजेचे मानले जातात. म्हणजे जंगल आहे म्हणूनच पाऊस पडतो. ऑक्सिजन निर्मिती होण्यासाठी मदत होते. पाउस पडला की नद्यांनाही पाणी येतं. आपल्यालाही पाणी मिळतं. आणि हेच जंगल टिकवायचे असतील तर हा जंगलातला राजा टिकला पाहिजे. एकंदरीत वाघांची ही साखळी आपल्यासोबत कनेक्टेड आहे. त्यामुळे वाघांना वाचवण गरजेच आहे.
हे देखील वाचा
Konkan : कोकणात वाघोबांचा वावर वाढला ! सह्याद्रीत हे १२ वाघ कुठून आले ?
२०११ पर्यंत भारतात फक्त १४११ वाघ होते. यावेळी India Tiger Action Plan 2011–2022 राबवण्यात आलं. याच्याअंतर्गत आठ नवीन टायगर रिझर्व्हसची निर्मिती करण्यात आली. त्यांना संरक्षण मिळालं आणि वाघांची संख्या वाढायला थोडीफार मिळाली. वाघांच्या संरक्षणासाठी निधीसुद्धा वाढवला. वनरक्षक स्टाफ वाढवला, TRAP कॅमेरा, शिकारी केल्यास कडक कायदे… सगळं वाढलं. आणि आज भारतातली वाघांची संख्या ४००० च्या आसपास आहे. भारतातील लोकसंख्येसोबत तुलनाच केली तर प्रत्येकी ३ लाख ७५ हजार लोकांच्या पाठीशी एक वाघ आहे. महाराष्ट्रात सध्या वाघांची संख्या ४४४ आहे. महाराष्ट्रात आता ६ व्याघ्र प्रकल्प आहेत… त्यापैकी मुख्य ताडोबा… नंतर पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर आणि सह्याद्री !आज वाघांची संख्या थोडीफार जास्त असली तरी पुरेशी नाही. कारण ज्या वेगाने जंगलतोड होत आहे, शहरीकरण होतंय. इंडस्ट्रीज उभ्या राहत आहेत. त्यानुसार भविष्यात त्यांचा डोळा संरक्षित व्याघ्र प्रकल्पाकडे न वळावा., एवढंच वाटतं. त्यामुळे वाघोबाला वाचवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
