Home » मैनपुरी गावात सापडली भगवान श्रीकृष्णाच्या काळातील ‘शस्त्रे’… 

मैनपुरी गावात सापडली भगवान श्रीकृष्णाच्या काळातील ‘शस्त्रे’… 

by Team Gajawaja
0 comment
मैनपुरी (Mainpuri)
Share

उत्तर प्रदेशातील मैनपुरी (Mainpuri) जिल्हा सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. पौराणिक शस्त्रांचे अभ्यासक या मैनपुरी जिल्ह्यातील गणेशपूरमध्ये मोठ्या संख्येने जात आहेत. त्याला कारण म्हणजे या गणेशपूरमधल्या एका शेतात चक्क 4000 वर्षांहून अधिक जुन्या काळातील शस्त्रांस्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. 

गावातील एक शेतकरी शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण करत होता. त्यावेळी त्याला काही तलवारी मिळाल्या. या तलवारी त्यांनी सोन्याच्या असतील म्हणून घरी लपवून ठेवल्या. या सर्वांची कुणकूण गावात लागली आणि हा मौलिक खजानाच हाती लागला. या शेताला खोदण्यात आले. त्यात मोठ्या पेट्या सापडल्या. त्यात तलवारी, भाले, काटे, त्रिशूळ ही शस्त्रे मिळाली. ही तांब्याची शस्त्रे मिळताच सरकारी यंत्रणा सतर्क झाली. 

ही माहिती पुरातत्व विभागाला मिळताच एसडीएम व्ही के मित्तल यांनी ही शेती आणि परिसराला सिल केले. हा संपूर्ण परिसर सिल करण्यात आला असून कोणालाही खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच कोणाला अशी हत्यारे मिळाली असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  

मैनपुरी (Mainpuri) गावात पुरातत्व विभागाचे पथक दाखल झालेच आहे, शिवाय पुरातत्व शस्त्रास्त्रांचे अभ्यासकही या भागात दाखल झाले आहेत. ही शस्त्रे खूद्द भगवान श्रीकृष्णाची असल्याची चर्चा आता गावकऱ्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे या शस्त्राचे एकदा तरी दर्शन मिळावे, म्हणून आसपासच्या गावकऱ्यांनीही गणेशपूरमध्ये गर्दी केली आहे.  

या तांब्याच्या तलवारी, शस्त्रे 1800 ते 1200 इसवी सनपूर्व काळातील असल्याचे मानले जाते. 1822 मध्ये गंगा पट्ट्यातील कानपूरमधील बिथूर येथेही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे मिळाली होती. गंगा आणि यमुना यांच्यामध्ये वसलेली आग्रा, एटा, मैनपुरी, कानपूर ही शहरे अशा तांब्याच्या साठ्यांचे गड आहेत. आग्रा सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजकुमार पटेल यांनी सांगितले की, पूर्वी एटा, मैनपुरी, आग्रा आणि गंगेचा पट्टा येथे मानवी संस्कृती विकसीत होती. आता ही शस्त्रे महाभारतकालातील असल्याबाबात संशोधन सुरु केले आहे.  

====

हे देखील वाचा – निराळी रेल्वे ट्रॅक! जिथे रुळाच्या वरून नाही, तर खालून धावते ट्रेन

====

या शस्त्रांवरील कलाकृती प्राचीन भारतातील समृद्ध कलेसारखी आहे. अगदी प्राचीन काळीही देशात बनवलेली शस्त्रे अतिशय अत्याधुनिक होती. मैनपुरी (Mainpuri) येथील शेतात सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी पुरातत्व शास्त्रज्ञांसोबतच लोकांनाही भुरळ घातली आहे. ताम्रयुगीन काळातील ही शस्त्रे भगवान श्रीकृष्णाच्या काळातील म्हणजेच द्वापरयुगातील असल्याचं सांगितलं जात आहे. तांब्याच्या शस्त्रांच्यावरील नक्षीकामामुळे पुरातत्वशास्त्रज्ञही रोमांचित झाले आहेत. प्राचीन काळातही भारतीय सैनिकांकडे प्रगत शस्त्रे होती हेच यावरुन सिद्ध होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

ही शस्त्रे अतिशय तीक्ष्ण आणि आकारात अत्याधुनिक आहेत. यामध्ये स्टारफिशच्या आकाराची शस्त्रेही आहेत. त्यामुळे या शस्त्रांचा वापर कुरुक्षेत्रात झाला होता का, असाही शोध घेण्यात येत आहे.  या शस्त्रांचा वापर महाभारतात झाला असेल, तर हा खूप मोठा शोध ठरेल. तसेच यामुळे या भागाचे महत्त्वही वाढणार आहे.   

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.